श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीची काढण्यात येणार रथांतून मिरवणूक !

श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरिणीचे मंदिर, परिसर आणि दीपस्तंभ

नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नम: ।
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणता स्मरताम ॥

सोमवार, १८ जानेवारीपासून जत्रोत्सवाला प्रारंभ होत असून शनिवार, २३ जानेवारीपर्यत विविध धार्मिक कार्यक्रमांनुसार जत्रोत्सव साजरा केला जाणार आहे. १८ जानेवारी या दिवशी सकाळी धार्मिक विधी झाल्यावर बारा गावकर नमनाला बसणार आहेत. रात्री देवीची पालखी मिरवणूक आणि जागर होणार आहे.

१९ जानेवारीला सकाळी धार्मिक विधी, देवीला महाभिषेक आणि रात्री १० वाजता देवीची अंबारी रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.

अंबारी रथ

२० जानेवारीला धार्मिक विधी, महाभिषेक आणि जागर झाल्यावर देवीची फुलांच्या रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.

फुलांचा रथ

२१ जानेवारीला देवी विजयरथावर विराजमान होणार असून उपस्थित भक्त देवीची विजयरथातून मिरवणूक काढणार आहेत.

विजय रथ

२२ जानेवारीला सकाळी धार्मिक विधी, जागर आणि इतर विधी झाल्यावर शनिवार, २३ जानेवारीला पहाटे ६ वाजता देवीची महारथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.

महारथ

शनिवार, २३ जानेवारीला जागराने जत्रोत्सवाची सांगता होणार आहे. रविवार, २४ जानेवारीपासून देवीला अर्पण केलेल्या दागिन्यांची आणि कपड्यांची पावणी (लिलाव) होणार आहे.

कोरोनामुळे यंदा फेरी (दुकाने)नाहीत

कोविड महामारीमुळे जत्रोत्सव यंदा मोठ्या प्रमाणात साजरा न करण्याचा निर्णय महाजन सभेने घेतला असून जत्रोत्सव कोविड महामारीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून साजरा करण्यात येणार असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष नितीन देसाई यांनी सांगितले.

जत्रोत्सवात यंदा कोविडच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करतांना फेरी भरणार नसून जत्रोत्सवाचा भाग म्हणून काही पारंपरिक खाज्याचे मांड, फुले आणि केळी यांचे विक्रेते, तसेच अबीर गुलालाच्या मांडानाच अनुमती देण्यात येणार आहे.

श्री शांतादुर्गा कुकळ्ळीकरिण देवस्थान हे एक जागृत देवस्थान असून मागणीची देवी आणि नवसाला पावणारी देवी म्हणून कुुंकळ्ळीकरिणीची ख्याती असून देवीचे भक्त जत्रोत्सवाला देवीचे दर्शन घेण्यास हमखास उपस्थिती लावतात.

भक्तांनी स्वत:च्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घेतांना कोविडचा प्रसार रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे अन् सूचनांचे काटेकोरपणे  पालन करावे, अशी विंनती संस्थान समितीने केली आहे. मास्कचा आणि सॅनिटायझरचा वापर भक्तांनी करावा अन् सामाणिक अंतराचे पालन करावे असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष श्री. नितीन देसाई, समितीचे मुखत्यार श्री. रमेश देसाई, कोषाध्यक्ष श्री. प्रशाल देसाई आणि सचिव श्री. नीलेश देसाई यांनी केले आहे.