मोक्षापर्यंतच्या वाटचालीच्या दृष्टीने सात्त्विक अन्नाचे महत्त्व
सात्त्विक आहाराचे महत्त्व
‘सात्त्विक आहारातून सात्त्विक पिंडाची निर्मिती होते. हा पिंड आध्यात्मिक प्रगती साधून घेण्यास योग्य असतो. आहार हा तमोगुणी असेल, तर या तमोगुणी ऊर्जेवर चालणारा देह पापयुक्त कर्माला बळी पडतो. पापयुक्त कर्म वातावरणात मोठ्या प्रमाणात आपली सूक्ष्म स्पंदने सोडून त्या त्या स्तरावर या स्पंदनांना घनीभूत करून त्यांचे विशिष्ट कार्यकारी केंद्रात रूपांतर करते. योग्य आणि सात्त्विक आहाराच्या मुशीतून घडलेले जीव सज्जन असतात अन् विचारांच्या योगे सत्त्वशील मार्गाचे आचरण करणारे असतात. ऋषिमुनींचा आहारावर विशेष कटाक्ष असे. सात्त्विकतेचे वर्धन करणारा योग्य तेजदायी आहार देहात तेजस्वी कंपने निर्माण करून त्या त्या स्तरावर त्या त्या जिवाला योगी बनवतो. आहारावर नियंत्रण ठेवणे, म्हणजेच जिभेचे चोचले न पुरवणे, हे अतिशय अवघड असते. रसना आणि वाणी यांच्यावर नियंत्रण मिळवणारा जीव ‘योगी’ या पदाला प्राप्त होतो.’
– एक विद्वान (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या ‘एक विद्वान’ या नावाने भाष्य करतात. ७.३.२००८)
सत्त्वगुणाची वृद्धी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा सात्त्विक आहार !
‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।’, म्हणजे साधना करण्यासाठी शरीर हेच खरे महत्त्वाचे माध्यम आहे; कारण ईश्वरप्राप्ती हे मनुष्यजन्माचे अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी मनुष्याला देहाची नितांत आवश्यकता असते. शरीर आरोग्यदायी रहाण्यासाठी आहार चांगला आणि सात्त्विक असला, तर शरिराचा सत्त्वगुण वाढतो. त्यामुळे ईश्वरप्राप्तीचे ध्येय सुलभ होते. सत्त्वगुणाची वृद्धी करण्यात सात्त्विक आहार महत्त्वाची भूमिका पार पाडतो. सात्त्विक आहाराच्या सेवनामुळे शरीर, मन आणि बुद्धी सात्त्विक होते, तर मांस अन् मद्य यांच्या सेवनामुळे व्यक्ती तमोगुणी होते. खरेतर मांसाहार हा माणसाचा आहार नाहीच. सृष्टी-निर्मात्याने मांसाहार मानवासाठी निर्माण केलेला नाही. मद्य हासुद्धा अन्नपदार्थ नाहीच. अध्यात्म आहारातील सात्त्विकतेचा विचार करते, तसा विचार आधुनिक विज्ञान करूच शकत नाही, हे येथे अगदी आवर्जून सांगावेसे वाटते.
कलियुगातील आहार
हा रज-तमात्मक प्रधान कृतींच्या आहारी गेल्याने तो आचारयुक्त आहार न रहाता विकृतीजन्यतेचे सावट घेऊन जन्माला आलेला एकप्रकारचा कुयोग दर्शवणारा घटकच झाला आहे. आहारावर विदेशी संस्कृतीची तमोगुणी छाया असल्याने हा आहार, आहार न रहाता असुरांचे पोषण करणारी विकृतीच झाली आहे.’
– एक विद्वान (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या ‘एक विद्वान’ या नावाने भाष्य करतात. ७.३.२००८)