अतीतिखट अन्नाचे सेवन केल्याने होणारे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक परिणाम

आहार आणि आचार यांसंबंधी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

‘सध्याच्या काळात स्वयंपाकघरामध्ये सहजच मिळणारे आणि भारतीय अन्नाचा अविभाज्य भाग बनलेले पदार्थ, म्हणजे मिरची आणि लाल तिखट. हे दोन्ही पदार्थ प्रत्यक्षात भारतीय नसले, तरी भारतीय जेवणाशी ते एवढे समरस झाले आहेत की, तिखट अन्नाचा विचार केला असता सर्वप्रथम भारतीय जेवणच डोळ्यांसमोर येते. आपल्या जुन्या पाककृती पाहिल्या असता त्यांवरून आपल्याला हे लक्षात येऊ शकेल की, भारतीय स्वयंपाक पूर्वीपासून तिखट नव्हता. भारतीय जेवणात चव आणि पोषण यांना अधिक महत्त्व दिलेले आहे. भारतीय जेवणावर आयुर्वेदाच्या चिकित्सा पद्धतीचाही बराच प्रभाव राहिला आहे. त्यामुळे ‘ऋतूचक्रांनुसार आहार पालटणे’, ही अन्यत्र कुठेही न दिसून येणारी प्रथा भारतीय लोक वर्षानुवर्षे पाळत आहेत. ‘पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्याने समृद्ध पैलूंनी नटलेल्या आपल्या खाद्यसंस्कृतीला आपण विसरून जात आहोत’, असे वाटते.

१. आयुर्वेदानुसार षड्रसांपैकी ‘तिखट’ या रसाचे वैशिष्ट्य

आयुर्वेदात विविध चवींची रसांशी तुलना केली आहे. त्यानुसार गोड, कडू, तिखट, आंबट, तुरट आणि खारट असे सहा रस असतात. या षड्रसांचा आहारात योग्य प्रमाणात समावेश असल्यास त्या आहारातून शरिराला पोषण मिळून आरोग्य चांगले रहाण्यास साहाय्य होते; परंतु जसे कोणत्याही गोष्टीचे अतीसेवन हानीकारक असते, तसेच या षड्रसांचेही आहे. अधिक प्रमाणात त्यांचे सेवन केले असता त्या रसाशी निगडित अवयवांचीही हानी होते. तिखट हा षड्रसांपैकी एक रस आहे. तिखट या रसामध्ये तेज आणि वायु या तत्त्वांचा समुच्चय असतो. तेजतत्त्व अग्नीशी संबंधित आहे आणि वायु अग्नी प्रज्वलित करायला साहाय्य करतो. त्यामुळेच जेव्हा हे अन्न आपल्या जठरात पोचते, तेव्हा जठराग्नीला अजून वाढवते; म्हणूनच तिखट खाल्ल्यावर आपल्याला शरिरातील उष्णता वाढल्याचे जाणवते.

श्री. राहुल (ऋत्विज) ढवण

२. अतीतिखट अन्नाचे नियमित सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम

२ अ. शारीरिक परिणाम

२ अ १. पित्त वाढणे : अतीतिखट अन्न ग्रहण केल्याने पित्त वाढून पित्ताशी संबंधित त्रासांचे प्रमाण वाढते. ‘छातीत जळजळणे, करपट ढेकरा येणे’, ही पित्ताचीच लक्षणे आहेत.

२ अ २. ‘गॅस्ट्रिक अल्सर’चा धोका उद्भवणे : सातत्याने तिखट अन्न ग्रहण केल्याने जठराच्या आतील बाजूस सूज येऊ शकते, तसेच काही वेळा जखमाही होतात. या जखमेला ‘जठराचा अल्सर’ असेही म्हणतात. यामध्ये ‘उलट्या होणे आणि पोटाचा वरील भाग जेवल्यानंतर फुगल्यासारखा जाणवणे’ इत्यादी लक्षणे दिसून येतात.

२ अ ३. तोंडाची चव जाणे : सतत तिखट अन्न ग्रहण केल्यामुळे जिभेवरील चव ओळखणार्‍या पेशींची हानी होते आणि कालांतराने जिभेची चव ओळखण्याची क्षमता न्यून होते.

२ आ. मनावर होणारे परिणाम

२ आ १. चिडचिडेपणा आणि उतावीळपणा : तिखट अन्न तमप्रधान असल्यामुळे त्याद्वारे शरिरात जाणार्‍या तामसिक लहरींचा मनावरही परिणाम होतो. तिखट अन्नाच्या सेवनाने चिडचिडेपणा, उतावीळपणा हे स्वभावदोष उफाळून येतात. अशा व्यक्तींचे बोलणे किंवा वागणेही काही प्रमाणात रुक्ष असते.

२ आ २. झोप न्यून होणे : पुष्कळ तिखट अन्न ग्रहण केल्यामुळे आपला जठराग्नी कार्यरत होतो. जठराग्नी शांत झाल्याविना झोप लागत नाही; म्हणून शरिरातील या पालटामुळे झोप लागण्याचे प्रमाण न्यून होते.

२ इ. अध्यात्मशास्त्रदृष्ट्या तमप्रधान तिखट अन्न सेवन करण्याचे परिणाम : अध्यात्मशास्त्रानुसार तिखट आहार हा तमप्रधान मानला जातो. त्यामुळे तिखट पदार्थही तमप्रधानच असतात, उदा. मांस आणि मासे. तिखट आहार ग्रहण केल्यामुळे त्या व्यक्तीवरही त्याचा परिणाम होतो आणि त्याच्यातील रज-तमाचे प्राबल्य वाढते. तिखट हे तमप्रधान असल्यामुळे देवाला नैवेद्य दाखवतांनाही त्यामध्ये तिखट घालत नाहीत. जेव्हा एखाद्या व्यक्तीतील सात्त्विकता वाढते, तेव्हा त्या व्यक्तीची तिखट खाण्याची आवडही न्यून होते. याचे उदाहरण द्यायचे झाले, तर जेव्हा आम्ही तिखट अन्नाच्या प्रयोगासाठी साधक शोधत होतो, तेव्हा पुष्कळ तिखट अन्न ग्रहण करणारे ६० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी असलेले साधक आम्हाला अगदीच थोडे भेटले आणि तिखट खाणारे संत भेटले नाहीत. येथे आपल्या लक्षात येईल की, जेव्हा एखाद्या व्यक्तीमधील सात्त्विकता वाढते, तेव्हा त्याचा तामसिक अन्नाकडील कल न्यून होतो.

३. श्री. ऋत्विज ढवण यांना अतीतिखट, मध्यम तिखट आणि बिनतिखट पदार्थ ग्रहण करतांना जाणवलेली सूत्रे

प्रथम मी अतीतिखट पदार्थ ग्रहण केला. त्यानंतर मध्यम तिखट अन् नंतर बिनतिखट पदार्थ ग्रहण केला. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

– श्री. ऋत्विज ढवण, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (डिसेंबर २०२०)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक