पुणे – कोरोनाग्रस्तांना खासगी रुग्णालयात परवडणार्या दरात उपचार मिळावेत यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या दर नियंत्रणास (कॅपिंग) १५ डिसेंबरपर्यंत दिलेली मुदत संपली असून, आता त्याला राज्य सरकारने येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (आय.एम्.ए.ने) बैठक घेऊन दर निश्चितीविषयी चर्चा करण्याची मागणी केली होती. त्या मागणीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर चर्चा न करताच दर नियंत्रणाच्या आदेशाला मुदतवाढ दिल्याने ‘आय.एम्.ए.’ने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे एकीकडे कोरोनाग्रस्तांना परवडणार्या दरात उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला; मात्र रुग्णालयांनी त्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांना त्यांच्याप्रमाणे दर निश्चित करू द्या. पुन्हा रुग्णसंख्या वाढली आणि कॅपिंगचा निर्णय घेण्याची वेळ आली, तर निश्चित खासगी रुग्णालये सरकारला प्रतिसाद देतील. असे मत हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे चेअरमन डॉ. संजय पाटील यांनी व्यक्त केले आहे.