नवी देहली – भारत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उचलत असलेली पावले कठोर असली, तरीही ती योग्यच आहेत. या प्रकारची पावले उचलणे भारताने चालू ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक मायकल जे रेयान यांनी कौतुक म्हणून केले आहे. भारतातील ३१ राज्यांनी लॉकडाऊन (दळणवळणबंदी) घोषित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मायकल जे रेयान यांनी ट्वीट केले आहे.
रेयान यांनी पुढे म्हटले आहे की, चीनप्रमाणेच भारत हाही बहुसंख्य नागरिक असलेला देश आहे. या देशात कोरोनाचे संकट ओढवल्यानंतर आक्रमक निर्णय घेण्यात आले. ते निर्णय योग्यच आहेत. नागरिकांच्या आरोग्य जपण्याच्या आणि जीव वाचवण्याच्या दृष्टीने भारताने घेतलेले निर्णय योग्य आहेत. भारताने ज्याप्रमाणे देवी आणि पोलिओ या दोन रोगांशी लढा दिला, तसाच लढा देण्याची भारताची वृत्ती आताही दिसून येत आहे.