‘सध्या समाजात बर्याच जणांच्या केसांच्या समस्या पुष्कळ वाढल्या आहेत. त्यासाठी आपण बराचसा पैसा व्यय करतो; पण महागडे औषधोपचार करूनही आपल्याला अपेक्षित असा लाभ होत नाही. केस गळण्यामागील कारणे ही स्वतःचा आहार आणि विहार यांच्याशी संबंधित आहेत.
१. ‘शरिरात वाढलेली उष्णता’, हे केस गळण्याचे प्रमुख कारण असणे
१ अ. उष्णता वाढण्याची कारणे
१. रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठणे
२. पोट साफ न होणे
३. रात्री गाढ झोप न लागणे
४. वेळेवर न जेवणे
५. तेलकट आणि मसालेदार पदार्थ अतीप्रमाणात खाणे

१ आ. अन्न पचवण्यासाठी शरीर अधिक प्रमाणात पित्ताची, म्हणजेच आम्लाची निर्मिती करत असल्याने शरिरात उष्णता निर्माण होणे : वरील कारणांमुळे पोटाच्या अवयवांवर ताण येतो आणि अन्नाचे पचन होण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अन्नपचन नीट होत नाही. तेव्हा ‘पोट जड होणे, गॅसेस, करपट ढेकर’ इत्यादी त्रास निर्माण होऊन शरिरात विषारी पदार्थ वाढायला लागतात. पोटाच्या या सर्व समस्यांमुळे आपल्याला हवी असणारी प्रथिने आणि जीवनसत्त्वे (व्हिटामिन्स) शरिरात (आतड्यात) शोषली जात नाहीत. त्यामुळे आपल्या शरिरातील प्रथिने आणि जीवनसत्त्वे न्यून व्हायला लागतात. ‘बाहेरचे पदार्थ अधिक खाणे, पचायला जड पदार्थ खाणे, व्यायाम न करणे’, यांमुळे खाल्लेले लवकर पचत नाही. ते पचवण्यासाठी शरीर अधिक प्रमाणात पित्त, म्हणजेच आम्ल (ॲसिड) निर्माण करते; पण या आम्लामुळे शरिरात उष्णता निर्माण होते. मग उष्णतेने ‘केस गळणे, केस पिकणे, केसांची वाढ खुंटणे’, अशा प्रकारचे त्रास व्हायला लागतात. अशा वेळी रुग्ण केसांसाठी बराच पैसा व्यय करतात; पण त्यांना अपेक्षित असा लाभ होत नाही.
२. उपाय
अ. ‘सर्वप्रथम शरीरशुद्धी करणे, शरिरातील उष्णता न्यून करण्यासाठी योग्य औषधोपचार घेणे, तसेच ‘वेळेवर झोपणे, वेळेवर उठणे, प्रतिदिन सकाळीच पोट साफ होणे आणि वेळेवर जेवणे’, यांसाठी प्रयत्न करणे’, हे उपाय केल्यामुळे उष्णता न्यून होऊन केस गळणे न्यून होते.
आ. आपल्या शरिराला योग्य जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन इ, प्रथिने, लोह, ओमेगा -३, जस्त आणि बायोटिन (व्हिटॅमिन बी ७)) मिळण्यासाठी तसा आहार घ्यावा.’
– डॉ. दीपक जोशी, निसर्गाेपचार तज्ञ (बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स), देवद, पनवेल. (१८.२.२०२५)