साधिकेने गायलेल्या सुगम संगीताचे साधकांवर झालेल्या परिणामांचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

कु. मधुरा चतुर्भुज यांनी गायलेल्या सुगम संगीताचा वाईट शक्तींचा त्रास नसणार्‍या आणि ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असणार्‍या साधकांवर झालेल्या परिणामांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘१९.७.२०१८ ते २३.७.२०१८ या कालावधीत कु. मधुरा चतुर्भुज यांनी सुगम संगीतातील काही प्रकार गायले. त्याचे कु. मधुरा भोसले यांनी सूक्ष्म परीक्षण केले. वाईट शक्तींचा त्रास नसणार्‍या आणि आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांहून अधिक पातळी असणार्‍या साधकांवर त्याचे पुढील परिणाम झालेले आढळले. पौष कृष्ण पक्ष दशमी (६.२.२०२१) या दिवशी कु. मधुरा यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने हे लिखाण प्रसिद्ध करत आहोत.

कु. मधुरा चतुर्भुज

कु. मधुरा चतुर्भुज यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने शुभेच्छा !

१. निसर्ग गीतांच्या वेळी जाणवलेली सूत्रे

‘केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर’ आणि ‘मानसीचा चित्रकार तू’, ही दोन निसर्ग गीते कु. मधुराने गायली.

१ अ. या गीतांच्या वेळी कु. मधुरा यांच्या त्रासाचे प्रमाण न्यून जाणवले आणि तिचे अस्तित्व अधिक प्रमाणात जाणवले.

१ आ. अनुभूती

१. मला पूर्ण चंद्राचे दर्शन होऊन प्रसन्नता जाणवली.

२. मी माझ्या मनात करत असलेला नामजप मला प्रतिध्वनित होतांना जाणवला.

२. राग यमन आणि राग बिहाग

कु. मधुरा भोसले

२ अ. शब्दांपेक्षा स्वरांचे सामर्थ्य अधिक असणे : सुगम संगीतातील इतर प्रकारांमध्ये शब्दांना महत्त्व असते. त्या तुलनेत रागामध्ये स्वरांना महत्त्व असते. शब्दांपेक्षा स्वरांचे सामर्थ्य अधिक असल्याचे मला जाणवले. त्यामुळे सुगम संगीतातील गाण्यांच्या तुलनेत कु. मधुराने गायलेले राग ऐकत असतांना माझ्या मनाची एकाग्रता आणि अंतर्मुखता वाढून भाव जागृत होण्याचे प्रमाण पुष्कळ अधिक होते.

२ आ. शास्त्रीय संगीतातील रागातून चांगली शक्ती अन् चैतन्य यांचे प्रक्षेपण होऊन सकारात्मक परिणाम होणे : शास्त्रीय संगीतातील राग यमन आणि राग बिहाग यांतून चांगली शक्ती अन् चैतन्य यांचे प्रक्षेपण झाल्यामुळे श्रोत्यांच्या मनावरील त्रासदायक शक्तीचे आवरण न्यून होऊन त्यांनी चैतन्य ग्रहण केल्याचे जाणवले.

३. लोकगीत

‘खंडेरायाच्या लग्नाला…’ आणि ‘गार डोंगराची हवा…’ लोकगीते कु. मधुराने गायली.

३ अ. लोकगीतांतून अल्प प्रमाणात सात्त्विकता आणि कनिष्ठ स्तरावरील चांगली शक्ती यांचे वातावरणात प्रक्षेपण होत होते.

३ आ. श्रोत्यांवर मंद स्वरूपाचे चैतन्यदायी उपाय होऊन त्यांच्या भोवती खंडोबा देवाच्या आणि अंबाबाईच्या उग्र शक्तीचे संरक्षककवच कार्यरत झाले.

३ इ अनुभूती

३ इ १. लोकगीते चालू असतांना प्रथम मोगर्‍याचा आणि नंतर चंदनाचा मंद सुगंध ध्वनीचित्रीकरण कक्षात दरवळला. हा सुगंध दोन साधकांना आला.

३ इ २. या गाण्यांचे ध्वनीमुद्रण करण्यासाठी वापरण्यात येणारा संगणक बंद पडणे आणि संतांनी नामजपादी उपाय केल्यावर संगणक पुन्हा चालू होणे : लोकगीताचे ध्वनीमुद्रण करतांना अडथळे निर्माण करण्यासाठी वाईट शक्तींनी ध्वनीमुद्रण चालू असणार्‍या संगणकावर सूक्ष्मातून आक्रमण केल्यामुळे तो संगणक बंद पडला. त्या वेळी सद्गुरु मुकुल गाडगीळ यांनी संगणकावरील आवरण दूर करून त्यासाठी नामजपादी उपाय केले. त्यानंतर काही वेळाने संगणक चालू झाला.

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.७.२०१८, रात्री ११.१५)


कु. मधुरा चतुर्भुज यांच्या संगीत प्रयोगाच्या वेळेस कु. तृप्ती कुलकर्णी यांना झालेले त्रास आणि शिकायला मिळालेली सूत्रे

१. ‘यमन’ राग

१ अ. कु. मधुरा चतुर्भुज यांनी ‘यमन’ राग म्हणतांना मन एकाग्र होऊन नामजप चांगला होणे : १७.७.२०१८ या गायनाच्या वेळी पहिल्या दिवशी कु. मधुरा चतुर्भुज यांनी व्यासपिठावर बसून ‘यमन’ राग म्हणायला आरंभ केल्यावर आयुष्यात प्रथमच हा राग ऐकत असूनही ‘मी पूर्वी कधीतरी हे ऐकले आहे आणि बर्‍याच काळानंतर पुन्हा ऐकण्याची संधी मिळत आहे’, असे वाटून देवाप्रती कृतज्ञता वाटत होती आणि ‘त्या स्वरांनी माझे कान तृप्त होत आहेत’, असे वाटत होते. त्या वेळी मन एकाग्र होऊन नामजप चांगला होत होता.

१ आ. कु. मधुरा चतुर्भुज यांनी म्हटलेल्या ‘यमन’ रागाची ध्वनीफीत सर्वांना ऐकवणे : कु. मधुरा चतुर्भुज यांनी म्हटलेल्या ‘यमन’ रागाची ध्वनीफीत (ऑडियो) सर्वांना ऐकवायला आरंभ केल्यावर पुष्कळ त्रास होऊ लागला. ‘त्या रागातील स्वरांचे शरिरावर फटके बसत आहेत’, असे जाणवत होते. (साधिकेला तीव्र आध्यात्मिक त्रास असल्याने रागाच्या माध्यमातून तिला चैतन्य मिळाल्याने साधिकेला त्रास झाला. – संकलक)

२. कु. मधुरा चतुर्भुज यांचे जाणवलेले वैशिष्ट्य

कु. मधुरा चतुर्भुज यांना स्वतःला तीव्र त्रास आहे; पण अशा स्थितीतही त्या व्यासपिठावर येऊन सर्वांसमोर गाणी म्हणतात. याचेच मला पुष्कळ कौतुक वाटले. त्या गाणी म्हणत असतांना त्यातील चैतन्यामुळे अन्य साधकांना त्रास होत असतो. असे असूनही कु. मधुरा यांची गाणे म्हणण्यातील एकाग्रता अजिबात भंग होत नाही. त्या गोंधळत नाहीत. गाणे म्हणण्यास चुकत नाहीत. त्या स्थिर चेहर्‍याने भावपूर्ण गाणे म्हणत असतात. एखादा साधक जरी मोठ्या आवाजात नामजप करत असला, तरी आपले मन एकाग्र होऊ न शकल्याने आपला नामजप नीट होत नाही. स्वतःला तीव्र त्रास असतांना एवढी एकाग्रता होणे अशक्यच आहे.

३. कु. मधुरा यांची साधना आणि तळमळ यांमुळे तीव्र त्रास असणार्‍या साधकांना चैतन्य मिळते !’ – एक संत

‘कु. मधुरा यांनाही तीव्र त्रास आहे आणि गायनाच्या वेळी सर्वांना त्रासच होत असतो. एखाद्या सात्त्विक व्यक्तीमुळे उपाय होतात, हे समजू शकते; पण कु. मधुरा यांना त्रास असतांना आम्हाला चैतन्य नेमके कोणत्या कारणाने मिळते ?’, असे मी एका संतांना विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मधुराने १५ वर्षे ती जेव्हा बरी असेल, तेवढ्या वेळेत साधना केली आहे आणि तिच्यात तळमळही आहे. त्यामुळे चैतन्य मिळते. गायनाच्या वेळी त्रासाचे प्रमाण उणावून सर्व साधकांना चैतन्य मिळते. संतांना त्रास नसल्याने त्यांच्यामध्ये साधनेने पुष्कळ चैतन्य निर्माण झाल्याने त्यांच्या सहवासात सर्व साधकांना अखंड चैतन्य मिळते. मधुराला तीव्र त्रास असल्याने अखंड चैतन्य मिळू शकत नाहीत; पण थोडा वेळ का होईना, चैतन्य मिळू शकते.’’

संतांच्या या वाक्यावरूनच ‘कलियुगात स्वतःच्या मनाने साधना करण्यापेक्षा गुरुकृपायोगानुसार साधना करणे आवश्यक का आहे’, याचे महत्त्व लक्षात आले. मागील जन्मीच्या साधनेचे पाठबळ नसतांना या जन्मी तीव्र त्रास होत असतांना त्यावर मात करून साधना करणे कठीण आहे आणि या जन्मी तीव्र त्रासावर मात करून केलेल्या थोड्याफार साधनेमुळे स्वतःमध्ये जे काही थोडेफार चैतन्य निर्माण होईल, त्या चैतन्याच्या बळावर स्वतःचा त्रास न्यून होऊन अन्य तीव्र त्रास असणार्‍या जिवांसाठी चैतन्यदायी उपाय करणे, हे तर अशक्यप्रायच ! साधकांच्या एवढ्या तुटपुंज्या साधनेनेही साधकांचे रक्षण करणारे आणि प्रगती करून घेणारे परात्पर गुरु डॉक्टर या जन्मात लाभले, यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी थोडीच !’

– कु. तृप्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.७.२०१८)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक