अपार कृपा आणि प्रीती यांचा वर्षाव करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी सत्संगात साधिकेने अनुभवलेले भावक्षण !

साधकांवर कृपेचा वर्षाव करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

माघ शुक्ल पक्ष षष्ठी (१७ फेब्रुवारी) या दिवशी प्रसिद्ध केलेल्या या लेखाच्या पाचव्या भागात आपण साधिकेच्या साधनेच्या आरंभीच्या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले हेच श्रीकृष्ण आहेत, याविषयीच्या अनुभूती पाहिल्या. आज त्या पुढील सूत्रे पाहूया.

(भाग ६)

भाग ५ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/451791.html


१६. वर्ष २००४

डॉ. रूपाली भाटकार

१६ अ. साधिकेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना व्यवहारातील एक प्रसंग सांगितल्यावर त्यांच्या मुखातून श्रीकृष्णच बोलला, असे जाणवणे : एकदा मी परात्पर गुरु डॉक्टरांना भेटायला सुखसागर येथे गेले होते. त्या वेळी मी त्यांना व्यवहारातील एक प्रसंग सांगून म्हणाले, त्या लोकांना वाटेल की, तुम्हीच मला सर्व शिकवत आहात. हे ऐकून ते मला म्हणाले, मी सर्वांनाच सर्वकाही शिकवत असतो. गुरुदेवांच्या मुखातून श्रीकृष्णच हे बोलला, असे मला वाटते.

१६ आ. एका सत्संगात एक तपस्वी हवेत तरंगत आहेत, असे दिसणे, १५ वर्षांनी महर्षि भृगु यांचे चित्र पाहिल्यावर पूर्वी सत्संगात दिसलेले तपस्वी हे भृगु महर्षि होते, असे लक्षात येणे आणि ते विचारल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपल्या सत्संगात दिव्यात्मे उपस्थित असतात, असे सांगणे : एकदा मी पणजी येथील एका साधकाच्या घरी सत्संगाला गेले होते. या सत्संगात मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राच्या वर एक तपस्वी हवेत तरंगत आहेत, असे दृश्य दिसले. पांढरे शुभ्र लांब केस आणि दाढी असलेले हे तपस्वी भगव्या वस्त्रात होते. त्यांचे नेत्र लहान आणि तेजस्वी होते, तसेच त्यांच्या मुखावर एक मनमोहक हास्य होते. वर्ष २०१९ मध्ये मी रामनाथी आश्रमात महर्षि भृगु यांचे चित्र पाहिल्यावर मला त्या सत्संगात दिसलेले तपस्वी हे भृगु महर्षि होते, असे माझ्या लक्षात आले. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि महर्षि भृगु एकच आहेत का ?, असा प्रश्‍न माझ्या मनात निर्माण झाला. मी या अनुभूतीसंदर्भातील निरोप परात्पर गुरुदेवांकडे पाठवला. आपल्या सत्संगात दिव्यात्मे उपस्थित असतात, असे ते सहजपणे म्हणाल्याचे मला समजले.

१७. वर्ष २००५

१७ अ. अभ्यासवर्गात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राच्या मागचा कोरा भाग दाखवून प्रयोग घेण्यात येणे आणि त्या कोर्‍या भागावर भारतमातेचे दर्शन होणे : एकदा पर्वरी (गोवा) येथे एक अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला होता. त्यात उपस्थित साधकांना एका छायाचित्राच्या मागचा कोरा भाग दाखवण्यात आला आणि तो पाहून काय जाणवले ?, असे विचारण्यात आले. त्यावर मला भारतमातेचे दर्शन झाले. परात्पर गुरु डॉक्टर धोतर नेसून पूजा करण्यासाठी सिद्ध झाले आहेत, असे ते छायाचित्र होते.

१७ आ. रात्री जाग आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र खाली पडलेले दिसणे, त्यानंतर पटलावरील देवतांच्या प्रतिमा खाली पडणे, हे वाईट शक्तींचे सूक्ष्मातील आक्रमण आहे, हे लक्षात येणे, सकाळी उठल्यावर अंगणाच्या दारात एक कबूतर मरून पडलेले दिसणे, ते पाहून आपली प्रार्थना गुरुदेवांपर्यंत पोचली आणि त्रास देणार्‍या कबुतराच्या रूपातील वाईट शक्ती नष्ट झाली, हे लक्षात येणे : एकदा मला उत्तररात्री ३ वाजता खोलीत काहीतरी पडल्याचा आवाज झाल्याने जाग आली. उठून पाहिल्यावर मला परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र खाली पडल्याचे दिसले. छायाचित्र वार्‍याने खाली पडले असेल, असा विचार करून मी ते उचलून जागेवर ठेवले आणि पुन्हा झोपी गेले. काही वेळाने पुन्हा आवाज झाल्याने मी उठून पाहिले, तर पटलावरील देवतांच्या प्रतिमा खाली पडल्या होत्या; मात्र पटलावरील इतर कागद मात्र जागेवरच होते. ते दृश्य पाहून हे वाईट शक्तींचे सूक्ष्मातील आक्रमण आहे, हे माझ्या लक्षात आले. मी खोलीत विभूती फुंकरली आणि गुरुदेवांना माझे रक्षण करण्याची प्रार्थना केली. त्यानंतर मला गाढ झोप लागली. सकाळी ६ वाजता मी दूध आणायला बाहेर पडले. तेव्हा मला आमच्या अंगणाच्या दारात एक कबूतर मरून पडलेले दिसले. ते पाहून माझी प्रार्थना गुरुदेवांपर्यंत पोचली आणि मला त्रास देणार्‍या कबुतराच्या रूपातील वाईट शक्ती त्यांच्या कृपेने नष्ट झाली, हे माझ्या लक्षात आले.

१७ इ. ऑक्टोबर २००५

१७ इ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या तळव्याला धर्मगंध आणि तळहाताच्या वेगवेगळ्या भागांतून हळद, कुंकू इत्यादी सुगंध येणे अन् त्या वेळी त्यांनी मी ईश्‍वराची शक्ती (चैतन्य) प्रक्षेपित करणारा वाहक आहे. तुम्हाला जे आवश्यक आहे, ते देव माझ्या या देहातून प्रक्षेपित करत आहे, असे सांगणे : एकदा परात्पर गुरु डॉक्टरांच्या तळव्याला धर्मगंध येत होता. (धर्मगंध म्हणजे तेल आणि चंदन यांचे मिश्रण असलेले वैशिष्ट्यपूर्ण गंध, जो केवळ मंदिरात येतो.) त्यांच्या तळहाताच्या वेगवेगळ्या भागांतून हळद, कुंकू इत्यादी सुगंध येत होते. या अनुभूतीसाठी मी परात्पर गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करतांना ते म्हणाले, तुम्हाला ईश्‍वराच्या निर्गुण तत्त्वाची आवश्यकता आहे. मी ईश्‍वराची शक्ती (चैतन्य) प्रक्षेपित करणारा वाहक आहे. तुम्हाला जे आवश्यक आहे, ते देव माझ्या या देहातून प्रक्षेपित करत आहे. माझे या देहावर काहीही नियंत्रण नाही. त्यावर देवाचे नियंत्रण आहे. जे आवश्यक आहे, तेच घडत आहे.

१७ इ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दाढीचे सामान असलेल्या लहानशा पिशवीला (शेव्हिंग किटला) केवड्याचा तीव्र सुगंध येणे, या सुगंधाने मन प्रसन्न होणे आणि या सुगंधात श्रीकृष्णाची शक्ती आहे, असे जाणवून भावजागृती होणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी मिरज आश्रम सोडण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांच्या अनुपस्थितीत कसे होईल ?, असा विचार करून सर्व साधकांना चिंता वाटत होती. त्या वेळी त्यांनी दाढीचे सामान असलेली स्वतःची लहानशी पिशवी (शेव्हिंग किट) साधकांच्या रक्षणासाठी दिली. आम्हाला त्यांनी या पिशवीचा गंध घेण्यास सांगितला. पिशवीला केवड्याचा तीव्र सुगंध येत होता. या सुगंधाने माझे मन प्रसन्न झाले आणि या सुगंधात श्रीकृष्णाची शक्ती आहे, असे जाणवून माझी भावजागृती झाली. परात्पर गुरु डॉक्टर परम कृपाळू आहेत. आपण सर्वसामान्य जीव असूनही ते आपल्यावर अपार कृपा करत आहेत.

१७ ई. नोव्हेंबर २००५ – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रावरील कुंकवाला लावलेल्या अक्षता न पडता पुष्कळ दिवस तशाच रहाणे : एकदा मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राची पूजा करून त्यांच्या कपाळाला ओले कुंकू लावले आणि अक्षता वाहिल्या. या अक्षता छायाचित्राला चिकटून राहिल्या आणि पुढे कित्येक दिवस तशाच होत्या. मंदिरात कौल लावण्यासाठी शिवपिंडीवर तांदूळ लावले जातात आणि ते तांदूळ न पडता तसेच रहातात. परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राला चिकटलेल्या अक्षता पाहून मला त्याची आठवण झाली.

(क्रमशः)

– डॉ. रूपाली भाटकार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ऑगस्ट २०२०)


भाग ७. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/453355.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक