आगीसारख्या जीवघेण्या समस्येविषयी शासकीय रुग्णालये आणि कार्यालये येथील अधिकारी निष्काळजी असतील, तर संबंधितांंना कठोर शिक्षाच होणे अपेक्षित आहे.
पुणे (बारामती) – भंडारा येथील आग दुर्घटना, तसेच सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग या दुर्घटनांनंतरही राज्यासह बारामतीमधील शासकीय आणि खासगी रुग्णालयांनी काळजी घेतली नसल्याची गंभीर गोष्ट समोर आली आहे. बारामती येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण महिला रुग्णालय, रुई ग्रामीण रुग्णालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती नगरपालिका, प्रशासकीय भवन, तसेच शहरातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंद असलेल्या ४ खासगी रुग्णालयांचे अनेक दिवसांपासून फायर ऑडिटच झालेले नाही. तर अनेक ठिकाणी आग विझवण्यासाठी लावण्यात आलेल्या सिलेंडरची मुदत संपलेली आहे. तसेच फायर फायटिंग बॉक्सची दुरवस्था झाली असून ते केवळ शोभेपुरतेच असल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे आग लागल्यास ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या गॅस सिलेंडरचा वापर कसा करावा, याविषयी येथील अनेक कर्मचारी अनभिज्ञ असल्याचेही लक्षात आले आहे. यावर आगीसंदर्भात उपाययोजनेमध्ये त्रुटी असतील, तर त्या तात्काळ मार्गी लावल्या जातील, असे अधिष्ठाता डॉ. सदानंद काळे यांनी सांगितले.