नवी देहली – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून चारचाकी वाहनधारकांना ‘फास्टॅग’ लावण्यासाठी १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी प्रत्येक चारचाकी वाहनासाठी १ जानेवारी २०२१ पासून ‘फास्टॅग’ बंधनकारक करण्यात आले होते. तसेच ‘या दिवसापासून देशातील टोल नाक्यांवर रोख रकमेचे व्यवहार होणार नाहीत, केवळ ‘फास्टॅग’ ग्राह्य धरले जाईल’, असे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घोषित केले होते; मात्र आता याची मुदत वाढवण्यात आली आहे.
‘फास्टॅग’ म्हणजे काय ?
‘फास्टॅग’मुळे वाहनांना टोलनाक्यांवर रोख रकमेने टोल भरावा लागणार नाही. यामुळे वाहनाचे इंधन आणि प्रवाशांचा वेळ दोन्ही गोष्टी वाचतील. फास्टॅग अकाऊंटमधून टोलचे पैसे वजा झाल्यानंतर संबंधित वाहन चालकाला त्या संबंधीचा एक एस्.एम्.एस्. त्यांच्या भ्रमणभाष संचावर येईल. अकाऊंटमधील पैसे संपल्यानंतर ते पुन्हा रिचार्ज करावे लागणार आहे. फास्टॅगची वैधता ५ वर्षांची असेल. त्यानंतर नव्याने फास्टॅग खरेदी करावे लागणार आहेत. हे ‘फास्टॅग’ चारचाकीच्या समोरील काचेवर लावायचे आहेत. टोल नाक्यावर त्याचे स्कॅनिंग केले जाईल आणि मग खात्यातून पैसे घेतले जातील. ‘फास्टॅग’साठी वाहनाचे नोंदणीचे पत्र, वाहनाच्या मालकाचे छायाचित्र, ‘केवायसी’साठी आवश्यक कागदपत्रे आणि वास्तव्याचा दाखला आवश्यक आहे.