गरीब भारत !

भारत हा विकसनशील देश आहे. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेला भारत हा गरीब देश आहे; मात्र गेल्या ७४ वर्षांत भारतात अनेक स्थित्यंतरे आली आहेत. वर्ष १९९१ मध्ये खासगीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर भारतातील लोकांच्या हातात पैसा खेळू लागला आणि कोट्यधीश असणार्‍यांची संख्या वाढू लागली. भारतही तथाकथित आधुनिकतेकडे अग्रेसर होऊ लागला. यातूनच पुढे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे समोर येऊ लागले. वर्ष १९८७ मध्ये बोफोर्स घोटाळा चर्चेत येण्यापूर्वी किंवा नंतरच्या काही वर्षांत काही शे कोटी रुपयांचा घोटाळा झाला, असे ऐकू आले नाही; मात्र नंतरच्या काही वर्षांत देशात घोटाळे होऊ लागल्याचे समोर येऊ लागले. त्यात २-जी स्पेक्ट्रम, कोळसा खाण वाटप, आदर्श, राष्ट्रकुल, संचयनी, शारदा, हे त्यातील काही महत्त्वाचे घोटाळे होत. या घोटाळ्यांतील रक्कम असो किंवा एकूणच काळ्या व्यवहाराची रक्कम असो ती स्विस बँकांमध्ये ठेवण्यात येते, असे सांगितले जाते; मात्र स्वित्झर्लंडमध्ये यासंदर्भातील कायदे ओळख घोषित न करणारे असल्याने भारताला किती भारतियांचे पैसे तेथे आहेत, हे समजणे कठीण जात होते आहे. गेल्या काही वर्षांत स्वित्झर्लंडशी करार झाल्याने काही जणांची नावे सरकारला मिळाली आहेत; मात्र ती घोषित करण्यात आलेली नाहीत. असे असले, तरी प्रत्येक भ्रष्टाचार्‍याला विदेशातील अशा बँकांत पैसे ठेवता येतात, असे नाही; मग तो घरात किंवा इतर ठिकाणी ही रक्कम लपवून ठेवतो किंवा देशातच विविध गोष्टींमध्ये गुंतवणूक करून ठेवतो. देशात आयकर विभाग असला, तरी त्याला असणारी मर्यादा किंवा राजकीय दबाव यांमुळे अशांवर कारवाई फारच अल्प होते. त्यातही आता आयकर विभागाने राजस्थानची राजधानी जयपूर येथे सराफा व्यापारी आणि २ विकासक यांच्या ठिकाणांवर धाड टाकून १ सहस्र ७०० कोटी रुपयांची संपत्ती उघड केली आहे. राजस्थानच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच इतकी संपत्ती अशा धाडीमध्ये हाती लागली आहे. २०० कर्मचारी ५ दिवस या धाडीचे काम करत होते. या भ्रष्टाचार्‍यांच्या तळघरामध्ये ७०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या वस्तू दडवून ठेवण्यात आल्या होत्या. अशा प्रकारच्या धाडी देशात कुठेनाकुठे पडतच असतात आणि शेकडो कोटी रुपयांचा काळा पैसा उघड होत असतो. याचे पुढे काय होते, हे अनेकदा जनतेला कळत नाही. जनतेच्या मनातही प्रश्‍न असतो की, उघड करण्यात आलेली रक्कम खरी आहे कि आयकर विभागाने यातील काही रक्कम स्वतःकडे ठेवून काही रक्कम उघड केली ? जनतेचाही अशा धाडींवर पूर्ण विश्‍वास नाही. या धाडींचा अर्थ इतकाच की, भारत आता गरीब देश राहिलेला नाही. काही मूठभर लोकांकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती एकवटली आहे. ही संपत्ती वैध आहे, असे नाही, तर यातील मोठा भाग अवैध म्हणजे काळा पैसा आहे. तो बाहेर काढण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला; मात्र त्यांना अधिक यश मिळू शकले नाही. मोगल आणि इंग्रज येण्यापूर्वी भारतातून सोन्याचा धूर निघत होता, हे सत्य आहे आणि आताही तो निघू शकण्याची भारताची क्षमता आहे; मात्र आवश्यकता आहे ती धर्माधिष्ठित आणि जनतेला साधना शिकवणार्‍या शासनकर्त्यांची ! असे शासनकर्ते मिळाले की, भारत पूर्ण श्रीमंत देश होऊ शकतो. हे साध्य करण्यासाठी धर्माचरणी हिंदूंनी प्रयत्न केले पाहिजेत !