राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषी पेरारीवालन यांच्या याचिकेवर न्यायालयाने अभिनेता संजय दत्त यांच्या सुटकेचा तपशील मागितला 

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि त्यांच्या हत्येतील दोषी असलेले ए.जी. पेरारीवलन

मुंबई – अनधिकृत शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी ६ वर्षांची शिक्षा होऊनही अभिनेता संजय दत्त यांची शिक्षा १ वर्षाने न्यून का करण्यात आली ? याविषयी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्येतील दोषी असलेले ए.जी. पेरारीवलन यांनी राज्य माहिती आयोगाकडे माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली होती. आयोगाकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे पेरारीवलन यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. पेरारीवलन यांच्या या याचिकेवर न्यायालयाने राज्य माहिती आयोगाला नोटीस पाठवून संजय दत्त याच्या सुटकेचा तपशील मागितला आहे.

राजीव गांधी यांच्या हत्येस उत्तरदायी असलेल्यांना बाँब सिद्ध करण्यासाठी साहाय्य केल्याविषयी पेरारीवलन याला वयाच्या १९ व्या वर्षी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. सध्या ते चेन्नई येथील पुझल मध्यवर्ती कारागृहात आहेत.

अभिनेता संजय दत्त हेही शस्त्रास्त्र कायद्याच्या अंतर्गत दोषी असतांना त्यांना वेळोवेळी फर्लो आणि पॅरोल रजेवर सोडण्यात आले होते. संजय दत्त यांची शिक्षा न्यून करण्यापूर्वी केंद्र अथवा राज्य शासन यांचे मत घेण्यात आले होते का ? याविषयी पेरारीवलन यांनी मार्च २०१६ मध्ये येरवडा कारागृहाच्या अधिकार्‍यांकडे माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत माहिती मागितली होती.