‘टिक-टॉक’वर बंदी घाला !

टिक-टॉक’ या चिनी ‘अ‍ॅप’वर बंदी घालण्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. वर्ष २०१६ मध्ये ‘बाईट डान्स टेक्नॉलॉजी’ या चिनी आस्थापनाने हे ‘अ‍ॅप’ बाजारात आणले. अल्पावधीतच ते जगभर लोेकप्रिय झाले. याद्वारे १५ सेकंदांचे छोटे  ‘व्हिडिओ’ बनवून ते प्रसारित करता येतात. जेवढ्या शीघ्रतेने ‘अ‍ॅप’ लोकप्रिय झाले, तेवढ्याच वेगाने ते वादाच्या भोवर्‍यात सापडले. याचे कारण या ‘अ‍ॅप’द्वारे फोफावलेली विकृती आणि अनैतिकतेला मिळालेली चालना ! लहान मुलांचे लैंगिक शोषण, बलात्कार, ‘अ‍ॅसिड अ‍ॅटॅक’ असे अनेक विकृत ‘व्हिडिओ’ या ‘अ‍ॅप’च्या माध्यमातून खुलेपणाने प्रसारित केले जातात. अश्‍लील चलचित्रांना तर मर्यादाच नाही. काही दिवसांपूर्वी फैजल सिद्दिकी याने तरुणीच्या तोंडावर आम्ल फेकल्यामुळे तरुणीचा तोंडवळा विद्रुप झाल्याच्या संदर्भातील एक ‘व्हिडिओ’ प्रसारित केला होता. मुजीबूर रहमान आणि त्याच्या साथीदारांनी बलात्काराला प्रोत्साहन देणारा ‘व्हिडिओ’ बनवला होता. कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर काही धर्मांधांनी ‘मास्क’, तसेच सुरक्षित सामाजिक अंतर यांसारखे नियम मोडण्यासाठी लोकांना उद्युक्त करणारे ‘व्हिडिओ’ बनवले होते. ‘टिक-टॉक’वरील अशा समाजविघातक, अश्‍लील आणि किळसवाण्या चलचित्रांची कितीतरी उदाहरणे सांगता येतील. सध्याच्या टिक-टॉक बंदीला ‘यू-ट्यूब विरुद्ध टिक-टॉक’ वादाचा पदरही आहे; पण ‘टिक-टॉक’ असो वा मनोरंजनाच्या नावाखाली विकृतीला चालना देणार्‍या गोष्टींवर सरकारने बंदी घालणेच हिताचे आहे.

‘सेन्सॉरशिप’ हवी !

चित्रपटांमधील अश्‍लील संवाद अथवा दृश्ये यांना कात्री लावण्यासाठी भारतात केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ आहे. ही संस्था किती प्रभावीपणे कार्य करते, हा एक वेगळाच आणि गंभीर प्रश्‍न आहे; पण नैतिकता रोखण्यासाठी म्हणून तोडक्या मोडक्या प्रमाणात का होईना; पण ही एक व्यवस्था कार्यरत आहे. दुर्दैवाने अशी सोय ‘टिक-टॉक’च्या प्रतवारीतील ‘अ‍ॅप’ना नाही. ‘अ‍ॅप’च्या मालकांनी ‘आम्ही ‘कंटेंट’ (सामग्री) पडताळून प्रसारित करतो’, असा कितीही दावा केला, तरी तो फोल ठरतो; कारण तसे असते, तर अश्‍लील ‘व्हिडिओ’ प्रसारितच झाले नसते. याला गेल्या काही वर्षांत झालेली ‘इंटरनेट क्रांती’ही कारणीभूत आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करायचा, हे वापरकर्त्यावर अवलंबून असते. तंत्रज्ञानाने नवनवीन साधने मनुष्याला उपलब्ध करून दिली; पण ती चांगल्या प्रकारे वापरण्याची बुद्धी मात्र दिली नाही. मनोरंजनाच्या नावाखाली ‘टिक-टॉक’छाप ‘अ‍ॅप’, तसेच ‘वेबसीरिज्’सारख्या प्रकारांनी नैतिकतेची सगळी बंधने सोडून दिली आहेत. याला आळा घालणे अत्यावश्यक आहे.

गेल्या वर्षी मद्रास उच्च न्यायालयाने लहान मुलांचे लैंगिक शोषण होते; म्हणून ‘टिक-टॉक’वर बंदी घातली होती; पण पुढे ती उठवली गेली. इंडोनेशियानेही या ‘अ‍ॅप’वर बंदी घातली होती. बांगलादेशातही यावर बंदी आहे. जानेवारीमध्ये अमेरिकेच्या सैनिकांनाही सरकारी भ्रमणभाषवर ‘टिक-टॉक’ वापरण्यास बंदी करण्यात आल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. नुकतेच ‘टिक-टॉक’कडून भारतातील कर्मचार्‍यांना आदेश देण्यात आला आहे की, चीन सरकारच्या विरोधात असलेले कोणतेही साहित्य ‘टिक-टॉक’वर ठेवण्यात येऊ नये, तसेच तिबेटचे बौद्ध धर्मगुरु दलाई लामा आणि तिबेटचे समर्थन करणारे साहित्य हटवण्यात यावे. विस्तारवादी चीनने तिबेट गिळकृंत केला आहे. ‘टिक-टॉक’ चीनच्या विस्तारवादी भूमिकेलाच पाठबळ देत आहे. ‘आत्मनिर्भर’ भारताचा विचार केला, तरी ‘टिक-टॉक’चे काडीचेही महत्त्व नाही. केंद्र सरकारने ‘टिक-टॉक’वर बंदी घालून देशाच्या संस्कृतीला निर्माण झालेला धोका दूर करावा आणि त्या निमित्ताने चीनला दणका द्यावा, अशी देशवासियांची अपेक्षा आहे.

द्रष्टा दृश्यवशात् बद्ध  !

‘द्रष्टा दृश्यवशात् बद्ध:’ म्हणजे द्रष्टा दृश्य पाहिल्याने त्यात बद्ध होऊन जातो (अडकतो). जर ‘टिक-टॉक’सारखे अ‍ॅप, ‘वेबसीरिज्’, तसेच ‘पबजी’, ‘ब्लू-व्हेल’, ‘पोकेमॉन गो’ यांसारखे ‘ऑनलाईन’ खेळ यांमुळे वापरकर्त्यावर सतत हिंसक, भडक आणि अश्‍लील गोष्टींचा भडिमार होतो. असे होत असेल, तर त्याला चांगले विचार सुचणार कुठून ? स्वामी विवेकांनद यांनी म्हटले होते की, देशातील युवकांच्या तोंडी कोणती गाणी आहेत, त्यावरून त्या देशाचे भविष्य सांगता येईल. स्वामी विवेकांनद यांची मोजपट्टी लावायची झाली, तर भारताला उज्ज्वल बनवण्यासाठी अजून किती झटायचे आहे, हे लक्षात येईल.

चांगल्या सवयी लागायला वेळ लागतो; पण वाईट सवयी चटकन जडतात. आपल्याकडून झालेल्या समाज, राष्ट्र आणि धर्म रक्षणार्थ कार्याचे किंवा प्रबोधनाचे लोकांना ‘व्हिडिओ’ बनवावेसे वाटतील, असे कार्य करायचे असेल, तर त्यासाठी आयुष्यभर झिजावे लागते. कष्ट करावे लागते. ‘टिक-टॉक’वर मात्र तुम्ही दात घासत असल्यापासून पायात चप्पल घालण्यापर्यंत कोणत्याही कृतीचे ‘व्हिडिओ’ बनवू शकतात. अशाने झटपट प्रसिद्धी मिळते; पण ती तितकीच निरर्थक आणि अशाश्‍वत असते. आचरट चाळ्यांचे व्हिडिओ बनवायला डोके लागत नाही, तर अचाट कार्य करून दाखवण्यासाठी धमक लागते. तोच खरा पुरुषार्थ असतो. स्वस्तातील प्रसिद्धीला हपापलेल्या टिक-टॉकींनी हे लक्षात घ्यायला हवे. आज बंदी घातली, तर टिक-टॉक बंद होईल; पण उद्या त्या धर्तीवर नवे काही तरी फालतू साधन सज्ज होईल. त्यामुळे या परिस्थितीवर शाश्‍वत उपाय योजायचा असेल, तर लोकांना सकारात्मक कार्यात गुंतवून ठेवायला हवे. समाजाला एखाद्या चांगल्या ध्येयाच्या दिशेने काम करण्यासाठी प्रेरित करायला हवे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सात्त्विक समाजाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करायला हवेत. ‘टिक-टॉक’ची टिकटिक निष्प्रभ करायची असेल, तर सात्त्विकतेचा घंटानादच आवश्यक आहे !