मुंबईत नवजात बालकांची विक्री-खरेदी करणारी टोळी अटकेत; आधुनिक वैद्यासह परिचरिकांना अटक

सौजन्य – ZEE २४ तास

मुंबई – मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने नवजात बालकांची विक्री आणि खरेदी करणार्‍या टोळीला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये एक आधुनिक वैद्य, एक परिचारिका आणि एक लॅब टेक्निशियन यांचा समावेश आहे. या प्रकरणात पोलिसांनी ७ महिला आणि २ पुरुष यांसह ९ जणांना अटक केली आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट १ चे अधिकारी योगेश चव्हाण यांनी सांगितले की, ही टोळी मुलांच्या जन्मादात्यांकडून ६० सहस्र ते दीड लाख रुपयांपर्यंत बाळांना विकत घेत असे आणि नंतर ज्या जोडप्यांना बाळांची आवश्यकता आहे, अशांना अडीच लाख ते साडेतीन लाख रुपयांना विकत होती.

वांद्रे येथील खेरवाडी भागात काही लोकांनी मुलांची विक्री केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तेथे सापळा रचून तीन जणांना कह्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान या संपूर्ण टोळी विषयी माहिती मिळाली, अशी माहिती पोलिसांनी दिली.