इतिहास रचणारे भारतीय !

रश्मी सामंत नावाच्या ऑक्सफर्ड येथे शिकणार्‍या भारतीय विद्यार्थिनीने एक अनोखा इतिहास रचला आहे. ती ‘ऑक्सफर्ड स्टुडंट युनियन’च्या अध्यक्ष म्हणून निवडून आली आहे. अशी निवड होणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. तिच्या चमूत अन्य काही भारतीय मुलेही निवडून आली आहेत. रश्मी यांनी कर्नाटक येथील मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांनी निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भारतीय मूल्यांचा उल्लेख केला आहे. त्यांनी परिसर वसाहतवाद मुक्ती आणि सर्वसमावेशकता यांवर भर दिला आहे. एखाद्या भारतियाची जागतिक स्तरावर नावाजलेल्या ठिकाणी निवड होणे, ही भारतियांसाठी अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. यापूर्वी अमेरिकेतील जगप्रसिद्ध हॉवर्ड विद्यापिठाचे ‘डीन’ म्हणून भारतीय मूळ असलेले श्रीकांत दातार आणि त्यापूर्वी नितीन नोहरिया यांची निवड झाली होती. जगावर राज्य केलेल्या इंग्लंडच्या सध्याच्या मंत्रीमंडळातच भारतीय वंशाच्या २ व्यक्ती मंत्री आहेत, हीसुद्धा कौतुकास्पद गोष्ट आहे. भारतात इंग्रजांचा प्रवेश ज्या ईस्ट इंडिया कंपनीद्वारे झाला, त्या आस्थापनाची मालकीही संजीव मेहता नावाच्या एका भारतियाकडेच १० वर्षांपूर्वी आली आहे.

गुलामगिरीच्या खुणा पुसणे

कोणताही देश अन्य देशांच्या नियंत्रणाखाली अथवा गुलामगिरीत राहू इच्छित नसतो. भारतासारख्या मोठ्या आणि सहस्रो वर्षांचा वैभवशाली वारसा लाभलेला देश तर अशी गुलामगिरी मुळीच सहन करू शकत नाही. भारतावर मोगलांनी काही शतके आणि नंतर इंग्रजांनी काही वर्षे राज्य केले. संकुचित मानसिकता आणि व्यापक राष्ट्रहिताचा अभाव, शत्रूशी हातमिळवणी करणे यांमुळे सामर्थ्यशाली असूनही भारतियांना १ सहस्र वर्षे पारतंत्र्यात काढावी लागली. त्यामुळे निर्माण झालेली गुलामगिरीची मानसिकता भारतियांच्या मनपटलावरून पुसली गेलेली नाही. त्यातही काही भारतीय ही मानसिकता झुगारून देऊन ‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड डिक्शनरीने ‘आत्मनिर्भर’ हा शब्द त्यांच्या शब्दांमध्ये समाविष्ट करून भारतियांचा तसे होण्याचा निश्‍चयही पक्का आहे, हेच दाखवून दिले आहे. त्यातच रश्मी सामंत यांच्या कर्तृत्वाने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. कोरोना लसनिर्मितीमध्ये भारताच्या आघाडीच्या सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफर्डशी करार करूनच त्यांच्या फॉर्म्यूल्यानुसार भारतीय लसीची निर्मिती केली आहे, जिचा आज जगभर पुरवठा करण्यात येत आहे. आज भारताने तर शेजारील काही देशांना लसीचे लाखो डोस विनामूल्य आणि भेट स्वरूपात दिले आहेत. भारताच्या लसीवर आणि साहित्यावर विश्‍वास दाखवतांना काही देशांनी चीनच्या लसीचे डोस नाकारले आहेत, हे येथे नमूद करावेसे वाटते. पश्‍चिमेतील काही देशांनी ‘भारताच्या रूपात आज जागतिक शक्ती वर येत आहे’, असे सांगितले आहे. भारत ही एक जागतिक शक्ती आहेच; मात्र त्या शक्तीचा तिला विसर पडला होता. रामायणात वीर हनुमान महाबली आहे; मात्र लहानपणी त्याला मिळालेल्या शापामुळे तो स्वत:ची शक्ती विसरला होता. माता सीतेच्या शोधासाठी अथांग समुद्र पार करण्याची वेळ आल्यावर म्हणजेच योग्य वेळी जाम्बुवंताने हनुमानाला त्याच्यातील दैवी आणि प्रचंड शक्तीची जाणीव करून दिल्यावर त्याने प्रचंड झेप घेऊन आकाशात उड्डाण केले अन् माता सीतेचा शोध घेऊन रामकार्य केले, ही घटना आपल्याला परिचित आहे.

भारतियांची अद्वितीयता !

भारतीय हे अवतारी राम-कृष्ण यांचे अंश आहेत. भारतियांमध्ये त्यांच्या पूर्वजांची शक्ती, गुण सामावलेले आहेत. केवळ त्यांवर आलेले अयोग्य मानसिकतेचे मळभ दूर करण्याची आवश्यकता आहे. ते दूर केले की, जागतिक राजकारण, समाजकारण, अर्थकारण इत्यादींमध्ये केवळ भारतीय नेतृत्वच दिसेल. ध्यानमार्गाने साधना करणारे नरेंद्र मोदी यांचा बघता बघता जगात दबदबा निर्माण झाला आणि त्यांचे नेतृत्वही जगाने स्वीकारले. त्यांच्यासारखे व्यक्तीमत्त्व अन्य क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे, त्यांची अद्याप देशाला अथवा जगाला माहिती नाही. सव्वाशे वर्षांपूर्वी शिकागो येथील जागतिक सर्वधर्मपरिषदेत भारतातीलच स्वामी विवेकानंद या तेजस्वी संन्याशाने ‘अमेरिकेतील माझ्या बंधु आणि भगिनींनो’, अशी उपस्थितांना साद घातली आणि तेव्हा सभागृहात टाळ्यांचा विलक्षण कडकडाट झाला. केवळ दोन शब्दांनीच अपरिचित अशा मोठ्या देशात अंगावर भगवी वस्त्रे नेसून आलेल्या स्वामी विवेकानंद यांनी उपस्थितांची मने जिंकली. एवढे प्रकांड पंडित तेथे अभ्यास करून आणि लिखित भाषणे घेऊन येऊनही स्वामी विवेकानंद यांच्या उत्स्फूर्त आणि साधनेचे अधिष्ठान असलेल्या भाषणापुढे त्याचा प्रभाव पडला नाही. अमेरिकन लोकांना केवळ स्वामी विवेकानंदच १०० वर्षांनंतरही लक्षात राहिले. ही भारतियांची शक्ती आहे.

भारतरत्न डॉ. मोक्षगुंड्डम विश्‍वेश्‍वरय्या यांचा जन्मदिवस ‘अभियंता दिवस’ म्हणून भारत, श्रीलंका आणि टांझानिया येथे साजरा केला जातो. अन्य देशात एका धरणाचे बांधकाम करतांना पाण्याची गळती होत होती; ती रोखण्यासाठी अनेक उपाय करूनही थांबत नसल्यामुळे डॉ. विश्‍वेश्‍वरय्या यांना बोलावण्यात आले. त्यांनी गळती रोखली आणि त्या ठिकाणी ‘भारताने हे काम केले आहे’, असा दगड त्यांनी ठेवला. तो दगड तेथील लोकांनी काढण्याचा प्रयत्न केल्यावर पुन्हा गळती चालू झाली. तेव्हा लोकांनी पुन्हा दगड मूळ जागी ठेवला. यातून प्रत्येक क्षेत्रात भारताचे नाव उंचावले होते, आहे आणि पुढेही असणार आहे, हे लक्षात येते. अनेक संतांनी ‘भारताची सध्याची दु:स्थिती दूर होऊन सर्व जगाला आनंद देणारे हिंदु राष्ट्र लवकरच भारतात स्थापन होणार आहे’, असे सांगितले आहे. ते झाल्यावर भारताच्या प्रतिभेचा, ज्ञानाचा सूर्य दीर्घकाळ जगात तळपत रहाणार आहे, हे निश्‍चित ! हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न करण्याची प्रक्रियाही एकमेवाद्वितीय आणि ‘न भूतो न भविष्यती’ अशी असणार आहे, हेसुद्धा येथे नमूद करावेसे वाटते.