अपार कृपा आणि प्रीती यांचा वर्षाव करणार्‍या परात्पर गुरु  डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी सत्संगात साधिकेने अनुभवलेले भावक्षण !

साधकांवर कृपेचा वर्षाव करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

२२ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध केलेल्या या लेखाच्या सातव्या भागात आपण साधिकेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीच्या अनुभूती पाहिल्या. आज त्या पुढील सूत्रे पाहूया.

भाग ८

भाग ७ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://sanatanprabhat.org/marathi/453355.html

२३. जून २०१६

डॉ. रूपाली भाटकार

२३ अ. सहलीसाठी युरोपला गेल्यावर पडल्याने हाताला दुखापत होणे, वेदना होत असल्याने वेदनाशामक गोळ्या घेऊन फिरणे चालू ठेवणे, तीव्र वेदना होत असूनही केवळ नामजपाच्या आधारे पर्यटनाचा आनंद घेऊ शकणे, भारतात परतल्यावर ‘हाताचे एक महत्त्वाचे हाड मोडले आहे’, असे निदान होणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेनेच रक्षण झाल्याचे लक्षात येणे : मी एकदा सहलीसाठी युरोपला गेले होते. त्या वेळी मी पडले आणि माझ्या उजव्या हाताला दुखापत झाली. हाताला सूज येऊन तो लाल झाला. पुष्कळ वेदना होत असल्याने मला हाताची काहीच हालचाल करता येत नव्हती. मी वेदनाशामक गोळ्या घेतल्या आणि फिरणे चालू ठेवले; कारण मला माझ्या समवेत असणार्‍या नातेवाइकांच्या सुटीचे दिवस वाया घालवायचे नव्हते. आमची एक आठवडा सहल शेष होती. तीव्र वेदना होत असूनही केवळ नामजपाच्या आधारे मी पर्यटनाचा आनंद घेऊ शकले. टायटलिस हा पर्वत समुद्रसपाटीपासून ३ सहस्र २३८ मीटर उंचीवर असून तेथील तापमान – (उणे) ९ डिग्री सेल्सिअस असते. इतक्या थंड वातावरणात आणि कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसतांना केवळ परात्पर गुरूंच्या कृपेने मी तेथे जाऊ शकले. मी भारतात परतले. तेव्हाही माझ्या वेदना न्यून झाल्या नव्हत्या. त्यामुळे मी वैद्यकीय तपासणीसाठी गेले. त्या वेळी ‘हाताचे एक महत्त्वाचे हाड मोडले आहे’, असे निदान झाले. ‘तेथे एक महत्त्वपूर्ण धमनी असते, जिच्यातून रक्तस्राव होऊन मृत्यू होण्याची शक्यता असते’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले. परात्पर गुरु डॉक्टरांनीच माझे रक्षण केले. कडाक्याच्या थंड वातावरणातही मला काहीही झाले नाही.

२३ आ. आयुर्वेदाचे उपचार आणि ‘फिजिओथेरपी’ यांमुळे हात बरा होणे, आधुनिक वैद्यांनी हाताची हालचाल करण्यास प्रतिबंध करणे आणि ‘तुम्ही कधीही हात उंचावू शकणार नाही’, असे सांगणे : ‘अस्थीभंग झाल्याने हाताची हालचाल न करणे आणि त्याला आराम देणे’ आवश्यक असून शस्त्रकर्म करण्याची आवश्यकता नाही’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले. उजव्या हातालाच ही दुखापत झाल्याने मी सेवा करू शकत नव्हते, तरीही मी हार न मानता परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने डाव्या हाताने सेवा करू शकले. आयुर्वेदाचे उपचार आणि ‘फिजिओथेरपी’ यांमुळे माझा हात बरा झाला; परंतु आधुनिक वैद्यांनी हाताची हालचाल करण्यास प्रतिबंध केला, तसेच ‘तुम्ही कधीही हात उंचावू शकणार नाही’, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक रात्री मला त्रासदायक वेदना होत असत आणि मला शांत झोप येत नसे.

२३ इ. रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करत असतांना ‘एक अदृश्य हात साधिकेच्या खांद्याची हालचाल करत आहे’, असे तिला जाणवणे, तेव्हापासून हाताच्या वेदना नाहीशा होऊन हात उंचावू शकणे आणि ‘परात्पर गुरु डॉक्टरांनीच बरे केले’, असे वाटणे : रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करत असतांना मला ‘एक अदृश्य हात माझ्या खांद्याची हालचाल करत आहे’, असे जाणवले. तेव्हापासून हाताच्या वेदना नाहीशा झाल्या असून मी हात उंचावू शकते. त्या वेळी बर्‍याच साधकांनी मला सांगितले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांवर सूक्ष्मातून नामजपादी उपाय करतात’ आणि मलाही असेच वाटते की, त्यांनीच मला बरे केले आहे.

२४. ऑगस्ट २०१६

साधिकेच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त तिने परात्पर गुरुदेवांना कृतज्ञतापत्र लिहिणे, त्यावर आश्रमातून बाळकृष्णाची एक सुंदर मूर्ती भेट म्हणून पाठवणे आणि गुरुदेवांनी एक लहानसे पत्र लिहून साधिकेच्या पत्राला उत्तर देणे आणि त्याला अजूनही चंदनाचा सुगंध येणे

माझ्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी परात्पर गुरु डॉक्टरांना एक पत्र लिहिले होते. ‘त्यांनी माझ्यासाठी जे काही केले, त्याविषयी मी या पत्रात कृतज्ञता व्यक्त केली होती. त्यावर आश्रमातून मला बाळकृष्णाची एक सुंदर मूर्ती भेट म्हणून पाठवली. या मूर्तीचा सुंदर पोशाख, मुकुट आणि दागिने हे सर्व मला जसे हवे होते, तसेच होते. गुरुदेवांनी एक लहानसे पत्र लिहून माझ्या पत्राला उत्तर दिले. त्यांचे हे पत्र मी आजही जतन करून ठेवले आहे. त्याला ४ वर्षांनी अजूनही चंदनाचा सुगंध येतो.

२५. १८ मे २०१७

२५ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याच्या दिवशी आलेल्या अनुभूती

२५ अ १. गुडघेदुखीचा त्रास असूनही फुलांचे हार करण्याची सेवा करतांना भूमीवर बसता येणे आणि त्रास न होणे : ‘मला गुडघेदुखीचा पुष्कळ त्रास आहे. त्यामुळे मला भूमीवर बसता येत नाही; मात्र अमृत महोत्सव सोहळ्याच्या दिवशी फुलांचे हार करण्याची सेवा करतांना मला सहजपणे भूमीवर बसता आले आणि त्या वेळी मला कोणत्याही वेदना झाल्या नाहीत.

२५ अ २. डोळे बंद करून प्रार्थना करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या तारक रूपातील नेत्रांचे दर्शन होणे, सूत्रसंचालन करणारे साधक श्री. विनायक शानभाग यांनी ‘आजच्या विशिष्ट तिथीला भाविकांना श्री तिरुपति बालाजीच्या नेत्रांचे दर्शन घेऊ दिले जाते’, असे सांगितल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नेत्रांचे दर्शन होण्यामागील कारण लक्षात येणे आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अवतार आहेत’, याची निश्‍चिती होणे : या सोहळ्याचे प्रक्षेपण चालू होण्यापूर्वी सर्व साधकांना प्रार्थना करायला सांगितली होती. डोळे बंद करून प्रार्थना करतांना मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या तारक रूपातील नेत्रांचे दर्शन झाले. या नेत्रांचे दर्शन होण्यामागे असलेला कार्यकारणभाव माझ्या लक्षात येत नव्हता. काही वेळाने सोहळ्याचे सूत्रसंचालन करणारे साधक श्री. विनायक शानभाग यांनी त्या दिवसाचे महत्त्व सांगितले, ‘‘आजचा दिवस गुरुवार असून हिंदु पंचांगानुसार सप्तमी आणि अष्टमी या तिथींमधील संक्रमण काळ आहे अन् या विशिष्ट तिथीला भाविकांना श्री तिरुपति बालाजीच्या नेत्रांचे दर्शन घेऊ दिले जाते.’’ हे ऐकून मला ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या तारक रूपातील नेत्रांचे दर्शन का झाले ?’, हे लक्षात आले. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अवतार आहेत’, याची मला पुन्हा एकदा निश्‍चिती झाली.

२५ अ ३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या साधनाप्रवासाची ध्वनी-चित्रचकती पहातांना भाव जागृत होऊन कृतज्ञता वाटणे : परात्पर गुरु डॉक्टरांच्या साधनाप्रवासाची ध्वनी-चित्रचकती पहातांना माझा भाव जागृत झाला. गुरुदेवांच्या अवतारी कार्यात सहभागी होण्यासाठी अनेक भाग्यवान जिवांनी त्यांच्या कार्यकाळात जन्म घेतला आहे. ‘त्या जिवांमध्ये माझाही समावेश आहे’, या विचाराने माझ्या मनात अतीव कृतज्ञता दाटून आली.

२५ अ ४. तुलाभार विधीच्या वेळी गुरुदेवांचे चरण पाहून ‘ते युवावस्थेतील श्रीकृष्णाचे पावन चरण आहेत’, असे जाणवणे : परात्पर गुरुदेवांच्या अमृत महोत्सव सोहळ्यातील तुलाभार हा विधी गोड्या बुंदीने करण्यात आला. हा विधी चालू असतांना गुरुदेव स्वतःचे पाय एकमेकांवर ठेवून बसले होते. त्यांनी परिधान केलेले पितांबर आणि पायांतील आभूषणे अतिशय सुंदर दिसत होती. गुरुदेवांचे चरण पाहून मला ‘ते युवावस्थेतील श्रीकृष्णाचे पावन चरण आहेत’, असे जाणवले.

२५ अ ५. परात्पर गुरु डॉक्टरांची साधकांवर असलेली प्रीती आणि करुणा त्यांच्या दृष्टीतून व्यक्त होते. त्या दिवशी त्यांच्या दृष्टीक्षेपातून प्रीती आणि करुणा यांचा अखंड वर्षाव होत होता.

२५ अ ६.  या दिवशी एका सभागृहात परात्पर गुरु डॉक्टरांचे पूर्ण आकारातील छायाचित्र (कटआऊट) लावले होते. मला ते ‘हळूहळू सजीव होत आहे’, असे जाणवले. ‘पळत जाऊन त्यांचे चरण धरावेत’, असे मला वाटत होते.’

(क्रमशः)

– डॉ. रूपाली भाटकार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ऑगस्ट २०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक