धन आणि सुखसोयी यांसाठी हपापलेले भ्रष्टाचारी पत्रकार !

‘एका शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांविषयी पुढील सूत्रे लक्षात आली.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

१. एक पत्रकार म्हणाला, ‘‘तुम्ही कुणाला तरी ‘ब्रँड ॲम्बॅसिडर’ नेमले पाहिजे. ‘हिंदु राष्ट्रा’चा विचार समाजात पोचवण्यासाठी तुम्ही एका तरुण आमदाराला नेमले पाहिजे.’’

२. दुसरा पत्रकार म्हणाला, ‘‘तुमचे विचार आणि कार्य चांगले आहे; परंतु ‘तुमच्याकडे धन नाही’, असे दिसून येते. पत्रकार परिषदेनंतर तुम्ही पत्रकारांना जेवणही ठेवले नाही, यावरून हे लक्षात येते. तुम्ही कुणातरी बड्या व्यक्तीला पत्रकार परिषदेला बोलवायला पाहिजे. त्यांच्याकडून परिषदेचा होणारा व्यय प्रायोजित करून घ्यावा. २०० पत्रकारांना बोलावण्यासाठी त्यांच्या जेवणाचा व्यय एकूण ५० सहस्र रुपये होतो. ही रक्कम कुणीही प्रायोजित करू शकतो. तुम्ही आम्हाला सांगितले, तर आम्हीही प्रायोजक उपलब्ध करून देऊ शकतो.’’

३. काही पत्रकारांनी निमंत्रण मिळाल्यावर लगेच निमंत्रकाच्या भ्रमणभाष क्रमांकावर बोलून ‘तुम्ही पत्रकारांच्या येण्या-जाण्याच्या व्ययाची काही सोय केली आहे का ?’, ‘पत्रकार परिषदेनंतर जेवण आहे ना ?’, अशी चौकशी चालू केली.

४. काही पत्रकारांनी विचारले, ‘‘आम्ही हे अधिवेशन ‘कव्हर’ करण्यासाठी गोवा येथे जाण्या-येण्याची, तसेच अन्य काही सोयी केल्या आहेत का ?’’

एकूणच पत्रकारांचे पत्रकारितेशी काही देणे-घेणे नसून ‘पत्रकारितेच्या माध्यमातून पैसा मिळवणे’, हाच हेतू दिसतो. ‘हिंदुविरोधी पत्रकार’ जसे विकले जातात, तसे ‘हिंदुत्वाचे समर्थक असलेले काही पत्रकार’ ही पत्रकारिता नव्हे, तर मिडिया मॅनेजमेंटद्वारे पत्रकारिता करतांना दिसत आहेत. यामुळे चांगल्या, अभ्यासू आणि तत्त्वनिष्ठ पत्रकारांच्या कार्याविषयी संशय निर्माण होतांना दिसून येतो.

‘देशातील जनतेला चुकीची दिशा दिल्याने देशाच्या, म्हणजेच समाजाच्या होणार्‍या हानीमुळे हे पत्रकार समष्टी परिणामांचे धनी होत आहेत’, हे त्यांना समजले, तरी ‘त्यांना ‘हिंदु धर्म’ कळला’, असे म्हणू शकतो; अन्यथा नावाचे ‘हिंदुत्ववादी’ आणि कर्माने ‘अधर्मी’ ठरले, तर त्यांच्यावर गंभीर परिणाम भोगण्याची वेळ येईल, हे निश्चित आहे !’

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.