चीनमध्ये बीबीसीवर बंदी !

शिनजियांग प्रांत आणि कोरोना यांसंदर्भातील खोट्या बातम्या दाखवल्याचा ठपका

बीबीसीकडून हिंदूंच्या आणि त्यांच्या संघटनांच्या विरोधातही खोट्या बातम्या प्रसारित केल्या जातात, हे हिंदू अनेक वर्षांपासून पहात आहेत. आता भारत सरकारनेही अशा प्रकारचा निर्णय घ्यावा, असेच हिंदूंना वाटते !

बीजिंग (चीन) – चीनने बीबीसी या वृत्तसमूहावर बंदी घातली आहे. बीबीसीने चीनच्या शिनजियांग प्रांत आणि कोरोना यांच्या संदर्भात अनेक खोट्या बातम्या प्रसारित केल्याचा आरोप चीन सरकारने केला आहे. ‘खोट्या बातम्या देण्याचे कोणतेही प्रकरण सहन केले जाणार नाही’, असे चीनने म्हटले आहे.

१. चीनने बंदीसंदर्भात जारी केलेल्या आदेशामध्ये ‘बीबीसी वर्ल्ड न्यूज’ने बातम्यांच्या संदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यामुळे सरकारी चित्रपट, टीव्ही आणि रेडिओ प्रशासनाने बीबीसीच्या प्रसरणासाठी देण्यात आलेली अनुमती रहित केली आहे. वार्षिक तत्त्वावर बीबीसीला देण्यात येणारी प्रसारणाची अनुमती तातडीने रहित करण्यात आली आहे.

२. चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे, ‘बीबीसी वर्ल्ड न्यूज’ने प्रसारणाच्या संदर्भातील निर्देशांचे उल्लंघन केले आहे. बातम्या खर्‍या आणि योग्य असाव्यात. बातम्या चीनच्या राष्ट्रहिताला मारक ठरणार नाहीत, अशा असाव्यात’, असेही वार्तांकनाच्या संदर्भातील निर्देशांमध्ये नमूद करण्यात आले आहे.