मिरज, १६ जानेवारी (वार्ता.) – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, मिरज शाखेच्या वतीने १७ जानेवारी या दिवशी ब्रह्म कोरोना योद्धांचा सन्मान कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम ब्राह्मणपुरी येथील गोरे मंगल कार्यालयामध्ये सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ सरकारी अधिवक्ता उज्वल निकम, सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, सांगली अर्बन सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. गणेश गाडगीळ सौ. दुर्गादेवी शिंदे-म्हैसाळकर, राज्य गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपअधीक्षक श्री. मुकुंद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे मिरज तालुकाध्यक्ष श्री. ओंकार शुक्ल यांनी दिली.
या संदर्भात अधिक माहिती देतांना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे युवा अध्यक्ष श्री. श्रेयस गाडगीळ म्हणाले, ‘‘कोरोना काळात ब्राह्मण समाजाने दिलेले योगदान अतुलनीय आहे. या काळात शहरातील आधुनिक वैद्यांनी त्यांचा जीव धोक्यात घालून अविरतपणे काम केले. अशा ब्राह्मण कोरोना योद्ध्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या वेळी कोरोना काळात कार्यरत काही अन्य लोकांचा सत्कारही करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित रहावे’’, असे आवाहन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने करण्यात येत आहे.