वारकरी संप्रदायातील थोर कीर्तनकार ह.भ.प. अनंत इंगळे महाराज यांचा ‘श्री दत्तरत्न पुरस्कार’ देऊन सन्मान !

सन्मान स्वीकारतांना मध्यभागी (हार घातलेले) ह.भ.प. अनंत इंगळे महाराज

सोलापूर, ३० डिसेंबर (वार्ता.) – येथील वारकरी संप्रदायातील थोर कीर्तनकार आणि उत्कृष्ट गायक ह.भ.प. अनंत इंगळे महाराज यांना ‘श्री दत्तरत्न पुरस्कार’ संत साहित्याचे गाढे अभ्यासक नरेंद्र कुंटे यांच्या हस्ते देण्यात आला. या वेळी ह.भ.प. अनंत इंगळे महाराज यांचा श्री विठ्ठल दादा सिरसीकर यांनी सन्मानपत्र आणि मानचिन्ह देऊन सत्कार केला. हा कार्यक्रम श्री दत्त मंदिर, गणपती घाट या ठिकाणी पार पडला.

१. या वेळी नरेंद्र कुंटे म्हणाले, ‘‘अनंत इंगळे महाराज हे वारकरी संप्रदायातील दीपस्तंभ असून निष्काम सेवेचा आदर्श आहेत. वयाच्या ८५ व्या वर्षीही भजन करण्यासाठी युवकांना लाजवेल अशी ऊर्जा त्यांच्याकडे आहे. भजन हा त्यांचा श्वास असून सेवाभाव हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या ६५ वर्षांहून अधिक निष्काम सेवेमुळे त्यांना दत्त महाराजांचा प्रसाद म्हणून ‘श्री दत्तरत्न पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.’’

२. या वेळी ह.भ.प. अनंत इंगळे महाराज यांच्या पत्नी जनाबाई इंगळे यांचाही शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचा प्रारंभ गोपाळ शास्त्री जोशी यांनी वेदपठण करून केला. या प्रसंगी ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, संजय केसरे, आदर्श इंगळे, कृष्णा चवरे, शिवानंद जाधव, समर्थ गुंड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल दादा सिरसीकर यांनी केले. पसायदान घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.