होडावडा ग्रामपंचायतीच्या सरपंचांना जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरवले

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्ग – वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती अदिती अरविंद नाईक यांच्यावर कर्तव्यचुकारपणा केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी त्यांना अपात्र ठरवले आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त झाले आहे.

ग्रामपंचायत अधिनियमानुसार प्रत्येक मासात किमान १ मासिक सभा आयोजित करणे बंधनकारक आहे. सरपंच नाईक यांनी सप्टेंबर २०१९ या मासाची ग्रामपंचायत कार्यकारिणी सभा आयोजित केली नाही. याविषयी ग्रामपंचायत सदस्य आनंद लवू नाईक, अर्जुन जगन्नाथ दळवी, अंकुश शंकर जाधव आणि अलका अनंत गोसावी यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार नोंद केली होती. याविषयी सुनावणी झाल्यानंतर सरपंच श्रीमती नाईक यांना ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३६ अन्वये कर्तव्यचुकारपणा केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरवले.