पँगाँग सरोवरापासून आपण मागे हटलो, तरी वेळ आल्यास तेथे ३ घंट्यांत  पुन्हा पोचू ! – माजी सैन्यदलप्रमुख व्ही.पी. मलिक

चीनला तेथे पोचण्यासाठी १२ घंटे लागणार असल्याचेही मत !

चीनच्या आतापर्यंतच्या धूर्त कारवाया पाहिल्यास, त्याच्याविषयी काहीही ठामपणे सांगता येणार नाही. त्यामुळे भारतीय सैनिकांनी सदासर्वकाळ सतर्क रहाणेच इष्ट !

माजी सैन्यदलप्रमुख व्ही.पी. मलिक

नवी देहली – पँगाँग सरोवरापासून भारत आणि चीन यांचे सैनिक माघारी गेले आहेत. हे तेच पॉइंट्स आहेत ज्या ठिकाणी दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर आले होते. अशा परिस्थितीचे पर्यावसान कधीही युद्धात होऊ शकले असते. सैनिक माघारी फिरल्याने युद्धाची परिस्थिती टळली. कैलाश रेंजवरून परत येण्याचा अर्थ, ‘आपण त्या ठिकाणी पुन्हा जाऊ शकत नाही’, असा मुळीच होत नाही. चीनने काही कुरापत केल्यास भारताचे सैनिक त्या ठिकाणी अवघ्या ३ घंट्यांत पुन्हा पोचू शकतील; मात्र चीनच्या सैनिकांना त्याच ठिकाणी पुन्हा पोचण्यासाठी १२ घंटे लागतील, अशी माहिती भारताचे माजी सैन्यदलप्रमुख व्ही.पी. मलिक यांनी दिली आहे.

मलिक म्हणाले की, भारतासाठी ही गोष्ट सर्वांत महत्त्वाची आहे की, आपण चिनी सैनिकांना ठरवून दिलेल्या अटींवर परत पाठवले आहे. चीनला मागे लोटण्यात यशस्वी होऊन आपण पहिल्यांदाच वर्ष १९६२ च्या पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर आलो आहोत. आता पुन्हा दोन्ही सैन्यांचे प्रतिनिधी बैठका घेतील. यामध्ये देपसांग, गोगरा आणि हॉट स्प्रिंग येथील पॅट्रोलिंग पॉइंट्सवर चर्चा होणार आहे. ‘कैलाश रेंजवरून आपण मागे हटल्याने चीन काही कुरापती करणार’, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. तरीही मी खात्रीने म्हणू शकतो की, दक्षिण पँगाँगमध्ये आपली परिस्थिती भक्कम आहे.