श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीचा जत्रोत्सव

श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीचा जत्रोत्सव पौष शुक्ल पक्ष पंचमी (सोमवार, १८ जानेवारी २०२१) ते पौष शुक्ल पक्ष दशमी (शनिवार, २३ जानेवारी २०२१) या कालावधीत साजरा होत आहे. त्यानिमित्त हा लेख प्रसिद्ध करत आहोत.

श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण

इतिहास

कुंकळ्ळी, गोवा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण ही पाचव्या शतकापासून कुंकळ्ळीची मंगलदायिनी आहे. परमपूज्य पिताश्री सत्पुरुषाने पाचव्या शतकात कुंकळ्ळीच्या पठारावर आपला ज्ञानदंड मारून निर्मळ स्वच्छ जागा निश्‍चित केली. सौभाग्यवती श्री सत्पुरुषाच्या पत्नीने ही पुण्यभूमी पवित्र मानून कुंकूहळ्ळीला कुंकवाने भांग भरला. ‘कुंकू’ म्हणजे सौभाग्याचा टिळा, हळ्ळी याचा अर्थ कन्नड भाषेत गाव या नावाचा अपभ्रंश होऊन कुंकूहळ्ळीला ‘कुंकळ्ळी’ हे नाव पडले. श्री शांताईच्या आशीर्वादाने श्री सत्पुरुषाने गावचा कारभार चालवला. त्याला सात पुत्र आणि एक कन्या होती. कुंकळ्ळीचा कारभार चालवण्यासाठी सत्पुरुषाने आपले ७ पुत्र, तसेच अन्य ५ पुरुष सिद्धकाली, लोकोकाली, बांदेकर, रोवणो आणि बॅकलो, अशी बारा वांगड्यांची निर्मिती केली. बारा वांगडी कुंकळ्ळीचे भागीदार झाले आणि आपापल्या दायित्वाने देवकार्य करू लागले. प्रत्येक समारंभाला १२ वांगड्यांची आवश्यकता भासायची.

श्री खंडेराय

काही काळानंतर वर्ष १५६२ मध्ये धर्मांध वृत्तीचे पोर्तुगालचे जेजूईट पाद्री सैनिक साळ नदीतून मोठ्या प्रमाणावर धर्मांतर चालू करण्यास या पुण्यभूमीवर आले आणि हिंदूंना बाटवू लागले. कुंकळ्ळीला व्हाईसरॉयचा एक दूत आला. संशयाने त्याला पकडून मारहाण करून त्याच्याकडील पत्रे, दस्तऐवज काढून घेण्यात आली. त्यावर रायचूर किल्ल्याचा कप्तान गोमी जियानिसे दे फिगरेदो याने कुंकळ्ळीवासियांची काही घरे, मंदिरे जाळून टाकली. काही युवकांना जिवे मारण्यात आले. यावर प्रतिक्रिया म्हणून १२ वांगड्यांनी वेळ न गमावता जेजूईट पाद्य्रांना आणि काही सैनिकांना यमसदनी पाठवले. पोर्तुगिजांनी शांतता प्रस्तावाच्या बहाण्याने १६ देसाई युवकांना जीविताची हमी देऊन आसोळणा किल्ल्यात येण्याचे निमंत्रण दिले. शांतीचर्चा झाल्यावर या देसाईंना जाळून मारण्यात आले. ही क्रांती ज्योत तेवत ठेवणारे हे १६ वीर देसाई-काळू नाईक, मुळको नाईक, वाघ नाईक, सांतू च्याती, रामा नाईक, खात्रू नाईक, शाबू नाईक, टोपी नाईक, जंग नाईक, पोळपुटो नाईक, बचरो नाईक, शांत शेट, विठोबा नाईक, येसू नाईक, गुणो नाईक आणि जिबलो नाईक या सर्वांनी आपला धर्म, देव, गाव सांभाळण्यासाठी आपल्या रक्ताचे सिंचन केले, तसेच युगानुयुगे पिढ्यान्पिढ्या बारा वांगड्यांचे वंशज देवकार्याची परंपरा चालू ठेवत आले.

पूर्वी श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरिणीचे मंदिर कुंकळ्ळीच्या आंगडीच्या आसपास साऊद सायबिणीचे आज चर्च उभे आहे, त्या जागी होते आणि तळे भाटात आकार उंदीगीचे मंदिर होते. काही काळानंतर वर्ष १५८३ मध्ये देवस्थानच्या सर्व मूर्ती फातर्पा येथे नेण्यात आल्या. मंदिराची पहिली पायाभरणी वर्ष १६०६ मध्ये झाली आणि वर्ष १६१५ मध्ये मंदिराचे काम पूर्ण झाले. काही काळानंतर मंदिराची जागा अपुरी पडू लागल्यावर वर्ष १८२२ ते १८२५ या कालावधीत दुसर्‍यांदा काम पूर्ण केले. ५ जानेवारी १९१५ या दिवशी देवस्थानची नियमावली सिद्ध (तयार) करून राज्यपालांच्या वतीने ती संमत करण्यात आली. वर्ष १९८४ मध्ये मंदिराच्या नूतनीकरणासाठी नव्याने पायाभरणीचा (शिलान्यास) समारंभ ८.१२.१९८४ या दिवशी झाला.

मंदिराची रचना आणि नूतनीकरण

या मंदिराची उंची कळसापर्यंत एकशे पाच फूट आहे. १ जानेवारी १९८९ या दिवशी प्रतिष्ठापनेचा सोहळा मोठ्या थाटात साजरा झाला. ३० डिसेंबर २००० या दिवशी नव्याने बांधण्यात आलेले प्रवेशद्वार प.पू. ब्रह्मानंदस्वामी यांच्या शुभहस्ते खुले झाले. १८ डिसेंबर २००५ या दिवशी श्री आकार उंदेगी मंदिराचे नव्याने बांधकाम करून वास्तूचा पुनःप्रतिष्ठापना सोहळा झाला. ६ एप्रिल २००८ या दिवशी गुढीपाडव्याला नव्या दीपस्तंभाच्या पायाभरणीचा उत्सव झाला, चित्तोडगड राजस्थानात याच प्रकारचे ‘विजयस्तंभ’ आणि ‘कीर्तीस्तंभ’ असून दक्षिण भारतातला हा तिसरा दीपस्तंभ गोव्यामध्ये फातर्पा येथे पहावयास मिळतो. दीपस्तंभाची उंची २३ मीटर आहे. दीपस्तंभ उद्घाटन सोहळा २१ फेब्रुवारी २०१० या दिवशी श्री करवीर पिठाधीश जगद्गुरु शंकराचार्य श्री विद्यानृसिंहभारती स्वामी यांच्या शुभहस्ते झाला.

श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीच्या दर्शनाला येणारे भाविक देवळाच्या आवारातून कळसाचे दर्शन घेऊन नमस्कार करतात. सर्व प्रथम आकार उदंगीचे दर्शन घेण्याची परंपरा पूर्वीपासून चालू आहे. मंदिराच्या बाहेर दोन्ही बाजूंनी लहान-मोठे मठ असून त्यांत मूर्ती बसवल्या आहेत. श्री सत्पुरुष, श्री सिद्धपुरुष, सिद्ध देव, राम अवतार, कृष्ण अवतार, नारायणदेव, श्री नवदुर्गा, रामनाथ, श्री सातेरी आणि महादेव पार्वती या सर्व देवतांचे दर्शन घेऊन श्री शांतादुर्गा खंडेरायाचे दर्शन घेतांना, भाव ठेवून पायर्‍यांना नमस्कार करून प्रार्थना करतात. लक्ष देवीच्या चरणाकडे केंद्रित करून तीर्थप्रसाद घेऊन उजव्या बाजूने प्रदक्षिणा घालतात. ‘श्री शांतादुर्गादेव्यै नमः ।’ असा नामजप करतात. ‘माते तुझी कृपादृष्टी अखंड असू दे’, अशी प्रार्थना भक्त करतात.

जत्रोत्सव

या देवीचा सर्वांत मोठा उत्सव, म्हणजे जत्रोत्सव ! हा जत्रोत्सव पौष शुक्ल पक्ष पंचमी ते पौष शुक्ल पक्ष दशमी, या कालावधीत साजरा होतो. ‘मालना मासी हो पंचमी तिथी जात्रे केला आरंभ’, असा शिलान्यास मंदिराच्या ठिकाणी आहे. जत्रोत्सवाचा पौष महिना थंडीचा असल्याकारणाने जत्रेला पूर्वीपासून मंदिराच्या परिसरात ‘पल्लिकान्न पल्ली’ पेटवून शेकोटी तयार ठेवतात. जत्रेला रात्रीचा जागोर म्हणून पेरणी लोक मुखवटे घालून, तसेच नवीन कपडे आणि अलंकार यांनी नटूनथटून मंदिरासमोर दिवटी पेटवून शहनाई, टाळ आणि ढोलकी यांच्या आवाजात गाणे म्हणून नृत्य करतात. या जत्रेला कित्येक भाविक तुळाभाराचा नवस फेडतात. आपल्या वजनाएवढी साखर, गुळ, शहाळे, लाडू, खाजे, केळी आणि फळे देवीला अर्पण करतात. काही भाविक पंचरात्रीचा उपवास करून त्या परिसरात राहून नवस फेडतात. काही नवस फेडणारे भाविक सोेेने, चांदी, हिरे, माणिक, मोती, शालू, कापड, लुगडे, ओटी, फुले आणि फळे देवीला अर्पण करतात. श्रद्धेने असा नवस फेडल्याने भाविकांना अधिक लाभ होतो, अशी ‘श्री’ची कृपा आहे. कुंकळ्ळीकरीणही मागणीची देवी आहे. देवी तिची मागणी भाविकाच्या स्वप्नात येऊन सांगते. दृष्टबाधेपासून संरक्षणासाठी देवीची कृपादृष्टी असते. दृष्ट लागू नये; म्हणून शांताई सौभाग्यवतीच्या स्वरूपात स्वप्नात येते आणि त्या दृष्टीसाठी आपली इच्छा प्रकट करते. अशाने भाविक कौल लावून सल्ला घेतात. मागणीच्या वस्तूला किंवा व्यक्तीला सांगणे घालून तीर्थ सोडतात. भाविक इच्छेप्रमाणे त्या वस्तू देवीला अर्पण करतात. सत्कर्म करणार्‍याचे मन शुद्ध असल्याने कुठल्याही कठीण प्रसंगात भाविकांच्या हाकेला श्री शांतादुर्गा कुुंकळ्ळीकरीण धावून जाते.