आज प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) श्रीधरस्वामी यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम !

एका सात्त्विक प्रवृत्तीच्या माणसाने प्रभु श्रीरामचंद्राचे दर्शन व्हावे, यासाठी २५ कोटी रामनामाचा जप केला; परंतु त्याला काही प्रभूंचे दर्शन काही झाले नाही. एवढा जप पूर्ण करण्यासाठी त्याला साधारण ३० वर्षे लागली. ‘प्रभु श्रीरामांनी दर्शन दिले नाही’, या जाणिवेतून तो माणूस फार उद्विग्न झाला आणि सज्जनगडावर गेला. तिथे समर्थ रामदासस्वामींच्या समाधीजवळ जाऊन त्यांना अद्वातद्वा बोलायला लागला. तिथे बाजूलाच प.प. श्रीधरस्वामी बसले होते. आपल्या सद्गुरूंना असे बोलतांना पाहून त्यांना थोडे वाईट वाटले आणि त्यांनी त्या माणसाला विचारले, ‘काय झाले ? तुम्ही असे माझ्या सद्गुरूंविषयी का बोलत आहात ?’
त्यावर तो माणूस बोलू लागला, ‘हे तुमचे रामदासस्वामी यांनी असे सांगितले होते की, रामनामाचा १३ कोटी जप झाल्यानंतर साक्षात् प्रभु श्रीरामाचे दर्शन होईल; पण तुमच्या सद्गुरूंनी खोटे सांगितले. माझा २५ कोटी रामनामाचा जप झाला, तरी अजूनपर्यंत श्रीरामाने दर्शन दिलेले नाही. माझ्या आयुष्याची ३० वर्षे खर्च झाली आणि माझ्या हाती काहीच लागले नाही. अशा प्रकारे थापा मारून लोकांची दिशाभूल करणे, हे चुकीचे आहे.’ प.प. श्रीधरस्वामी यांनी काही क्षण डोळे मिटले आणि मंद स्मित करून ते म्हणाले, ‘१३ कोटी रामनामाचा जप केल्यावर प्रभु श्रीरामाचे दर्शन होते, हे खरच आहे आणि माझे सद्गुरु खोटे कधीच सांगणारच नाहीत.’ तो माणूस म्हणाला, ‘अहो, मग माझा तर २५ कोटी जप झाला आहे, हे काय खोटे आहे ?’
प.प. श्रीधरस्वामी यांनी तिकडे सेवा करणार्या एका शिष्याला कागद आणि पेन घेऊन यायला सांगितले. ते त्या माणसाला देऊन त्याला म्हणाले, ‘एका बाजूला रामनामाचा जप तुमची जमा म्हणून लिहा आणि त्याच्या दुसर्या बाजूला तुमच्या पुण्याईचा खर्च लिहा.’
जमा : श्रीरामाचा जप २५ कोटी
खर्च : १. मुलीचे लग्न जमत नव्हते; म्हणून श्रीरामाला लग्न जमावे, यासाठी प्रार्थना केली. त्यात साडेचार कोटी जपाची पुण्याई खर्ची पडली. मुलीचे लग्न एका चांगल्या घरी झाले.
२. मुलगा दहावीच्या परीक्षेत बर्याच वेळा अनुत्तीर्ण होत होता. तो उत्तीर्ण होण्यासाठी रामाला प्रार्थना केली. त्यात अडीच कोटी जपाची पुण्याई खर्ची पडली. मुलगा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला.
३. मुलाला नोकरी लागावी; म्हणून रामाची प्रार्थना केली, त्यात ५ कोटी जपाची पुण्याई खर्ची पडली. मुलाला चांगल्या वेतनाची नोकरी मिळाली.
४. जेव्हा पत्नी बरीच आजारी पडली होती. डॉक्टरांनीसुद्धा आशा सोडून दिलेली होती. अशा वेळी रामाला पुष्कळ प्रार्थना आणि आर्जव केली. त्यात ५ कोटी जपाची पुण्याई खर्ची पडली.
५. संतापाच्या भरात, निराशेच्या वेळी आणि उद्विग्न मनः स्थितीमध्ये अनेक संत पुरुषांना नावे ठेवली; त्यांच्याविषयी अनुद्गार काढले. त्यात १ कोटीची पुण्याई खर्ची पडली.
एकूण झालेला खर्च १८ कोटी. शेष राहिले ७ कोटी. तुमच्याकडे अजूनही ७ कोटीची पुण्याई शेष आहे. ‘श्रीरामाचे दर्शन हवे असल्यास निष्काम भावनेने आणखी ६ कोटी जप करा’, त्याने तुम्हाला प्रभु श्रीरामाचे दर्शन निश्चितच होईल.’
प.प. श्रीधरस्वामी यांच्या या उपदेशाने त्या माणसाचे समाधान झाले आणि त्याने अतिशय निष्काम भावनेने उरलेला ६ कोटी जप काही वर्षांतच पूर्ण केला आणि त्याला प्रभु श्रीरामांनी प्रत्यक्ष दर्शन दिले.
– मंदार देशपांडे, एक धर्मप्रेमी.