‘कोवॅक्सिन’ लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर १५ दिवसांनी हरियाणाच्या आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची बाधा

दुसरा डोस घेतल्यानंतर लस प्रभावी ठरणार ! – ‘भारत बायोटेक’चा दावा

हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज

अंबाला (हरियाणा) – ‘कोवॅक्सिन’ या ‘भारत बायोटेक’ बनवत असलेल्या लसीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीसाठी हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांना १५ दिवसांपूर्वी ही लस टोचण्यात आली होती; मात्र आता विज यांनाच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांना उपचारार्थ येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. विज यांनी स्वतःच याची माहिती दिली आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करून घेण्याची सूचना केली आहे.

याविषयी भारत बायोटेकने स्पष्टीकरण देतांना म्हटले आहे की, कोवॅक्सिनच्या क्लिनिकल चाचणीचे दोन डोस २८ दिवसांच्या अंतराने दिले जात आहेत. या लसीचा प्रभाव दुसरा डोस दिल्याच्या १४ दिवसांनंतर समजणार आहे. दोन डोस दिल्यानंतरच ही लस प्रभावी ठरणार आहे.