‘कोरोना’च्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जात मानवाला साहाय्यभूत ठरणारे ज्ञान जगभरात पोचवणारे एस्.एस्.आर्.एफ्. संकेतस्थळ !

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाच्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त…

एस्.एस्.आर्.एफ्. संकेतस्थळाचा वाढता प्रसार !

‘१४.१.२०२० या दिवशी, म्हणजे मकरसंक्रांतीच्या दिवशी ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’च्या संकेतस्थळाचा १५ वा वर्धापनदिन झाला. ‘कोरोना’ महामारीच्या पार्श्वभूमीवर असलेले जग मात्र वर्ष २०२१ मध्ये गतवर्षीपेक्षा बरेच वेगळे आहे. या आव्हानात्मक परिस्थितीला ईश्वराच्या कृपेने सामोरे जात साधक एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळावरील सध्याच्या काळाला आवश्यक असलेले आणि मानवाला साहाय्यभूत ठरणारे ज्ञान जगभरात पोचवण्यासाठी अथक प्रयत्नरत आहेत. आतापर्यंतच्या लेखात आपण संकेतस्थळ पहाणार्‍यांची संख्या ५ कोटी ८० लाखांहून अधिक असणे,  ‘लाईव्हस्ट्रीम (थेट प्रसारण)’ आणि ‘ऑनलाईन’ कार्यशाळांचे आयोजन, संकेतस्थळावर ‘न्यू इव्हेंटस् (नवीन उपक्रम)’ पान अन् एस्.एस्.आर्.एफ्.ची विविध सामाजिक माध्यमे यांविषयी माहिती वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.

लेखाचा भाग १ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/441230.html 

लेखाचा भाग २ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/441544.html


(भाग ३)

(सद्गुरु) श्री. सिरियाक वाले

९. आध्यात्मिक आधार देऊन दिशादर्शन करणारे ‘ऑनलाईन’ सत्संग

साधकांना त्यांच्या साधनेत मार्गदर्शन करण्यासाठी एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने प्रत्येक आठवड्यात इंग्रजी, स्पॅनिश, जर्मन, रशियन, इंडोनेशियन, फ्रेंच, इटालियन आणि सर्बा-क्रोएशियन या ८ भाषांत ६४ ‘ऑनलाईन’ सत्संग घेतले जातात. या सत्संगांना ३५ देशांमधील ३०० साधक नियमितपणे उपस्थित असतात. एस्.एस्.आर्.एफ्.चे ५० साधक सत्संग घेण्याची सेवा करतात. प्रत्येक आठवड्यात साधकांमध्ये भाववृद्धी होण्यासाठी दोन वेगवेगळे भाववृद्धी सत्संग घेतले जातात. या सत्संगांतून ‘भाववृद्धीचे प्रयत्न कसे करायचे ?’, याविषयी मार्गदर्शन केले जाते. या सत्संगामुळे साधकांच्या मनातील शंकांचे निरसन होते, तसेच त्यांना साधनेत येणार्‍या अडथळ्यांवर मात करण्याविषयी मार्गदर्शनही मिळते. सत्संगातील प्रेरणादायी दिशादर्शनामुळे साधक साधनेतील पुढच्या टप्प्याचे प्रयत्न उत्साहाने करत आहेत.

१०. ‘एस्.एस्.आर्.एफ्. शॉप’ला मिळालेला विक्रमी प्रतिसाद !

मार्च ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत ‘कोरोना’ महामारीमुळे आंतरराष्ट्रीय टपाल सेवा बंद होती. त्यामुळे ‘एस्.एस्.आर्.एफ्. शॉप’ची सेवा बंद ठेवावी लागली. आंतरराष्ट्रीय टपाल सेवेला आरंभ झाल्यावर ‘शॉप’ सेवाही चालू करण्यात आली. या सेवेला आरंभ झाल्यावर तिला विक्रमी प्रतिसाद मिळाला. नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२० या मासांत १९ देशांतून विविध प्रकारच्या १०० मागण्या मिळाल्या. दळणवळण बंदीच्या काळात ही सेवा बंद असतांना अनेकदा समाजातील लोक संगणकीय पत्र पाठवून साधनाविषयक ग्रंथ आणि अन्य वस्तूंच्या उपलब्धतेविषयी विचारणा करत असत. यातून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सात्त्विक उत्पादनांचे महत्त्व समाजाला पटले आहे’, हे लक्षात आले.

मेक्सिको येथील एका युवकाने काही मास धनाची बचत करून एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने प्रकाशित ६२ साधनाविषयक ग्रंथांची मागणी केली. ‘भविष्यात तिसर्‍या जागतिक महायुद्धामुळे निर्माण होणार्‍या आपत्काळात टिकून रहाण्यासाठी हे ग्रंथ लाभदायक ठरतील’, या उद्देशाने त्याने ते खरेदी केले आहेत. या युवकाला हे ग्रंथ जतन करायचे असून ते इतरांनाही वाचायला देण्याची त्याची इच्छा आहे.

पू. (सौ.) भावना शिंदे

११. संकेतस्थळावर ‘लाईव्ह चॅट’ सुविधेचा आरंभ

या वर्षी एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळावर ‘लाईव्ह चॅट’ सुविधेचा आरंभ प्रथमच करण्यात आला. मार्च २०२० मध्ये या संकेतस्थळावर ‘लाईव्ह चॅट’ चालू करण्यात आले. त्यानंतर इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, सर्बियन, क्रोएशियन आणि रशियन या ८ भाषांतील १३ सहस्र शंकांचे निरसन करण्यात आले. प्रतिदिन १५ साधक ‘वाचकांशी ‘चॅट’द्वारे बोलणे आणि वाचकांच्या शंकांचे निरसन संगणकीय पत्राद्वारे करणे’, या सेवा तळमळीने करत आहेत. ‘लाईव्ह चॅट’द्वारे संपर्कात आलेले कित्येक जिज्ञासू नंतर एस्.एस्.आर्.एफ्च्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ सत्संग आणि ‘लाईव्हस्ट्रीम’ कार्यक्रम यांना उपस्थित रहात आहेत. त्यांच्यापैकी पुष्कळ जिज्ञासूंनी संकेतस्थळावरील स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे लेख वाचून स्वयंसूचना घेण्यास प्रारंभ केला आहे अन् काही जण त्यांना असलेल्या विविध समस्या दूर होण्यासाठी नामजपादी उपायही करत आहेत.

१२. संकेतस्थळाचा कायापालट करण्यासाठी तंत्रज्ञांच्या नवीन गटाची स्थापना

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला तांत्रिक दृष्टीने संपूर्णपणे पालटण्याची आणि नवीन तंत्रज्ञान वापरून अद्ययावत् करण्याची आवश्यकता होती; मात्र हे करण्यासाठी आवश्यक ते तांत्रिक कौशल्य असणारे साधक उपलब्ध होत नव्हते.

वर्ष २०१९ मध्ये ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने आयोजित केलेल्या एका ५ दिवसांच्या आध्यात्मिक कार्यशाळेला श्री. अनुप निवरगी हे जिज्ञासू उपस्थित होते. श्री. अनुप एका संगणकीय आस्थापनात ‘चीफ टेक्निकल ऑफिसर’ आहेत. या कार्यशाळेमुळे त्यांना साधना करण्याची प्रेरणा मिळाली. कार्यशाळेनंतर त्यांनी संपूर्ण मानवजातीला साधनेसाठी साहाय्यभूत ठरणार्‍या एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळासाठी काहीतरी योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली. श्री. अनुप यांच्याकडे असणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण आणि आधुनिक तंत्रकौशल्यामुळे संकेतस्थळाला अधिक प्रभावी माध्यम बनवण्यासाठी पालट करण्याची प्रक्रिया चालू झाली. यात एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. वाम्सीकृष्णा गोल्लामुडी यांनी श्री. अनुप यांना साहाय्य केले आणि या संकेतस्थळात तांत्रिक पालट करण्याचा पाया घातला गेला.

त्याच काळात एस्.एस्.आर्.एफ्.चे तंत्रज्ञानविषयक तज्ञ असणारे साधक स्वतःहून या सेवेविषयी विचारू लागले. त्यांच्याकडे असणारी कौशल्ये ही त्या वेळी तांत्रिक सेवेसाठी आवश्यक असणार्‍या सेवेशी मिळतीजुळती होती. सध्या संकेतस्थळाचा विकास करण्याच्या सेवेत ५ साधक सक्रीय आहेत आणि ४ साधक या विषयाचे प्रशिक्षण घेत आहेत, तसेच ५ साधक इतर तांत्रिक सेवा करत आहेत. ज्या वेळी जे आवश्यक होते, ते देवाने त्या वेळी दिले. एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळावर करण्यात आलेल्या नवीन पालटांमुळे जिज्ञासूंना संकेतस्थळाचा वापर करणे सुलभ होणार आहे आणि त्यांना त्यावर उपलब्ध ईश्वरी ज्ञान आणि आध्यात्मिक संशोधन यांचा अधिक चांगल्या प्रकारे लाभ होणार आहे. ‘संकेतस्थळ अधिक विकसित (अपडेट) करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि ते हाताळणारे साधक उपलब्ध होणे’, ही एक मोठी अनुभूतीच आहे.

१३. ‘व्हॉट्सॲप’च्या माध्यमातून प्रसाराला आरंभ

एस्.एस्.आर्.एफ्.ने भारत आणि दक्षिण पूर्व आशिया येथे ‘व्हॉट्सॲप’च्या माध्यमातून प्रसाराला आरंभ केला. प्रतिदिन हिंदी आणि इंग्रजी या भाषांत अध्यात्मावर आधारित प्रेरणादायी संदेश आणि एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यक्रमांची माहिती देणार्‍या ‘इव्हेंट्स पोस्टस्’ विविध ‘व्हॉट्सॲप’वर पाठवल्या जातात. याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि त्यामुळे प्रत्येक मासात एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ पहाणार्‍या जिज्ञासूंची संख्या १५ सहस्रांनी वाढली आहे.

१४. कृतज्ञता

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत मागील वर्ष सर्वांत अधिक आव्हानात्मक होते. असे असूनही केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने पुष्कळ चांगले पालट घडून आले. आध्यात्मिक सत्याच्या शोधात असणार्‍या जिज्ञासूंपर्यंत हे दैवी कार्य पोचवण्याची संधी दिल्याविषयी आम्ही परात्पर गुरुदेवांच्या पावन चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (सद्गुरु) श्री. सिरियाक वाले, युरोप आणि (पू.) सौ. भावना शिंदे, अमेरिका (जानेवारी २०२१)

(समाप्त)