इयत्ता १० वी आणि १२ वी यांच्या परीक्षेत सनातनचे साधक आणि हितचिंतक यांच्या विद्यार्थ्यांचे सुयश

१. कु. देवकरण राजेंद्र जवळ, खारघर, नवी मुंबई (इयत्ता १० वी) : ९७ टक्के

कु. देवकरण जवळ

परीक्षेत मिळालेल्या यशाविषयी कु. देवकरण म्हणाला, ‘‘अभ्यास करण्यापूर्वी मी प्रार्थना करून गणपतिस्तोत्र म्हणायचो. अभ्यास झाल्यानंतर देवाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायचो. प्रार्थना केल्यामुळे अभ्यासात मन एकाग्र होत होते. परीक्षेत गणपतिस्तोत्र म्हणून आणि श्री गणेशाचा नामजप करून मगच मी उत्तरे लिहायला प्रारंभ करत असे. उत्तरे लिहून झाल्यावर देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत असे. देवाच्या कृपेमुळे मला हे यश प्राप्त झाले. याविषयी ईश्‍वराच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’’

———

२. कु. अमिषा राजेंद्र जवळ, खारघर, नवी मुंबई (इयत्ता १२ वी) (विज्ञान शाखा) : ९० टक्के

अमिषा जवळ

परीक्षेत मिळालेल्या यशाविषयी मनोगत व्यक्त करतांना कु. अमिषा म्हणाली, ‘‘अभ्यास करतांना मी नियमित अत्तर-कापूर लावते. यामुळे अभ्यासात एकाग्रता येत होती. अभ्यासाचा ताण किंवा झोप येत नसे. प्रार्थना करून आणि गणपतिस्तोत्र म्हणून मी अभ्यासाला प्रारंभ करायचे आणि अभ्यास झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करायचे. उत्तरपत्रिका लिहायला प्रारंभ करण्यापूर्वीही मी श्री गणेशाला प्रार्थना करायचे. त्यानंतर गणपतिस्तोत्र म्हणून ११ वेळा नामजप करायचे. उत्तरे लिहून झाल्यानंतर देवाला कृतज्ञता व्यक्त करायचे. भगवंताच्या कृपेमुळे मला चांगले गुण मिळाले. भगवंताच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’’

————–

३. कु. चिन्मयी मनोज ओंकार, कर्णावती, गुजरात (इयत्ता १० वी) : ८९ टक्के

कु. चिन्मयी ओंकार

कु. चिन्मयी प्रासंगिक टंकलेखनाची सेवा करते. परीक्षेत मिळालेल्या यशाविषयी ती म्हणाली, ‘‘भगवान श्रीकृष्णानेच माझ्याकडून अभ्यास करवून घेतला आणि उत्तरपत्रिकाही त्यानेच माझ्याकडून लिहून घेतल्या’, याचा अनुभव मला आला.’’

वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती : परीक्षा झाल्यानंतर मी भगवान श्रीकृष्णाला जेव्हा जेव्हा ‘परीक्षेत मला किती गुण मिळतील ?’, असे विचारले, त्या त्या वेळी मला श्रीकृष्णाकडून ‘८९ टक्के गुण मिळतील’, असे उत्तर मिळाले. प्रत्यक्षातही मला तेवढेच गुण मिळाले.

……………..

४. कु. देवश्री मनोज ओंकार, कर्णावती, गुजरात (इयत्ता १० वी) : ९५.०४ टक्के  

कु. देवश्री ओंकार

कु. देवश्री टंकलेखनाची सेवा करते, तसेच साधकांकडून सेवेचा आढावा घेते. परीक्षेत मिळालेल्या यशाविषयी कु. देवश्री म्हणाली, ‘‘प.पू. गुरुदेवांच्या अपार कृपेमुळेच मला चांगले गुण प्राप्त झाले. याविषयी गुरुदेवांच्या चरणी किती कृतज्ञता व्यक्त करावी, तितकी अल्पच आहे.’’

……………..

५. कु. ऋग्वेद राजेश राजंदेकर, अकोला, इयत्ता १२ वी (विज्ञान शाखा) : ८४ टक्के

कु. ऋग्वेद राजंदेकर

अकोला येथील सनातनचे साधक श्री. श्यामसुंदर राजंदेकर यांचा नातू कु. ऋग्वेद राजेश राजंदेकर याने बारावीच्या परीक्षेत ८४ टक्के गुण प्राप्त केले. तो नियमित जप करतो. ‘‘परमपूज्य डॉक्टरांमुळे हे यश मिळाले’’, असे त्याने सांगितले.

……………..

६. कु. वेद गजानन चुकेकर, माहीम, मुंबई, इयत्ता १२ वी (वाणिज्य शाखा) : गुण ७९ टक्के

कु. वेद प्रासंगिक सेवेत सहभागी होतो.

……………..

७. कु. श्रीपाद प्रवीण वैद्य, बदलापूर (जिल्हा ठाणे), इयत्ता १२ वी (कला शाखा) : ७८ टक्के

कु. श्रीपाद वैद्य

कु. श्रीपाद त्याच्या यशाविषयी म्हणाला, ‘‘१२ वी कला शाखेच्या परीक्षेचा अभ्यास करण्यापूर्वी माझ्याकडून सतत प.पू. गुरुदेवांना प्रार्थना व्हायची, ‘तुम्हीच माझ्याकडून सर्व विषयांचा अभ्यास व्यवस्थितपणे करवून घ्या.’ अभ्यासाला बसण्यापूर्वी मी श्री गणेश, श्री सरस्वतीदेवी आणि प.पू. गुरुदेव यांना प्रार्थना करायचो अन् मग अभ्यासाला प्रारंभ करायचो. तेव्हा मला जाणवायचे, ‘साक्षात् प.पू. गुरुदेव माझ्यासमोर बसले असून मी त्यांच्यासमोर बसून अभ्यास करत आहे.’ जेव्हा एखाद्या विषयातील कठीण भाग मला समजत नसे, तेव्हा माझ्याकडून श्री गणेश, श्री सरस्वतीदेवी आणि प.पू. गुरुदेव यांना ‘तुमच्या कृपेने माझे मन, बुद्धी यांना सर्व विषयांचे व्यवस्थितपणे आकलन होऊ दे आणि केलेला अभ्यास माझ्या स्मरणात राहू दे’, अशी प्रार्थना व्हायची. यानंतर मला प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व सर्वत्र जाणवायचे आणि माझा अभ्यास तणावविरहित होत असे.’’