‘कोरोना’च्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जात मानवाला साहाय्यभूत ठरणारे ज्ञान जगभरात पोचवणारे एस्.एस्.आर्.एफ्. संकेतस्थळ !

सद्गुरु सिरियाक वाले

‘१४.१.२०२१ या दिवशी, म्हणजे मकरसंक्रांतीच्या दिवशी ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’च्या संकेतस्थळाचा १५ वा वर्धापनदिन आहे. गेल्या वर्षाच्या आरंभी ‘हे वर्ष कसे असेल ?’, याविषयी कुणालाच कल्पना नव्हती. ‘कोरोना’ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर असलेले जग मात्र वर्ष २०२१ मध्ये मात्र गतवर्षीपेक्षा बरेच वेगळे आहे. या आव्हानात्मक परिस्थितीला ईश्‍वराच्या कृपेने सामोरे जात साधक एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळावरील सध्याच्या काळाला आवश्यक असलेले आणि मानवाला साहाय्यभूत ठरणारे ज्ञान जगभरात पोचवण्यासाठी अथक प्रयत्नरत आहेत.                                  

(भाग १)

पू. (सौ.) भावना शिंदे

१. संकेतस्थळ पहाणार्‍यांची संख्या ५ कोटी ८० लाखांहून अधिक असणे आणि संकेतस्थळावरील २३ भाषांतील अध्यात्मावरील काही लेख लोकप्रिय असणे

​एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ हे ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’ या संस्थेचा कणा आहे. संकेतस्थळाने अनेक साधकांना अध्यात्माकडे वळवले असून अध्यात्माची आवड असणार्‍यांसाठी ते एक आध्यात्मिक दीपस्तंभ म्हणून कार्य करत आहे. वर्ष २००६ मध्ये संकेतस्थळाला आरंभ झाला. तेव्हा अनेक वर्षे संकेतस्थळाला भेट देणारे मोजकेच होते; मात्र परात्पर गुरु

डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे संकेतस्थळावरील ज्ञान झपाट्याने जगभर पसरले आणि अध्यात्मात हे संकेतस्थळ ‘जागतिक नेता’ म्हणून उदयास आले. आजमितीला संकेतस्थळ पहाणार्‍यांची संख्या ५ कोटी ८० लाखांहून अधिक आहे. संकेतस्थळावर अध्यात्माविषयी ७०० हून अधिक लेख आहेत, ज्यांत स्पॅनिश, जर्मन, फ्रेंच आणि रशियन, अशा २३ भाषांचा समावेश आहे. या लेखांत अध्यात्मावर विस्तृत माहिती दिली असून त्यांतील ‘मृत्यूनंतरचे जीवन’, ‘अध्यात्म म्हणजे काय ?’ आणि ‘जीवनाचा हेतू (ध्येय)’ हे लेख सर्वाधिक लोकप्रिय झाले आहेत. ‘या संकेतस्थळामुळे लोक अध्यात्माकडे वळत आहेत’, ही केवळ ईश्‍वराचीच कृपा आहे. गतवर्षी एस्.एस्.आर्.एफ्.ने काही उल्लेखनीय सुधारणाही केल्या आहेत.

एस्.एस्.आर्.एफ्. संकेतस्थळाचा वाढता प्रसार !

२. ‘लाईव्हस्ट्रीम (थेट प्रसारण)’ आणि ‘ऑनलाईन’ कार्यशाळांचे आयोजन

​मागील वर्षातील सर्वांत मोठे यश एस्.एस्.आर्.एफ्.ने आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन लाईव्हस्ट्रीम’च्या सत्रांच्या माध्यमातून मिळाले आहे. ‘कोरोना’ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर अध्यात्माचा प्रसार प्रत्यक्ष जाऊन करणे अशक्य होते. त्यामुळे एस्.एस्.आर्.एफ्.ने अध्यात्माचा प्रसार करण्याचा स्वतःचा दृष्टीकोनच पालटला आणि ‘ऑनलाईन’ प्रसार करण्यावर भर दिला. २५.३.२०२० पासून इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, इंडोनेशियन, इटालियन, रशियन, स्पॅनिश आणि सर्बो-क्रोएशियन या भाषांत ५१८ ‘लाईव्हस्ट्रीम (थेट प्रसारण)’ कार्यक्रम आयोजित करण्यात आले. ‘गतजन्म आणि पुनर्जन्म’, ‘शाप, काळी जादू, दृष्ट कशी काढावी ?’ आणि ‘कुंडलिनी जागृत करणे आणि सप्तचक्रे कार्यरत करणे’ यांसह अनेक संबंधित विषयांचा यात समावेश केला आहे.

​एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यासाठी आर्थिक साहाय्य मिळवण्याच्या दृष्टीने ‘एस्.एस्.आर्.एफ्.च्या विस्तारित कार्यावर एक दृष्टी’ हा कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमाने प्रथमच जगभरातील अनेक निष्ठावंत अनुयायांना एस्.एस्.आर्.एफ्.ला अर्पण देण्यास उद्युक्त केले. केवळ सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत या कार्यक्रमाच्या ‘यू ट्यूब’ आणि ‘फेसबूक’ यांची एकूण दर्शकसंख्या ८५ सहस्र झाली.

३. एस्.एस्.आर्.एफ्.चे संत सद्गुरु सिरियाक वाले आणि साधक यांनी ‘कॅराव्हॅन’च्या माध्यमातून केलेला प्रसार !

​यावर्षी ‘कॅराव्हॅन’च्या माध्यमातून एका साधकाने एस्.एस्.आर्.एफ्.ला दिलेल्या अर्पणामुळे कार्यात वाढ होण्याची आणखी एक संधी मिळाली. अध्यात्मप्रसाराचा एक भाग म्हणून मे २०२० पासून सद्गुरु सिरियाक वाले युरोप खंडातील देशांतील जिज्ञासू, तसेच साधक यांना भेटण्यासाठी ‘कॅराव्हॅन’मधून प्रवास करत आहेत. काही देशांत कोरोनामुळे प्रवास करणे प्रतिबंधित असले, तरी ६ देशांतील ३९ प्रमुख शहरांना भेट देणे साध्य झाले. कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी जवळजवळ १२५ जिज्ञासूंना भेटून अध्यात्माविषयी मार्गदर्शन केले. सद्गुरु सिरियाक वाले यांना भेटल्यानंतर सर्वांना चांगल्या अनुभूती आल्या. ‘पुष्कळ पे्रम जाणवणे, समजून घेण्याची वृत्ती वाढणे, विषयाचे आकलन होणे, सकारात्मकता जाणवणे, साधना करण्याची प्रेरणा मिळणे, प्रश्‍नांची उत्तरे मिळून समस्या सुटणे’ इत्यादी अभिप्राय जिज्ञासूंकडून मिळाले. यांतील ३० जणांनी साधनेला आरंभ केला असून १५ जिज्ञासू ‘ऑनलाईन’ सत्संगांना येत आहेत, तसेच काहींनी पुन्हा साधनेला आरंभ केला आहे, तर ३७ जिज्ञासूंचे साधनेचे प्रयत्न वाढले आहेत.

४. सध्याच्या आपत्काळात साहाय्यभूत ठरलेले एस्.एस्.आर्.एफ्.चे लेख आणि चलत्चित्रे (व्हिडिओज्)

मागील वर्षी एस्.एस्.आर्.एफ्.ने विविध विषयांवर आधारित माहिती (लेख) प्रकाशित केली. ३० हून अधिक लेख (नवीन लेखांच्या समवेत अद्ययावत् केलेले काही लेख) प्रकाशित केले. त्यांपैकी ‘कोरोना विषाणूं’वरील लेख सध्याच्या काळात मानवाला विशेष महत्त्वाचे ठरलेे. या लेखांमध्ये एस्.एस्.आर्.एफ्.ने ‘कोरोना विषाणू’वर केलेले आध्यात्मिक संशोधन, त्याचे मूळ कारण आणि त्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे ?’, यांविषयी माहिती दिली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सद्गुरु डॉक्टर मुकुल गाडगीळ यांना ‘कोरोना विषाणू’पासून आध्यात्मिक स्तरावर स्वतःचे रक्षण करण्यासाठी एका नामजपाविषयी ज्ञान प्राप्त झाले. हा नामजप उच्चस्तरीय संतांच्या आवाजात ध्वनीमुद्रित करून तो एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळावर लेखाच्या समवेत ऐकण्यासाठी विनामूल्य ठेवण्यात आला. या व्यतिरिक्त लोकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी ‘कोरोना विषाणू’विषयी संकेतस्थळाच्या यूट्यूब वाहिनीवर एक चलत्चित्र (व्हिडिओ) सिद्ध करून ठेवण्यात आले.

​‘कधी कोणती परिस्थिती निर्माण होईल ?’, याची अनिश्‍चितता, तसेच तिसर्‍या महायुद्धाची शक्यता पहाता एस्.एस्.आर्.एफ्.ने ‘आपत्काळात सामान्य लोक स्वतःचे रक्षण कसे करू शकतील ?’, याविषयीची लेखमाला प्रकाशित करण्यास आरंभ केला. ‘तिसर्‍या महायुद्धाच्या वेळी वीजपुरवठा आणि पाणीटंचाई’ यांसंबधीच्या लेखाला चांगला प्रतिसाद मिळाला.

​एस्.एस्.आर्.एफ्.ने ‘पितृपक्ष आणि पूर्वज अन् त्यांचे वंशज यांच्या हितासाठी केले जाणारे धर्मशास्त्रानुसार विधी’ या विषयांवर आंतराष्ट्रीय स्तरावर जागरूकता निर्माण केली आहे. याचे कारण बहुतांश लोक हे पूर्वजांच्या त्रासाने ग्रस्त असतात. हे संशोधन ‘ऑरा स्कॅनर’च्या (व्यक्ती किंवा वस्तू यांभोवती असलेली प्रभावळ मोजणारे यंत्राच्या) साहाय्याने करण्यात आले.

५. दावोस (स्वित्झर्लंड) येथे झालेल्या ‘पीस ऑन स्नो’ या जागतिक परिषदेत एस्.एस्.आर्.एफ्. आणि ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’ यांच्या वतीने शोधनिबंध सादर !

​दावोस (स्वित्झर्लंड) येथे ९.८.२०२० या दिवशी जागतिक परिषद पार पडली. त्यात एस्.एस्.आर्.एफ्. आणि ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’ यांच्या वतीने ‘द स्पिरिच्युअल स्टेट ऑफ द वर्ल्ड्स वॉटर इन २०२० विच व्हायब्रेशन्स डज् युअर् वॉटर एमिट ?’ म्हणजे ‘वर्ष २०२० मधील जगभरातील पाण्याची आध्यात्मिक स्थिती – तुमच्या पाण्यातून कोणती स्पंदने प्रक्षेपित होतात ?’ या विषयावर शोधनिबंध सादर केला. परात्पर गुरु डॉ. आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक असून सद्गुरु सिरियाक वाले आणि श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत. सद्गुरु सिरियाक वाले यांनी हा शोधनिबंध सादर केला. या परिषदेला उपस्थित लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

​प्रवक्ते आणि मान्यवर यांसह एकूण ५० लोकांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. आम्ही सादर केलेला विषय अन्य प्रवक्त्यांच्या विषयांच्या तुलनेत नवीन आणि आध्यात्मिक स्तरावर असूनही उपस्थित जिज्ञासूंनी त्या ज्ञानाचा सहजपणे स्वीकार केला.

५ अ. ‘शोधनिबंधाचे सादरीकरण पहातांना स्वतःमध्ये काहीतरी जागृत झाल्याचे जाणवले’, असे जर्मनीतील प्रा. राल्फ ऑटरपॉल यांनी सांगणे : हँबर्ग (जर्मनी) येथील ‘इन्स्टिट्यूूट ऑफ टेक्निक’चे प्रा. राल्फ ऑटरपॉल हे हॅम्बर्ग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी येथील सांडपाणी व्यवस्थापन आणि जल संरक्षण संस्थाचे संचालक आहेत. प्रा. राल्फ ऑटरपॉल यांनी ‘शोधनिबंधाचे सादरीकरण पहातांना मला स्वतःमध्ये काहीतरी जागृत झाल्याचे जाणवले’, असे आम्हाला सांगितले. आपल्या संशोधन कार्याचा दृष्टीकोन त्यांना चित्तवेधक वाटला. प्रा. राल्फ यांना व्याख्यान आवडल्याने त्यांनी ‘साधना कशी करायची ?’, याविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा आमच्याकडे व्यक्त केली. प्रा. राल्फ ऑटरपॉल आणि अन्य जिज्ञासू यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने रामनाथी (गोवा) येथील आश्रमात आयोजित करण्यात येणार्‍या ५ दिवसीय कार्यशाळेला उपस्थित रहाण्याची इच्छा व्यक्त केली.

५ आ. परिषदेच्या आयोजिका श्रीमती लॅडिना प्रिया किंडची यांनी दिलेले अभिप्राय : परिषदेत आम्ही शोधनिबंध सादर केल्याविषयी परिषदेच्या आयोजिका श्रीमती लॅडिना प्रिया किंडची यांना पुष्कळ आनंद झाला. त्यांनी आम्हाला पुढील वर्षी होणार्‍या परिषदेत ‘दैवी बालके’ हा विषय मांडण्यासाठी आमंत्रित केले आहे. आम्ही सादर केलेल्या विषयाच्या संदर्भात त्यांना पुष्कळ जणांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले, तसेच ‘पुढील वर्षी परिषदेत एस्.एस्.आर्.एफ्. आणि ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’ सहभागी होतील. तेव्हा ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ आणि ‘साधना’ यांविषयी एक आध्यात्मिक शिबिर आयोजित करूया’, असेही त्या म्हणाल्या.

– (सद्गुरु) श्री. सिरियाक वाले, युरोप आणि (पू.) सौ. भावना शिंदे, अमेरिका (जानेवारी २०२१)


लेखाचा भाग २ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/441544.html