दीनानाथ रुग्णालयातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरण !
पुणे – दीनानाथ रुग्णालयात वेळेत प्रविष्ट करून न घेतल्याने तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ११ एप्रिलला भिसे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. भेटीनंतर ‘काँग्रेस भवन’ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना ते म्हणाले की, या प्रकरणात तीन-तीन अहवाल सिद्ध करून सरकार दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. दीनानाथ रुग्णालय धर्मादाय आयुक्तांच्या अंतर्गत येते. आजपर्यंत सरकारने या रुग्णालयाला साहाय्य केले आहे. रुग्णालयाने धर्मादाय आयुक्तांच्या अटी-शर्तींचा भंग केला आहे. खासगी रुग्णालयाप्रमाणे आगाऊ पैशाची मागणी केली आहे.
सरकारने रुग्णालयाचे कार्यकारी मंडळ बरखास्त करावे. रुग्णालय कह्यात घेऊन जिल्हाधिकार्यांद्वारे चालवावे. या सर्व प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली एस्.आय.टी. (विशेष तपास पथक) स्थापन करून करावी. पोलिसांनी ‘सीसीटीव्ही’ फुटेज पडताळावे, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
तीनही अहवाल शासनाला सादर !
तनिषा भिसे यांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा मातामृत्यू असून त्याविषयी महापालिकेच्या ‘मातामृत्यू अन्वेषण समिती’ने भिसे यांच्या मृत्यूचे विश्लेषण करून त्याचा अहवाल राज्यशासनाला सादर केला आहे. तिच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा न झाल्याने मेंदूच्या पेशींवर परिणाम होऊन मेंदूचे कार्य बिघडल्याने (हायपॉक्सिक एन्सेफॅलोपॅथी) तिचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत तीनही अहवाल शासनाला सादर झाले आहेत.