उपायांच्या कालावधीत श्रीरामाचा नामजप करणार्‍या साधकांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून तुळशींनी रक्षण करणे

प.पू. देवबाबा यांनी सांगितलेल्या उपायांच्या कालावधीत श्रीरामाचा नामजप करणार्‍या साधकांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून तुळशींनी रक्षण करणे

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.) या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

नाविन्यपूर्ण अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

प.पू. देवबाबा

परात्पर गुरु डॉक्टर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे महान कार्य करत असल्याने त्यांच्यावर सूक्ष्मातील मोठ्या वाईट शक्तींची सतत आक्रमणे होत असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य पूर्ण होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टर जिवंत असणे अत्यंत आवश्यक आहे, असे महर्षींनी आणि संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. वर्ष २००७ पासून परात्पर गुरु डॉक्टरांवर अनेकदा महामत्यूयोगाचे संकट आले आहे. परात्पर गुरु डॉक्टरांचा महामत्यूयोग टळून त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे, यासाठी महर्षि आणि संत यज्ञयाग, अनुष्ठाने, तसेच काही नामजपादी उपाय करण्यास सांगतात.

सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

फेब्रुवारी २०२० मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांची प्राणशक्ती अतिशय अल्प झाली होती. तसेच त्यांना होणार्‍या शारीरिक त्रासांत पुष्कळ वाढ झाली होती. परात्पर गुरु डॉक्टरांना होणारे त्रास न्यून व्हावे आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावे, यासाठी किन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबा यांनी नामजपादी उपाय म्हणून प्रतिदिन श्रीरामाचा १ घंटा नामजप करण्यास सांगितले. त्यानुसार ४.२.२०२० ते १.६.२०२० या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि काही साधक यांनी सामाजिक अंतर राखत प्रतिदिन १ घंटा श्रीरामाचा जप केला. जप करतांना त्यांच्या बाजूने चारही दिशांना १-१ तुळशीची कुंडी ठेवण्यास प.पू. देवबाबा यांनी सांगितलेे. या वेळी या चारही तुळशींतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.) या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन या चाचणीत चारही तुळशींची पुढील दिवशी निरीक्षणे करण्यात आली.

. ४.२.२०२० या दिवशी उपायांना आरंभ करण्यापूर्वी

आ. ५.२.२०२०, २४.२.२०२० आणि ६.३.२०२० या दिवशी नामजप करण्यापूर्वी आणि नामजप केल्यानंतर

इ. २.६.२०२० या दिवशी उपाय पूर्ण झाल्यानंतर

१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्‍लेषण : उपायांच्या कालावधीत चारही तुळशींवर झालेला परिणाम : चाचणीतील चारही तुळशींवर झालेला परिणाम साधारण सारखाच असल्याने पुढील सारणीत सर्वांची निरीक्षणे न देता, केवळ एकाच तुळशीची (तुळशी क्र. २ची) निरीक्षणे प्रातिनिधिक स्वरूपात दिली आहेत.

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

१. उपाय आरंभ करण्यापूर्वी (४.२.२०२० या दिनी नामजप करण्यापूर्वी) चारही तुळशींमध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नसून पुष्कळ सकारात्मक ऊर्जा होती.

२. दुसर्‍या दिवशी (५.२.२०२० या दिनी) नामजप करण्यापूर्वी चारही तुळशींमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा होती. नामजप केल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांच्यामध्ये पुष्कळ नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.

३. २४.२.२०२० या दिवशी नामजप करण्यापूर्वी चारही तुळशींमध्ये पुष्कळ नकारात्मक ऊर्जा होती आणि तुळस क्र. २ वगळता अन्य तिन्ही तुळशींमध्ये सकारात्मक ऊर्जाही होती. नामजप केल्यानंतर चारही तुळशींमधील नकारात्मक ऊर्जेत वाढ झाली. तुळस क्र. २ वगळता अन्य तिन्ही तुळशींमधील सकारात्मक ऊर्जा न्यून किंवा नाहीशी झाली. (२४.२.२०२० या दिवशी नामजपानंतर तुळस क्र. २ पूर्णपणे सुकून गेली. त्यामुळे त्या कुंडीत नवीन तुळस लावण्यात आली.)

४. ६.३.२०२० या दिवशी नामजप करण्यापूर्वी चारही तुळशींमध्ये नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा होत्या. नामजप केल्यानंतर त्यांच्यातील दोन्ही ऊर्जांत थोडी वाढ झाली.

५. २.६.२०२० या दिवशी चारही तुळशींमध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नसून पुष्कळ सकारात्मक ऊर्जा होती.

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

२ अ. तुळशीचे महत्त्व : तुळशीत श्रीविष्णुतत्त्व असते. तुळस सदैव देवतेचे तत्त्व प्रक्षेपित करत असल्यामुळे ती सभोवतालचे वातावरण शुद्ध आणि पवित्र करते. (तुळशीचे झाड २४ घंटे प्राणवायू सोडते, असे विज्ञानही सांगते.) वातावरणातील रज-तमाचा परिणाम प्रत्येक वस्तूवर होत असतो. तुळशीतून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक स्पंदनांमुळे वातावरणातील रज-तम नष्ट होते. थोडक्यात, तुळस ही सात्त्विक वनस्पती असून तिच्यामुळे वातावरणाची सतत शुद्धी होते. त्यामुळे पूर्वी घराघरांत प्रवेशद्वारापाशी तुळशी वृंदावन असायचे. घरातील स्त्रिया भक्तीभावाने तुळशीचे पूजन करून तिला नमस्कार अन् प्रार्थना करत. तसेच सायंकाळी तुळशीसमोर दिवा लावत. आजच्या विज्ञानयुगातही ग्रामीण भागात ही परंपरा जोपासली जाते.

सौ. मधुरा कर्वे

२ आ. संत आणि साधक यांनी केलेला श्रीरामाचा जप प्रतिदिन देवापर्यंत पोचत असणे : सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि अन्य साधक ४.२.२०२० पासून प्रतिदिन १ घंटा श्रीरामाचा जप करायचे. यामध्ये सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या चित्रांकडे पाहून जप करायचे, तर चारही दिशांना बसलेले साधक सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याकडे पाहून जप करायचे. श्रीरामाचा जप करतांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आली. ते म्हणाले, साधक करत असलेला जप माझ्याकडे यायचा आणि मग तो एकत्रित देवाकडे पोचायचा. असे प्रतिदिन होत होते. हा जप अतिशय भावपूर्ण होत होता. आम्ही सर्वजण डोळे उघडे ठेवून जप करायचो. डोळे बंद करून जप केल्यास त्याचा लाभ जप करणार्‍याला होतो. हा जप समष्टीसाठी करावयाचा असल्याने तो डोळे उघडे ठेवून करण्यात आला.

२ इ. श्रीरामाचा नामजप केल्यानंतर तुळशींमध्ये पुष्कळ नकारात्मक ऊर्जा निर्माण होणे किंवा तिच्यामध्ये वाढ होण्याचे कारण : प्रतिदिन उपायांच्या वेळी साधकांच्या नामजपात विघ्ने आणण्यासाठी वाईट शक्ती सूक्ष्मातून त्यांच्यावर आक्रमणे करत होत्या. ती आक्रमणे स्वतःवर झेलून तुळशी साधकांचे रक्षण करत होत्या. वाईट शक्तींनी केलेल्या आक्रमणांची तीव्रता पुष्कळ अधिक असून ती दिवसेंदिवस वाढत असल्याने तुळशींभोवती त्रासदायक शक्तींचे (नकारात्मक स्पंदनांचे) आवरण निर्माण होत असे किंवा त्यामध्ये वाढ होत असे.

२ ई. २४.२.२०२० या दिवशी नामजपानंतर तुळस क्र. २ पूर्णपणे सुकून जाणे : २४.२.२०२० या दिवशी वाईट शक्तींशी झालेल्या घनघोर सूक्ष्मयुद्धात तुळस क्र. २ हिने प्रार्णापण करून साधकांचे रक्षण केले. त्यामुळे नामजपानंतर ती पूर्णपणे सुकून गेली. तुळस मुळात सात्त्विक वनस्पती असून तिच्यामध्ये श्रीविष्णुतत्त्व (चैतन्य) आहे. तुळस क्र. २ सुकून गेलेली असूनही तिच्यामध्ये चैतन्य असल्याने तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली. (तुळस क्र. २ सुकून गेल्याने तिच्या जागी नवीन तुळस लावण्यात आली.)

२ उ. ६.३.२०२० या दिवशी नामजपानंतर तुळशींतील नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेत थोडी वाढ होण्याचे कारण : ६.३.२०२० या दिवशी सूक्ष्मयुद्धात वाईट शक्तींकडून प्रक्षेपित झालेल्या रज-तमामुळे तुळशींभोवतीच्या त्रासदायक स्पंदनांमध्ये थोडी वाढ झाली; पण त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा न्यून किंवा नाहीशी न होता त्यामध्ये थोडी वाढ झाली. यातून वाईट शक्तींचा जोर आधीच्या तुलनेत न्यून झाल्याचे लक्षात येते.

२ ऊ. २.६.२०२० या दिवशी तुळशींमध्ये नकारात्मक ऊर्जा नसून पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळणे : २.६.२०२० या दिवशी चारही तुळशींमध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नसून पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळली. याचे कारण हे की, १.६.२०२० या दिवशीच्या नामजपानंतर उपायांचा उद्देश पूर्ण झाल्याने त्यानंतर जप करणे थांबवण्यात आले. त्यामुळे वाईट शक्तींशी लढण्याचे तुळशींचे कार्य संपले. दुसर्‍या दिवसापासून तुळशींचे नेहमीचे कार्य म्हणेज देवतातत्त्व ग्रहण करून ते वातावरणात प्रक्षेपित करून वातावरणाची शुद्धी करण्याचे कार्य आरंभ झाले.

थोडक्यात, प.पू. देवबाबांनी सांगितलेल्या उपायांच्या कालावधीत श्रीरामाचा नामजप करणार्‍या साधकांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून तुळशींनी कशाप्रकारे रक्षण केले, ते या वैज्ञानिक चाचणीतून लक्षात आले. हे वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रभावी उपाय सांगणारे प.पू. देवबाबा यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता !

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१.१२.२०२०)

ई-मेल : [email protected]

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक