सुरक्षेच्या दृष्टीने हे कितपत योग्य आहे ?
मुंबई – राज्यातील पर्यटनवृद्धीसाठी लंडन आणि भारतीय संसदेच्या धर्तीवर आता महाराष्ट्र विधानमंडळही जनतेसाठी खुले करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी संयुक्त बैठकीत घेतला आहे. गौरवशाली वारसा लाभलेली ही वास्तू सर्वांना बघण्यासाठी खुली व्हावी आणि त्याद्वारे पर्यटनाला चालना मिळावी, हा यामागील उद्देश आहे.
या वेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, ‘‘महाराष्ट्र विधानमंडळाला अनन्यसाधारण परंपरा लाभलेली आहे. या विधानमंडळातून अनेक दिग्गजांनी लोकसेवेची कारकीर्द गाजवली आहे. महाराष्ट्र विधानमंडळाने संमत केलेले अनेक कायदे देशपातळीवरही स्वीकारले गेले आहेत. गौरवशाली इतिहास लाभलेली वास्तू सामान्य जनतेला बघण्यासाठी खुली करणे आवश्यक आहे. त्यातून नव्या पिढीला प्रेरणा आणि दिशा मिळेल.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘विधानमंडळ जनतेसाठी खुले करण्यामुळे पर्यटन, तसेच रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल. या संदर्भात पर्यटन विभागाकडून सकारात्मकदृष्ट्या सहकार्य केले जाईल. पर्यटन विभाग, विधानमंडळ सचिवालय आणि गृह विभाग यांच्याकडून संयुक्तपणे नियमावली सिद्ध करण्यात येईल.’’ स्वागत कक्ष, पर्यटकांचे स्क्रीनिंग, ऑनलाइन आरक्षण अशा विविध सुविधा उपलब्ध करण्याचेही निर्देश ठाकरे यांनी दिले आहेत.