रत्नागिरी – सध्या आपत्काळ चालू आहे. गुरुदेवांच्या कृपेने साधना करणार्या जिवांसाठी त्याचे रूपांतर आपत्काळातील संपत्काळात झाले आहे. त्यामुळे साधकांनी तन-मन-धन अर्पण करून झोकून देऊन सेवा करूया आणि मनुष्यजन्माचे सार्थक करून घेऊया. अशा पद्धतीने झोकून देऊन सेवा चांगल्या प्रकारे करणारे, मनात प्रतिक्रिया न आणणारे, चुका प्रांजळपणे सांगणारे, कोणत्याही सेवेत तत्परतेने सहभागी होणारे, साधकांना साहाय्य करणारे, ‘गुरूंनी दिलेली सेवा गुरुच करवून घेतील’, असा भाव असणारे श्री. विष्णु बगाडे आज जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त झाले असून त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे, अशी आनंदवार्ता सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी दिली. ‘ऑनलाईन’ प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या भावसोहळ्यात ते बोलत होते.
श्री. विष्णु बगाडे यांनी व्यक्त केलेले मनोगत
देवाने दिलेल्या आनंदासाठी त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. देवाने दिलेल्या साधनेच्या संधीचा लाभ करून घेण्यास मला विलंब झाला. खरेतर याआधीच साधनेत पुढच्या पुढच्या टप्प्याला जायला हवे होते. पुष्कळ वर्षांपूर्वी गुरुदेवांशी भेट झाली होती, तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुमचे सर्व चांगले आहे.’’ मला त्या वेळी त्याचा अर्थ कळला नाही. गुरुदेव माझ्या आर्थिक स्थितीविषयी बोलत नसून आध्यात्मिक स्थितीविषयी बोलत होते. त्यानंतर मला वाटले, ‘‘माझ्याकडे ज्ञान नाही, माझी आर्थिक स्थितीही विशेष नाही; पण शरीर तर आहे ना ? मग शरिराने सेवा करायला हवी.’’ (भावजागृती झाल्यामुळे काकांना पुढे बोलता आले नाही.)
श्री. बगाडे यांची कुटुंबीय आणि साधक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
१. सौ. आशा बगाडे, रत्नागिरी (श्री. विष्णु बगाडे यांची पत्नी) : ‘श्री. बगाडे यांना सतत सेवेचा ध्यास असे. सेवा करतांना त्यांना वेळेचेही भान नसते. आतापर्यंत अनेक संकटांतून त्यांना देवाने वाचवले आहे. आता आजाराच्या रूपाने आलेल्या संकटातून देवानेच सुटका केली. ते देवाला सतत प्रार्थना करायचे, ‘माझी या संकटातून सुटका कर.’ आजचा हा सुवर्णक्षण देवाच्या कृपेमुळे आला. यासाठी देवाच्या चरणी कृतज्ञता !’
२. कु. सुप्रिया बगाडे, रत्नागिरी (श्री. विष्णु बगाडे यांची मुलगी) : ‘घरात कितीही अडचणी असल्या, तरी बाबांच्या सेवेत खंड पडला नाही. ‘आपली आध्यात्मिक उन्नती लवकरात लवकर व्हावी’, अशी त्यांची इच्छा होती. आज ती पूर्ण झाली.’
३. श्री. महेंद्र चाळके, चिपळूण, रत्नागिरी (सहसाधक) : ‘भक्ती, तळमळ आणि भाव या गुणांमुळे काकांची प्रगती झाली. काकांना कोणतीही सेवा सांगितली, तरी ते कधीच नाही म्हणत नाहीत.’
‘गुरुकृपेनेच संतसेवेची संधी मिळते’, या भावाने संतसेवा करणारे श्री. बगाडेकाका !१. ‘श्री. बगाडेकाका रिक्शा चालवण्याचा व्यवसाय प्रामाणिकपणे करतात. २. काका सर्व साधकांना काही साहाय्य हवे असल्यास ते करण्याचा प्रयत्न करतात. ३. ते नेहमी सकारात्मक असतात. ४. सेवाभाव अ. ते त्यांची रिक्शा बर्याच वेळा सेवेसाठी, उदा. हिंदु राष्ट्र-जागृती सभा, हिंदूसंघटन मेळावा, गुरुपौर्णिमा अशा कार्यक्रमांसाठी लागणारे साहित्य ने-आण करण्यासाठी वापरतात. आ. साधकांना मार्गदर्शन करण्यासाठी गेलो असतांना बर्याच वेळा काका गाडीचालक म्हणून माझ्या समवेत येतात. इ. बर्याच वेळा ते रत्नागिरी रेल्वेस्थानकावर मला नेण्यासाठी येतात, तेव्हा ते आगगाडीच्या वेळेआधी तेथे उपस्थित असतात. ही सेवा ते आनंदाने करतात. ‘गुरुदेवांच्या कृपेनेच सेवा करायची संधी मिळते’, असा त्यांचा भाव असतो. ई. ते सेवेला प्राधान्य देतात. कधी आवश्यकता असल्यास ते व्यवसाय बंद ठेवूनही सेवा करतात. उ. काका त्यांच्या घरी जातांना सनातनचे ग्रंथ, सात्त्विक उत्पादने आणि सनातन पंचांग घेऊन जातात अन् त्यांचे तेथे वितरण करतात. ‘सर्वांपर्यंत सनातनची सात्त्विक उत्पादने पोचली पाहिजेत’, असे त्यांना वाटते. ५. काकांचा गुरूदेवांप्रती पुष्कळ भाव आहे.’ – (सद्गुरु) श्री. सत्यवान कदम, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (नोव्हेंबर २०२०) |
श्री. विष्णु बगाडे यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
‘श्री. विष्णु बाबन बगाडे यांच्याशी भ्रमणभाषवर बोलतांना, सकाळच्या नामसत्संगात ते प्रार्थना सांगतांना, भावार्चना करतांना अन् हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त सेवा करतांना प.पू. गुरुमाऊली आणि सद्गुरु सत्यवान कदम (सद्गुरु सत्यवानदादा) यांच्या कृपेने बगाडेकाकांची काही गुणवैशिष्ट्ये माझ्या लक्षात आली. ती कृपाळू गुरुमाऊली आणि सद्गुरु सत्यवानदादा यांच्या चरणी कृतज्ञतेने अर्पण करत आहे.
१. नम्रता
अ. श्री. विष्णु बगाडेकाका संतसेवेत चालकाची सेवा करतात. त्या वेळी त्यांचे बोलणे आणि वागणे यांतून त्यांच्यातील नम्रता दिसून येते.
आ. काकांना कुणीही कुठलीही सेवा सांगितली, तरी ते ती सेवा नम्रपणे स्वीकारून आनंदाने करतात. त्याविषयी त्यांच्या मनात कुठेही प्रतिक्रिया किंवा ताण जाणवत नाही. सर्वच साधकांशी ते नम्रतेने बोलतात.
२. प्रांजळपणा
दळणवळण बंदीच्या कालावधीमध्ये पंचांग वितरण सेवेत झालेल्या चुका आणि देवाने त्यांना केलेले साहाय्य काका त्यांच्या भाषेत सांगतात, त्या वेळी त्यांच्या बोलण्यात प्रांजळपणा जाणवतो. शुद्धी सत्संगात चूक सांगायची असो, ‘नारायण भेट’ सत्संगामध्ये एखादी अनुभूती सांगायची असो किंवा देवाने केलेल्या साहाय्याचा प्रसंग सांगायचा असो, त्यांच्या बोलण्यात नेहमीच प्रांजळपणा जाणवतो.
३. तत्परता
नामसत्संगामध्ये काही अडचणींमुळे एखादा साधक प्रार्थना आणि भावप्रयोग घेऊ शकत नसेल, त्या वेळी लगेच काका ‘मी घेऊ का ?’, असे विचारतात आणि ते प्रार्थना अन् भावार्चना घेतात.
४. मुलींवर चांगले संस्कार करणे
काकांच्या दोन मुली आयुर्वेदाच्या वैद्य झाल्या असून त्या पुढील शिक्षण घेत आहेत आणि एक मुलगी अभियंता आहे. काकांनी मुलींवर चांगले संस्कार केले आहेत. काकांनी त्यांना व्यावहारिक शिक्षणाच्या समवेत साधनाही शिकवली. काकांचा मुलींना आयुर्वेदाच्या वैद्य करण्याचा उद्देश ‘पुढे या माध्यमातून त्यांची सेवा होणार’, असा आहे. त्यांच्या दोन्ही मुलींचे आयुर्वेदाचे शिक्षण सावंतवाडीला झाले. त्या ठिकाणी त्या प्रशिक्षणवर्गाला उपस्थित रहायच्या आणि प्रासंगिक सेवा करायच्या.
५. सेवाभाव
अ. काका रिक्शाचालक आहेत, तरीही ते सेवेला प्रथम प्राधान्य देतात आणि त्यासाठी ते स्वतःचीच रिक्शा वापरतात. काकांना कधीही कुठलीही सेवा सांगितली, तरी ते लगेच ती सेवा स्वीकारतात. काका रिक्शा चालवत असतांना त्यांना सेवेसाठी भ्रमणभाष आल्यावर ते सेवेला प्राधान्य देतात. सेवा संपल्यानंतर पुन्हा रिक्शाचा व्यवसाय चालू करतात. त्यांना ‘तुम्हाला हे कसे जमते ?’, असे विचारल्यावर ‘प.पू. गुरुदेवच सर्व करवून घेतात’, असे ते म्हणतात.
आ. हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी मैदानातील सेवेसाठी आवश्यक असणार्या सर्व वस्तू काका दायित्वाने घेऊन येतात आणि सभेनंतर त्या लगेच पोचत्याही करतात. हे सर्व त्यांना प.पू. गुरुमाऊलीच्या कृपेने जमते. ‘काका रत्नागिरी येथील अनेक सेवा स्वीकारून त्या परिपूर्ण करतात’, असे जाणवले.
६. भाव
अ. काका प्रत्येक सेवेविषयी सकारात्मक असतात. ‘जी सेवा मिळाली आहे, ती प.पू. गुरुदेवांनीच दिली आहे आणि तेच ती सेवा करवून घेणार आहेत’, असा भाव असल्याने त्या सेवेची त्यांची क्षमता नसली, तरीही ते ती सेवा स्वीकारतात. देवाच्या कृपेने त्यांच्याकडून ती सेवा पूर्णही होते.
आ. काकांचे शिक्षण फार झालेले नाही. ते त्यांच्या गावाकडची भाषा बोलतात, तरीही ते ज्या वेळी नामसत्संगामध्ये प्रार्थना आणि भावार्चना सांगतात, त्या वेळी त्यांचा गुरुदेवांप्रती असलेला भाव त्यांच्या शब्दांतून जाणवतो. ‘त्यांचा प्रत्येक शब्द आतून येत असून ते तो भाव अनुभवत आहेत’, असे जाणवते. त्यांचा गुरुदेवांप्रती असलेला भोळा भाव त्यांच्या शब्दांतून व्यक्त होतो. ‘ते सांगत असलेले आपणही अनुभवत आहोत’, असे वाटून आपलाही भाव जागृत होतो.’
– श्री. ज्ञानदेव पाटील, चिपळूण (नोव्हेंबर २०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |