प्रभु श्रीराम म्हणजे राष्ट्रदेव ! – भगतसिंग कोश्यारी, राज्यपाल

पोद्दारेश्वर मंदिरात आरती घेतांना भगतसिंग कोश्यारी

नागपूर – प्रभु श्रीराम हे हिमालयाप्रमाणे धैर्यवान, तर सागराप्रमाणे गंभीर आहेत. राष्ट्राला एकसंध बांधण्याचे काम प्रभु श्रीरामांनी केले आहे. ते केवळ श्रीराम नाहीत, तर आपल्या सर्वांसाठी राष्ट्र आहेत, तसेच ते आपले राष्ट्रदेव आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी १५ जानेवारी या दिवशी येथे केले. रामजन्मभूमीवर राममंदिर उभारणीच्या कार्यासाठी लोकसहभागातून निधी संकलन केले जात आहे. याचा शुभारंभ राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते येथील पोद्दारेश्वर मंदिरात बोलत होते.

शहरातील ३५ ठिकाणांहून निधी संकलनाच्या उपक्रमाला प्रारंभ झाला. या वेळी मंदिरात हिंदु धर्म आचार्य सभेचे अध्यक्ष जुनापीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराज हे उपस्थित होते. राज्यपाल कोश्यारी यांनी श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी १ लाख ११ सहस्र रुपयांचा निधी दिला आहे. स्वामी अवधेशानंद गिरी यांनीही १ लाख रुपयांचा निधी दिला.

राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले की, आपण रामराज्य आणण्याच्या योग्य मार्गावर चालत आहोत. आपण राज्याला काय देऊ शकतो, या उद्देशाने चाललो, तर रामराज्याचा दिवस दूर नाही. भारताकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. संतांच्या आशीर्वादाने पुढील पिढी हे रामराज्य आणण्यास समर्थ असावी, यासाठी हे कार्य करत आहोत.