हिंदूंंनो, पितृपक्षात श्राद्धविधी करण्यामागील शास्त्र जाणून घेऊन तशी कृती करा !

२ सप्टेंबर २०२० या दिवशीपासून पितृपक्ष चालू झाला आहे. यानिमित्ताने…

१. पितरांना नैवेद्य दाखवतांना काढलेल्या छायाचित्रात वातावरणात अकस्मात् असंख्य लिंगदेह दिसू लागणे

श्री. शॉन क्लार्क यांनी श्राद्धविधीत पिंडांना नैवैद्य दाखवून प्रार्थना केल्यावर वातावरणात पांढर्‍या गोळ्याच्या रूपात दिसणारे लिंगदेह (ऑर्ब्ज) आणि श्राद्धविधी सांगतांना डावीकडून पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी

‘२३.९.२०१४ ला एस्.एस्.आर.एफ्.चे ऑस्ट्रेलिया येथील साधक श्री. शॉन क्लार्क यांनी त्यांच्या पितरांना गती मिळावी, यासाठी श्राद्धविधी केला होता. श्री. शॉन यांनी केलेल्या या श्राद्धामध्ये भोजन वाढण्यापूर्वी काढलेल्या छायाचित्रात वातावरणात अत्यंत अल्प प्रमाणात, म्हणजे अगदी एक-दोन लिंगदेह (ऑर्ब्ज) दिसले; मात्र पितरांना नैवेद्य दाखवतांना काढलेल्या छायाचित्रात वातावरणात अकस्मात् असंख्य लिंगदेह दिसू लागले. श्राद्धविधीत पितरांना नैवेद्य दाखवण्याचा विधी संपल्यावर वातावरणात लिंगदेह दिसले नाहीत.

२. धर्मशास्त्रानुसार पितृपक्षात श्राद्धविधी करण्याचे महत्त्व

कु. प्रियांका लोटलीकर

श्राद्धविधीसारखे कर्म हे देवतांच्या कनिष्ठ, म्हणजेच पृथ्वी आणि आप या कनिष्ठ तत्त्वांशी संबंधित असते. त्यामुळे या कालावधीमध्ये नैवेद्य दाखवणे हे कर्म जास्त प्रमाणात भूमीशी, म्हणजेच पृथ्वीतत्त्वाशी संलग्नता दर्शवणारे असते. श्राद्धाच्या अन्नातून मंत्रोच्चारात प्रक्षेपित होणार्‍या तेज लहरीमुळे लिंगदेहातील वासनामयकोषातील रज-तम कणांचे उच्चाटन होण्यास साहाय्य होते. लिंगदेहाचे जडत्त्व काही प्रमाणात अल्प झाल्यामुळे त्याला हलकेपणा जाणवून तो पुढची गती धारण करतो हा महत्त्वाचा उद्देश साध्य होतो. पितर लिंगदेहांच्या स्वरूपात श्राद्धस्थळी येतात आणि त्यांची तृप्ती झाल्याचे सूचक, म्हणजे ऑर्ब्ज होत.

(अधिक विवेचनासाठी वाचा : सनातनचे ग्रंथ ‘श्राद्ध भाग १’ आणि ‘श्राद्ध भाग २’)

३. पितृपक्षात श्राद्धविधी करण्याचे महत्त्व सांगूनही त्या संदर्भात टीका-टिप्पण्या करणार्‍या कर्मदरिद्री भारतियांनो, पाश्‍चात्त्यांकडून शिका !

खरेतर भारताने संपूर्ण जगताला बहुमोल अशा अध्यात्माची देणगी दिली आहे. भारतीय संस्कृतीने कोट्यवधींना जगायला आणि जीवनातील आनंद घ्यायला शिकवले. अशा वैभवशाली भारताला पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची आवश्यकता असतांना काही कर्मदरिद्री पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करणे भूषणास्पद मानतात; मात्र विदेशातील लोक भारतात येऊन भारतातील संस्कृती, येथील आचार शिकतात आणि त्यांचे आचरण करतात. यावरून लक्षात येते की, भारतीय लोक ज्ञान, समृद्धी आणि संपन्नता यांच्या अथांग सागरात राहूनही कोरडेच आहेत.

धर्मशास्त्रात पितृपक्षात श्राद्धविधी करण्याचे महत्त्व सांगूनही काही जण असे न करता त्या संदर्भात टीका-टिप्पण्या करतात. श्री. शॉर्न क्लार्क हे मूलतः विदेशातील असूनही त्यांनी हिंदु धर्मानुसार श्राद्धविधीचे महत्त्व जाणून घेऊन श्राद्धविधी केले. सर्व हिंदूंनी यातून शिकण्यासारखे आहे.’ – कु. प्रियांका विजय लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१९.९.२०१५)

कुठे पितरांना गती मिळावी, यासाठी श्राद्ध करण्यास सांगणारी उदात्त आणि आध्यात्मिक स्तरावरील हिंदु संस्कृती आणि कुठे पितरांना ओळखू येऊ नये, यासाठी भयानक वेशभूषा करण्यास सांगणारी मानसिक स्तरावरील पाश्‍चात्त्य संस्कृती !

‘पितृपक्षामध्ये पितरांना आवाहन केले जाते. त्यांचे पूजन करून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो. या कालावधीमध्ये पितरांना भूतलावर येण्यासाठी योग्य अशी स्पंदने निर्माण झाल्यामुळे ते सहजच भूतलाकडे आकृष्ट होतात. आपल्या पितरांना गती मिळावी, यासाठी हिंदु धर्मातील आध्यात्मिक स्तरावर उदात्त विचार असतो. पाश्‍चात्त्य संस्कृतीमध्ये ऑक्टोबरमध्ये ‘हॅलोवीन’ हा सण साजरा करतात, त्यांचे असे मानणे आहे की, या कालावधीमध्ये पृथ्वी आणि भुव लोक यांतील अंतर न्यून होत असल्यामुळे पितर पृथ्वीवर आकृष्ट होतात. ते पृथ्वीवर आकृष्ट झाल्यानंतर त्यांनी आपल्याला ओळखू नये, यासाठी ते भयानक वेशभूषा धारण करून स्वतःला लपवतात. त्यांची वेशभूषा इतकी भयानक असते की पितरच काय; परंतु त्रासदायक शक्ती सहजच त्यांच्याकडे आकृष्ट होऊ शकतील.

पितर आणि वातावरणात कार्यरत असणार्‍या चांगल्या किंवा त्रासदायक शक्ती या वातावरणात सूक्ष्म स्तरावर कार्यरत असतात. त्यामुळे त्यांना स्थुलापेक्षा सूक्ष्मातून अधिक कळत असल्यामुळे सहज कसाही वेश परिधान केला, तरी  त्या ते ओळखू शकतात. हे पाश्‍चात्त्यांना ठाऊक नसते.’

– कु. प्रियांका विजय लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१९.९.२०१५)

वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांना विनंती !

‘श्राद्धविधी करतांना पितरांना नैवेद्य दाखवतांना वातावरणात लिंगदेह (ऑर्ब्ज) दिसण्यामागील वैज्ञानिक कारण काय ? पूर्ण विधीमध्ये न दिसणारे लिंगदेह केवळ पिंडदान करतांना आणि पितरांना नैवेद्य दाखवतांनाच का दिसतात ? या संदर्भात कोणत्या वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन करता येईल ?’ आदींविषयी वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांचे साहाय्य लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.’ – महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (संपर्क : श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, ई-मेल : [email protected])

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.