सावंतवाडी – येथील वनविभाग स्थानिक जंगल परिसरात मिळणार्या फळांवर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प राबवत आहे. याचे दायित्व येथील महिला बचतगटाकंडे देण्यात येणार आहे. यासाठी लागणारी यंत्रसामुग्री, ‘पॅकिंग’ आणि मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे दायित्व वनविभागाचे असणार आहे. ही उत्पादने सावंतवाडी वनविभागाच्या ‘वनअमृत’ या ब्रँडखाली विकली जाणार आहेत. स्थानिक महिला बचत गटांना समवेत घेऊन हा प्रकल्प राबवला जाणार असून महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.
‘वनअमृत’ प्रकल्पाच्या अंतर्गत १४ डिसेंबरला तालुक्यातील चौकुळ, बेरडकी येथे मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लेमेंट बेन आणि उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या वेळी येथील महिला बचतगटांना सोबत घेऊन पहिल्या टप्प्यात आवळा, हिरडा, तमालपत्र, शिकेकाई या फळांवर प्रकिया करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने फणस, करवंदे, जांभूळ आदी फळांचाही विचार केला जाणार आहे.