राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पोलीस बंदोबस्ताची मागणी
कणकवली – कणकवली शहरात मुंबई-गोवा महामार्गाचे काम अखेरच्या टप्प्यात आले असतांनाच महामार्ग प्राधिकरणाकडून महामार्गाच्या हद्दीत येणारी (‘राईट ऑफ वे’च्या येणारी) बांधकामे काढण्याविषयी हालचाली गतीमान झाल्या आहेत. त्यामुळे येत्या १५ फेब्रुवारीपासून कणकवली शहरात ‘राईट ऑफ वे’मध्ये (आर्.ओ.डब्ल्यू.मध्ये) येत असलेली बहुतांश बांधकामे तोडली जाण्याची शक्यता आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या उपअभियंत्यांनी पोलीस अधीक्षकांकडे पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे.
कणकवली शहरात अनेक ठिकाणी चौपदरीकरणाचे काम पूर्ण होत असतांनाच शहरात काही भागांमध्ये जलवाहिन्या आणि विद्युत्वाहिन्या यांचे काम अद्याप बाकी आहे. या कामांसह अन्य कामे करता यावीत, यासाठी महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेते संदेश पारकर यांनी आर्.ओ.डब्ल्यू. लाईनमधील बांधकामे हटवा, आर्.ओ.डब्ल्यू. लाईन निश्चित करा, अशी आग्रही मागणी ठेकेदार आस्थापन आणि महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे केली होती. तत्पूर्वी कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनीदेखील आर्.ओ.डब्ल्यू. लाईन निश्चित करण्याची मागणी केली होती. आता महामार्ग प्राधिकरणाने ही लाईन निश्चित करण्याच्या अनुषंगाने बांधकामे हटवण्याची सिद्धता चालू केल्याने महामार्गाच्या हद्दीतील बांधकामधारक आणि शहरातील राजकीय पदाधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलीस बळाचा वापर करून बांधकामे पाडल्यास आत्मदहन करण्याची चेतावणी
महामार्ग चौपदरीकरणाच्या अंतर्गत महामार्गाच्या सीमेत येणारी बांधकामे पोलीस बळाचा वापर करून पाडण्याचा प्रयत्न केल्यास आत्मदहन करण्याची चेतावणी कणकवली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी दिली आहे. याविषयीचे पत्र त्यांनी १३ फेब्रुवारीला येथील तहसीलदारांना दिले.