अपार कृपा आणि प्रीती यांचा वर्षाव करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी सत्संगात साधिकेने अनुभवलेले भावक्षण !

साधकांवर कृपेचा वर्षाव करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१८ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध केलेल्या या लेखाच्या सहाव्या भागात आपण साधिकेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहाला आणि वस्तूंना सुगंध  येण्याविषयीच्या अनुभूती पाहिल्या. आज त्या पुढील सूत्रे पाहूया. ​

(भाग ७)

भाग ६ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/452270.html

१८. वर्ष २००९

डॉ. रूपाली भाटकार

१८ अ. न्यायालयात सुनावणी चालू होण्यापूर्वी परात्पर गुरुदेवांच्या आवाजात ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप ऐकू येऊ लागणे आणि त्यांच्या समवेत स्वतःचा नामजप होऊ लागणे : एकदा न्यायालयात सुनावणी चालू होण्यापूर्वी मी नामजप करण्याचा प्रयत्न करत होते; पण माझा जप होत नव्हता. अकस्मात् मला परात्पर गुरुदेवांच्या आवाजात ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप ऐकू येऊ लागला आणि मी त्यांच्या समवेत नामजप करू लागले. मी माझ्या बहिणीला ‘नामजपाचे यंत्र चालू आहे का ?’, असे विचारले; पण तिने ते बंद असल्याचे सांगितले.

१८ आ. न्यायालयात साधिकेविरुद्ध साक्ष चालू असतांना ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप चालू होणे आणि त्या वेळी तो साक्षीदार खोटी साक्ष देऊ न शकणे : ५.५.२००९ या दिवशी माझ्या पूर्वीच्या यजमानांचे एक साक्षीदार माझ्याविरुद्ध साक्ष देण्यासाठी न्यायालयात आले होते. त्या वेळी अकस्मात् माझा ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप चालू झाला आणि तो त्यांची साक्ष संपल्यावरच थांबला. ते साक्षीदार न्यायालयात माझ्याविरुद्ध कोणतीही खोटी माहिती (साक्ष) देऊ शकले नाहीत.

१८ इ. अंग पुष्कळ दुखत असल्याने आश्रमात जावेसे न वाटणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या आध्यात्मिक उपायांच्या संदर्भातील दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लिखाण वाचून पुष्कळ उत्साह जाणवू लागणे अन् त्या वेळी तत्परतेने आश्रमात जाणे : २.८.२००९ या दिवशी माझे अंग पुष्कळ दुखत होते. त्यामुळे मला आश्रमात जावेसे वाटत नव्हते. नेहमीप्रमाणे सकाळी ८ वाजता दैनिक ‘सनातन प्रभात’ आला. मी त्यामधील परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेले नामजपादी उपायांविषयीचे लिखाण वाचले. ते वाचून मला पुष्कळ उत्साह जाणवू लागला आणि मी तत्परतेने आश्रमात गेले. आश्रमात गेल्यावर मी २ घंटे नामजप केला. त्यानंतर पुढे ४८ घंटे माझा नामजप विनासायास आणि सहजतेने होत होता.’

१९. वर्ष २०१०

१९ अ. मंदिरातील श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या मुखाच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मुख दिसणे आणि भावजागृती होणे : एकदा मी पणजी येथील राधाकृष्ण मंदिरात गेले होते. या मंदिरात श्रीकृष्णाची काळ्या संगमरवरातील मूर्ती आहे. श्रीकृष्णाचे दर्शन घेतांना मला त्याच्या मुखाच्या ठिकाणी परात्पर गुरुदेवांचे मुख दिसू लागले आणि माझा भाव जागृत झाला. या अनुभूतीमुळे ‘परात्पर गुरु डॉक्टर हे श्रीकृष्ण आहेत’, याची मला पुन्हा एकदा निश्‍चिती झाली.

१९ आ. ‘तुम्ही आणि श्रीकृष्ण एकच आहात’, याविषयी माझी निश्‍चिती करून द्या’, अशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर सुदर्शनचक्र धारण केलेल्या श्रीकृष्णाचे दर्शन होणे, श्रीकृष्णाच्या छातीपासून पायांपर्यंत परात्पर गुरु डॉक्टर दिसणे आणि परात्पर गुरु डॉक्टर अन् श्रीकृष्ण यांचे चरण सारखेच असणे : मला परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करण्याची इच्छा असायची; परंतु आपल्याला श्रीकृष्णाला प्रार्थना करायला सांगितले आहे. एकदा मी सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केली, ‘गुरुदेव, ‘तुम्हाला प्रार्थना करायची कि श्रीकृष्णाला ?’, याविषयी माझा संभ्रम होतो. त्यामुळे ‘तुम्ही आणि श्रीकृष्ण एकच आहात’, याविषयी माझी निश्‍चिती करून द्या.’ त्यानंतर मला सुदर्शनचक्र धारण केलेल्या श्रीकृष्णाचे दर्शन झाले. मला श्रीकृष्णाच्या छातीपासून पायांपर्यंत परात्पर गुरु डॉक्टर दिसत होते. परात्पर गुरु डॉक्टरांचे चरण आणि श्रीकृष्णाचे चरण एकच होते.

२०. वर्ष २०११

देवघरात ठेवलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रातून विविध सुगंध येणे : माझ्या घरातील देवघरात परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र ठेवलेले आहे. एकदा मी सहज त्या छायाचित्राचा सुगंध घेतला. तेव्हा त्यातून मोगर्‍याचा सुगंध येत होता. त्या वेळी घरात मोगर्‍याची फुले नव्हती किंवा मी अत्तरही लावलेले नव्हते. त्यानंतर पुढील काही दिवस प्रत्येक दिवशी या सुगंधात पालट होऊन कधी धर्मगंध, तर कधी चंदनाचा सुगंध येत होता.

२१. वर्ष २०१४

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या ‘फेस टिश्यू’ला आजही सुंदर दैवी सुगंध येणे : एकदा परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतः वापरलेला एक चैतन्यमय ‘फेस टिश्यू (तोंड पुसण्यासाठी वापरण्यात येणारा कागदी रुमाल)’ आध्यात्मिक त्रास असलेल्या एका साधिकेला त्यातील चैतन्याचा लाभ होण्यासाठी दिला. ते पाहून मी माझ्यासाठी एक मागितला. तो मी आजही पाकिटात जपून ठेवलेला आहे. त्यातून सुंदर दैवी सुगंध येतो.

२२. वर्ष २०१६

भाववृद्धी सत्संगात सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले एका उंच सिंहासनावर बसलेले दिसणे, त्यांच्या सभोवतालचे वातावरण पांढरे आणि धुरकट दिसणे, त्या वेळी भाव जागृत होणे अन् पुष्कळ आनंद होणे : मार्च २०१६ मध्ये मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी मला तेथे चालू असलेल्या भाववृद्धी सत्संगाला उपस्थित रहायला सांगितले. या सत्संगात मला सूक्ष्मातून ‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्यासमोर एका उंच सिंहासनावर बसले आहेत’, असे दृश्य दिसले. गुरुदेव नेहमीप्रमाणे पांढरा शुभ्र झब्बा आणि पायजमा या पोशाखात होते अन् माझ्याकडे पाहून स्मित हास्य करत होते. त्यांच्या सभोवतालचे वातावरण पांढरे आणि धुरकट/अस्पष्ट दिसत होते. ही अनुभूती अंदाजे ५ मिनिटे टिकली. या अनुभूतीमुळे माझा भाव जागृत झाला आणि मला पुष्कळ आनंद मिळाला.

(क्रमशः)

– डॉ. रूपाली भाटकार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ऑगस्ट २०२०)

भाग ८. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/453668.html

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक