यवतमाळ जिल्ह्यात २ दिवसांत ३८ जणांवर फौजदारी गुन्हा नोंद

यवतमाळ , २४ मार्च (वार्ता.) – जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याचे उल्लंघन करणार्‍या ३८ जणांवर २२ आणि २३ मार्च या दिवसांमध्ये फौजदारी गुन्हा नोंद करण्यात आला. विनाकारण फिरणार्‍यांना पोलिसांकडून चोप दिला जात आहे. जिल्ह्यात आंध्रप्रदेश राज्यातून येणार्‍या नागरिकांची संख्या अधिक असल्यामुळे २४ मार्चपासून जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी एम्. देवेन्द्र सिंह, पोलीस अधीक्षक एम्. राजकुमार यांनी शहरांमध्ये रस्त्यावर उतरून परिस्थितीची पहाणी केली.

प्रशासनाकडून रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन

कोरोनाविषयी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून रक्तदान शिबिर घेण्याच्या सूचना जिल्ह्यातील १६ तालुक्यांना देण्यात आल्या आहेत. राळेगाव येथे २४ मार्चला आसरा सामाजिक संघटनेने रक्तदान शिबिर घेण्याचे आयोजन केले आहे.