वाराणसी सेवाकेंद्राच्या प्रांगणात झालेले गरुडदेवतेचे दर्शन !

श्री गरुड देवता

१. वाराणसी सेवाकेंद्रावरून उडत जाणार्‍या गरुड पक्षाचे दर्शन होणे आणि ‘तो गरुड फार मोठा आहे’, असे वाटणे, काही क्षणांतच तो गरुड सेवाकेंद्राच्या प्रांगणात असलेल्या जांभळाच्या झाडावर येऊन बसणे

‘एक दिवस दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मी वाराणसी सेवाकेंद्राच्या दाराबाहेरील पायर्‍यांवर बसलो होतो. तेवढ्यात ‘आकाशात काहीतरी आहे’, असे वाटून माझे लक्ष सहज आकाशाकडे गेले. तेव्हा आकाशात सेवाकेंद्रावरून पूर्वेकडून पश्‍चिमेकडे एक गरुड उडत जातांना दिसला. या गरुडाचा आकार नेहमीपेक्षा फार मोठा होता. सेवाकेंद्राच्या प्रांगणात एक जांभळाचे झाड आहे. काही क्षणांतच तो गरुड पक्षी उत्तर दिशेकडून येऊन जांभळाच्या झाडाच्या वरच्या फांदीवर बसला. त्या वेळी आकाशात अजून एक गरुड पक्षी घिरट्या घालत होता.

श्री. प्रशांत वैती

२. गरुड पहाण्यासाठी आणि त्याचे छायाचित्र काढण्यासाठी साधकांना बोलवणे; मात्र त्याचे छायाचित्र काढता न येणे

गरुड जांभळाच्या झाडावर येऊन बसलेला पाहून मी सेवाकेंद्रातील अन्य साधकांना हाक मारून बोलावले. साधक आल्यावर काही क्षणांतच जांभळाच्या झाडावर बसलेला गरुड उडून पश्‍चिम दिशेकडे गेला. साधकांनी गरुडाचे छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना त्याचे छायाचित्र काढता आले नाही. तो उडून जात असतांना ‘हा गरुड नेहमीपेक्षा वेगळा आहे’, असे मला पुन्हा जाणवले.

३. नेहमी दिसणारा गरुड आणि सेवाकेंद्रातील जांभळाच्या झाडावर बसलेला गरुड यांच्यात जाणवलेला भेद !

सेवाकेंद्रातील जांभळाच्या झाडावर बसलेला गरुड आणि आकाशात घिरट्या घालणारा गरुड या दोहोंमध्ये मला फार भेद जाणवला. आकाशात घिरट्या घालणारा गरुड जांभळाच्या झाडावर बसलेल्या गरुडापेक्षा आकाराने लहान होता आणि काळ्या रंगाचा होता, तर जांभळाच्या झाडावर बसलेला गरुड मला भव्य वाटला. त्याची मान पांढर्‍या रंगाची होती अन् उर्वरित शरीर गडद तपकिरी रंगाचे होते.

४. एरव्ही काही वेगळे जाणवल्यावर संत किंवा उत्तरदायी साधक यांना न सांगणे; मात्र या गरुडाला पाहून त्याविषयी त्वरित कळवणे

भव्य गरुड पक्षी पाहून मला फार चांगले वाटत होते आणि मला हा ‘गरुड काही तरी वेगळा आहे’, असेही मनात आले. मी सेवाकेंद्रात ‘गरुड’ पाहिल्याविषयी त्वरित संत आणि उत्तरदायी साधक यांना कळवले.

नेहमी असे काही वेगळे घडल्यावर माझ्याकडून लगेच संतांना सांगितले जात नाही. ते सेवेत असल्यामुळे सेवाकेंद्रातील अन्य साधकांना ते सूत्र सांगितले जाते. ‘अन्य साधकांकडून ते सूत्र त्यांना कळेल’, अशी माझ्या मनाची विचारप्रक्रिया असते; पण त्या दिवशी मी सहजरित्या संतांकडे जाऊन ‘मला सेवाकेंद्रातील जांभळाच्या झाडावर गरुड बसलेला दिसला’, असे सांगितले.

‘गुरुकृपेने मला गरुडदेवतेचे दर्शन झाले आणि गुरुकृपेमुळेच मला ते लिहून देता आले’, त्याबद्दल गुरुचरणी कतज्ञता !’

– श्री. प्रशांत वैती, वाराणसी सेवाकेंद्र

‘साधकांना गरुडाचे दर्शन होणे’, हा दैवी संकेत !

पू. नीलेश सिंगबाळ

‘साधकांना गरुड दिसले. त्या कालावधीत रामनाथी आश्रमात गरुड पक्षी याग चालू झाला आहे’, हे मला नंतर समजले. त्याच दिवशी वाराणसी सेवाकेंद्रातील काही साधकांना सेवाकेंद्राच्या प्रांगणात आणि आकाशात २ गरुडांचे दर्शन झाले. हा एक दैवी संकेत होता’, असे मला वाटले.’

– (पू.) श्री. नीलेश सिंगबाळ, वाराणसी

श्री. प्रशांत वैती यांना आलेल्या अनुभूती

१. जीवनात आलेल्या समस्या स्वतःच्या प्रगतीसाठीच आहेत’, याची जाणीव क्षणोक्षणी होत असणे आणि श्री गुरुकृपेमुळे वैयक्तिक अडचणींवर मात करता येणे : ‘मागील ९ ते १० मासांपासून (महिन्यांपासून) माझ्या वैयक्तिक अडचणी वाढल्या आहेत, तरीही ईश्‍वर मला स्थिर ठेवत आहे. ‘माझ्या जीवनात आलेल्या समस्या या माझ्या प्रगतीसाठीच आहेत’, असे मला या सर्व प्रसंगांतून जातांना जाणवते. गुरुदेव माझ्या समस्यांच्या माध्यमातून माझी साधना करवून घेत आहेत. माझी काळजी घेणार्‍या माझ्या गुरुमाऊलीच्या चरणी मी कृतज्ञता व्यक्त करतो.

२. रामनाथी आश्रमातील शिबिरात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मार्गदर्शनातून पुष्कळ ऊर्जा, चैतन्य आणि आनंद मिळणे : जून २०१९ या मासात झालेल्या शिबिरात मला पुष्कळ वेगळेपणा जाणवत होता. शिबिराच्या दुसर्‍या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करणे’, या विषयावर मार्गदर्शन केले. तेव्हा सदगुरु डॉ. पिंगळेकाका यांनी सांगितले, ‘‘सर्व साधक मनाच्या रणांगणावर स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या चक्रव्यूहात अभिमन्यू झाले आहेत. त्यांना चक्रव्यूह भेदता येत नाही; म्हणून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मार्गदर्शनरूपी गीतेतून सर्व अभिमन्यूंचे अर्जुन होत आहेत.’ त्यामुळे या सत्संगातून पुष्कळ ऊर्जा, चैतन्य आणि आनंद मिळत होता. ईश्‍वराने हा सत्संग अनुभवायला दिल्यामुळे पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होत होती.’’

– श्री. प्रशांत वैती

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक