१३ वर्षे संघर्ष करूनही न्याय मिळत नसल्याने प्रजासत्ताकदिनी आत्मदहन करणार !

वीरपत्नी वृषाली महादेव तोरस्कर यांची चेतावणी

वीरपत्नी वृषाली महादेव तोरस्कर

कोल्हापूर, २५ जानेवारी – हुतात्मा पतीच्या नावे असलेल्या दोन गुंठ्याच्या भूमीवर बांधकाम करण्यासाठी १३ वर्षे संघर्ष करत आहे. १३ वर्षे संघर्ष करूनही न्याय मिळत नसल्याने प्रजासत्ताकदिनी आत्मदहन करणार आहे, अशी चेतावणी वीरपत्नी वृषाली महादेव तोरस्कर यांनी पत्रकार परिषेदत दिली. (देशासाठी हुतात्मा झालेल्या सैनिकाच्या वीरपत्नीस जर १३ वर्षे न्याय मिळत नसेल, तर प्रशासनासाठी हे लज्जास्पद आहे ! अशा संवेदनशील प्रकरणात प्रशासनाने तातडीने लक्ष घाऊन वीरपत्नीस दिलासा देणे आवश्यक आहे ! – संपादक)

१. गडहिंग्लज येथील वृषाली तोरस्कर यांचे पती महादेव तोरस्कर हे वर्ष २००१ मध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात हुतात्मा झाले. त्याविषयी शासनाने वर्ष २००७ मध्ये
त्यांना बड्याची वाडी येथील विजयनगर येथे दोन गुठ्यांची भूमी दिली. वर्ष २००८ मध्ये बांधकाम करण्यासाठी साहित्य आणून बांधकाम करण्यास प्रारंभ केल्यावर त्याला काही लोकांना विरोध केला.

२. या प्रकरणी न्यायालयाने तोरस्कर यांच्या बाजूने निकाल देऊनही, हे बांधकाम करण्यास दोन स्थानिक लोक विरोध करत आहेत.

३. याच कालावधीत माझ्यासमवेत दुसर्‍या वीरपत्नीला त्याच ठिकाणी मिळालेल्या भूमीवर त्यांचे बांधकामही पूर्ण झाले. याउलट मला मात्र बांधकाम करण्यास विरोध केला जात आहे. या भूमीवर कोणत्याही प्रकारचे आरक्षण नसतांना सातत्याने बांधकामासाठी स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. याकडे प्रशासनाने गंभीरपणे लक्ष दिले नाही.

४. या प्रकरणी आजी-माजी सैनिक संघटनेने अनेक वेळा आंदोलन करून निवेदन दिले आहे; मात्र त्यालाही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.

५. देशासाठी पती हुतात्मा होऊनही १३ वर्षे हा संघर्ष लागत असल्याने या सर्व त्रासाला कंटाळून प्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे, असे वृषाली महादेव तोरस्कर यांनी सांगिले.

६. या प्रसंगी आजी-माजी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत हंडे, बी.जी. पाटील, कुमार पाटील, तुकाराम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.