अवैध आणि चिनी फटाक्यांची विक्री थांबवणे, तसेच मिठाईतील भेसळ रोखणे यांसाठी मुंबई येथे धर्मप्रेमींचे पोलिसांना निवेदन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांनाही निवेदन

मुंबई – देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके फोडल्यावर त्यांचा अवमान होतो. याविषयी हिंदु जनजागृती समितीने गेल्या अनेक वर्षांपासून प्रबोधन केले आहे. सरकार आणि प्रशासन यांना निवेदने दिली आहेत; मात्र तरीही हे फटाके अजूनही बाजारात दिसतात. चीनचे फटाकेही बाजारात आहेत. त्यांच्यामुळे प्रदूषण होत असल्याने ते अधिक धोकादायक आहेत. अशा फटाक्यांवर बंदी घालावी, यासाठी मुंबईतील धारावी पोलीस ठाण्यात हिंदु जनजागृती समिती, वज्रदल आणि श्रीराम गणेश मंदिर मित्र मंडळ या संघटनांनी निवेदन दिले. धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश नांगरे यांनी हे निवेदन स्वीकारले. या वेळी वज्रदल संघटनेचे अध्यक्ष श्री. संजय चिंदरकर, श्रीराम गणेश मंदिर मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. कांतीलाल पटेल, तसेच श्री. आनंद वालावलकर आणि श्री. महेश बालकोट्टी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सणासुदीच्या काळात भेसळयुक्त मिठाई विकणार्‍या व्यापार्‍यांची नियमित पडताळणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही निवेदनात केली आहे.

फटाक्यांविषयीचे निवेदन मुख्यमंत्री, तसेच मुंबई जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना ईमेलद्वारे हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ते वैद्य उदय धुरी यांच्या नावाने देण्यात आले आहे.