जंक फूड हे आरोग्यास हानीकारक आहे, हे आतापर्यंत विविध प्रकारच्या संशोधनातून समोर आले आहे. जंक फूडमुळे बुद्धीदौर्बल्य येते. शरिरात अनावश्यक वात आणि चरबी साठून शिथिलता येते. आज जंक फूड खाण्यात तरुण पिढी तर अग्रेसर आहेच; परंतु शाळकरी मुलेही त्याच्या आहारी गेली आहेत. ‘सात्त्विक आणि पौष्टिक अन्न खाण्याचा संस्कारच हळूहळू लयास जातो कि काय’, अशी भीती वाटण्याजोगे जंक फूडचे प्रस्थ वाढीस लागले आहे. त्यामुळे शरिराची हानी होते, हे माहिती असूनही चंगळवाद अंगात मुरल्याने काही गंभीर आजार होत नाही, तोपर्यंत त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ‘मजा लुटण्यासाठी आयुष्य आहे’, असा त्यांचा दृष्टीकोन असतोे. ‘जिभेचे चोचले पुरवण्याकडे मानवाचा कल वाढल्यानेच जंक फूडचा जन्म झाला’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. समृद्धता असूनही निकृष्ट अन्न खाण्याची ही हौस वैचारिक मतीमंदत्वच दर्शवते.
जंक फूड निर्मितीस आणि देशभरातील सर्व जंक फूडच्या गाड्यांवर आळा बसला पाहिजे. जंक फूड हे शरिरासमवेत वैचारिक क्षमताही खिळखिळी करते, हे लक्षात घेऊन या संदर्भातील उपाययोजना लवकरात लवकर होणे आवश्यक आहे.