जलसंपदा विभागाला देण्यात येणार्‍या देयकामध्ये ५ वर्षांत चौपट वाढ !

प्रतीकात्मक छायाचित्र

पुणे – गेल्या ५ वर्षांत नागरिकांची पाण्याची मागणी वाढत असल्यामुळे जलसंपदा विभागाला देण्यात येणार्‍या देयकामध्ये ५ वर्षांत चौपट वाढ झाली आहे. वर्ष २०२४ – २५ मध्ये महापालिकेचा पाणी वापरासाठी जलसंपदा विभागाकडे २०२ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. नागरिक मोठ्या प्रमाणावर पाण्याची मागणी करत आहेत. यासाठी महापालिका वेगवेगळ्या धरणांमधून पाणी घेते. या बदल्यात महापालिकेला जलसंपदा विभागाला देयक द्यावे लागते. महापालिकेने ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा अधिक पाणी घेतल्यास जलसंपदा विभाग औद्योगिक दराने शुल्क घेते. त्यामुळे अतिरिक्त पाण्यासाठी जलसंपदा विभाग चुकीच्या पद्धतीने आकारणी करत असल्याने खर्च वाढल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले. महापालिकेला राज्य सरकारने मागील वर्षासाठी १४.६२ टी.एम्.सी. पाणीसाठा संमत केला असला तरी महापालिकेला वर्षाला २१ टी.एम्.सी. पाणी लागते. महापालिका धरणातून प्रत्यक्षात १८ ते १९ टी.एम्.सी. पाणी उचलते. त्यामुळे ठरवून दिलेल्या संमत कोट्यापेक्षा जादा पाणी घेतल्याने जलसंपदा विभाग जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या आदेशाने महापालिकेकडून पाण्यासाठी अधिकचा दर घेते.