मुंबई – ११ एप्रिल या दिवशी मांडवा जेटीजवळ अजंठा आस्थापनाच्या बोटीला छिद्र पडल्याच्या घटनेच्या चौकशीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाकडून विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता ही दुर्घटना घडली. या वेळी बोटीतील १३० प्रवाशांना अन्य बोटीत घेऊन काठावर आणण्यात आले.
या अपघातामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. या घटनेच्या चौकशीसाठी सागरी अभियंता प्रकाश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ३ सदस्यीस समिती स्थापन करण्यात आली आहे. येत्या ३ दिवसांत या प्रकरणाचा अहवाल शिफारशींसह महाराष्ट्र सागरी मंडळाला सादर करावयाचा आहे. याविषयी बंदरे आणि मत्स्य व्यवसाय विकास मंत्री नीतेश राणे यांनी या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याचा आदेश दिला आहे, तसेच संबंधित बोटीवर पुढील निर्णय होईपर्यंत प्रवाशांवर निर्बंध घालण्यात आले असल्याचे सांगितले.