आयुष आणि होमियोपॅथी डॉक्टरांना कोरोनावरील औषध लिहून देण्यास सर्वोच्च न्यायालयाची अनुमती

नवी देहली – केंद्र सरकारच्या ६ मार्च २०२० या दिवशी जारी करण्यात आलेल्या आदेशाला योग्य ठरवत सर्वोच्च न्यायालयाने पात्र असलेले आयुष डॉक्टर आणि होमिओपॅथी डॉक्टर यांना कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारांसाठी औषधे लिहून देण्याची अनुमती दिली. तथापि डॉक्टरांनी याची निश्‍चिती करून घ्यावी की, त्यांनी लिहून दिलेली औषधे ही शासकीय मान्यताप्राप्त गोळ्या किंवा काढेच आहेत अन् ते कोरोना आजारासाठी नेहमीच्या उपचारांसमवेतच देण्यात येणारी अतिरिक्त औषधे उपाय म्हणून दिली जात आहेत. तसेच ते लिहून देत असलेली औषधे ही कोरोनावर उपचार करण्यासाठी नसून कोरोना रुग्णांना रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहेत.

सुनावणीच्या वेळी केंद्राने सर्वोच्च न्यायालयासमोर निवेदन केले की, होमिओपॅथी डॉक्टरदेखील कोरोना रुग्णांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लिहून देऊ शकतात; परंतु त्यांना उपचार म्हणून संबोधले जाऊ शकत नाही.