नागरिकांच्या आरोग्याचे महत्त्व लक्षात घेऊन कोरोना काळातच नव्हे, तर नियमितपणे एफ्.डी.ए.कडून अशी मोहीम राबवली जावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.
पुणे – कोरोनाच्या काळात नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्नपदार्थ मिळावेत या उद्देशाने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने विशेष मोहीम राबवली होती. यामध्ये पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत अन्न भेसळीच्या संशयावरून ४७ सहस्र लिटर खाद्यतेल, १ सहस्र ३८३ किलो तूप, ८८९ किलो मिठाई असे अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. आपण खरेदी केलेल्या अन्नपदार्थांविषयी काही संशय असल्यास एफ्.डी.ए.च्या १८००२ २२३६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अन्नपदार्थ विक्रेते ते उत्पादक यांसह सर्व स्तरावर अशी कारवाई चालू राहील, असे प्रशासनाने सांगितले आहे.