सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग किल्ल्यासह जिल्ह्यातील जलदुर्गांची वर्तमानस्थितीत होत असलेली पडझड थांबवावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या या ऐतिहासिक ठेव्याचे जतन करावे, अशी मागणी माऊंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट या संस्थेने एका निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाकडे केली आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की,
१. मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याची पडझड होत आहे. मालवण शहरातील बंदराच्या पश्चिमेस असलेल्या कुरटे बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांनी २९ मार्च १६६७ या दिवशी या जलदुर्गाची वास्तूशांती केली. ४८ एकर क्षेत्रातील हा जलदुर्ग अजूनही अभेद्य आहे.
२. देशविदेशातून लाखो पर्यटक या किल्ल्यास भेट देतात. शिवप्रेमी वारंवार त्याची स्वच्छता करत असतात; परंतु आता असे निदर्शनास येते की, तटाच्या भिंतीवर वड, पिंपळ ही झाडे आणि झुडुपे यांची पाळेमुळे पसरली आहेत. त्यामुळे ही तटबंदी आतून ठिसूळ होत चालली आहे. भविष्यात या ठिसूळपणामुळे तटबंदीला धोका निर्माण होऊ शकतो.
३. भविष्यातील किल्ल्याच्या सुरक्षेचा विचार करता आधुनिक तंत्रज्ञान वापरून या झाडांमुळे तटबंदीला धोका पोचणार नाही, अशी योजना आखणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमी संस्था सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास सिद्ध आहेत.
४. सिंधुदुर्ग किल्ल्यास ३५० वर्षे होऊन गेली आहेत. येथे असलेल्या एकमेव शिवराजेश्वर मंदिराचा मंडप वर्ष १९०६ ते १९०७ च्या सुमारास करवीरकर छत्रपती शाहूंनी बांधला होता. या किल्ल्यासारखा दुसरा किल्ला भारतात नाही.
५. येथेे येणार्या पर्यटकांचा विचार करता सार्वजनिक स्वच्छतागृह, महिलांसाठी एखादे विश्रांतीस्थान, कचराकुंडीची व्यवस्था आणि कचर्याची विल्हेवाट लावणे आदी प्राथमिक सुविधांची सोय होणे आवश्यक आहे.
६. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी आणि वायरी (तालुका मालवण) गावचे सरपंच यांना पाठवण्यात आली आहे.