आवश्यक कारणासाठी प्रवास करावा लागल्यास पुढील काळजी घ्या !

साधकांना सूचना

‘सध्याच्या कोरोना १९ (कोविड १९) विषाणूवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रत्येकानेच अनावश्यक प्रवास टाळायला हवा, तरीही ‘काही आवश्यक कामानिमित्त प्रवास करावाच लागला किंवा एखाद्या समारंभ अथवा कार्यक्रमास जावे लागले, तर काय काळजी घ्यावी ?’, असा प्रश्‍न विचारण्यात येतो. यासंबंधाने सध्याच्या स्थितीमध्ये पुढील काळजी घ्यावी.

१. वाहनात घ्यावयाची दक्षता

अ. स्वतःच्या वाहनाने किंवा न्यूनतम व्यक्ती असलेल्या गाडीने प्रवास करावा.

आ. वातानुकूलित बस किंवा आगगाडी यांतून प्रवास करणे टाळा. स्वतःच्या वाहनामध्येही वातानुकूलन यंत्राचा वापर टाळावा.

इ. रेल्वे किंवा बस यांमधून प्रवास करत असतांना ‘आपल्या भोवती सर्दी, खोकला किंवा ताप या रोगांची लक्षणे असलेली व्यक्ती आहे’, अशी शंका आली, तर तिच्यापासून १ मीटरपेक्षा दूर थांबावे (सामाजिक अंतर पाळावे) किंवा शक्य असल्यास प्रवासाचा दुसरा पर्याय निवडावा, उदा. दुसर्‍या बसने जावे.

ई. गर्दीतून प्रवास करतांना तोंडावर सतत मास्क किंवा स्वच्छ धुतलेला रुमाल बांधावा.

उ. साबणाने हात स्वच्छ धुवूनच तोंडवळ्याला हातांचा स्पर्श करावा.

ऊ. प्रवासात हात स्वच्छ धुण्यासाठी साबण किंवा ‘सॅनिटायझर’चा शक्य असल्यास मधेमधे वापर करावा.

२. प्रवासात वापरलेल्या कपड्यांच्या संदर्भात घ्यावयाची काळजी

अ. प्रवासात वापरलेल्या कपड्यांवर साधारण १२ घंट्यांपर्यंत रोग पसरवणारे जंतू जिवंत राहू शकतात. यामुळे प्रवासातून घरी आल्यावर त्या कपड्यांनी घरात न फिरता थेट प्रसाधनगृहात जावे.

आ. अंगावरचे कपडे काढून साबण लावून हात-पाय आणि तोंड स्वच्छ धुवावे.

इ. प्रवासातील कपड्यांना स्पर्श न करता घरात वापरण्याचे कपडे घालावेत.

ई. प्रवासातील कपडे पुन्हा न धुता वापरायचे असल्यास त्यांचा अन्य वस्तूंना किंवा धुतलेल्या कपड्यांना स्पर्श होणार नाही, अशा पद्धतीने ते हँगरला अडकवून वेगळे ठेवावेत.

उ. शक्य असल्यास हे कपडे उन्हात ठेवावेत.

ऊ. प्रवासात वापरलेल्या कपड्यांना कधीही स्पर्श केल्यास लगेच हात स्वच्छ धुवावेत.

ए. प्रवासात वापरलेले कपडे धुवायचे झाल्यास ते नेहमीप्रमाणे धुवून शक्य असल्यास उन्हात वाळत घालावेत.’

– डॉ. पांडुरंग मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.३.२०२०)