
मुंबई – अयोध्येत श्रीराममंदिराची निर्मिती झाल्यानंतर देशात रामराज्य स्थापन व्हावे आणि हिंदूंमधील शौर्य जागृत व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीद्वारे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह देशभरात ५०० ठिकाणी सामूहिक गदापूजन केले. या वेळी मारुतिरायांना रामराज्याच्या स्थापनेसाठी बळ प्रदान करण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मागील ३ वर्षांपासून हनुमान जयंतीनिमित्त देशभरात सामूहिक गदापूजन करण्यात येत आहे. यावर्षीही या उपक्रमामध्ये हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक यांचा उत्तम सहभाग लाभला.
या कार्यक्रमांचा प्रारंभ शंखनादाने झाला. त्यानंतर सामूहिक प्रार्थना, ‘गदापूजन’ विधी, श्री हनुमानाची आरती, मारुति स्तोत्रपठण केल्यानंतर ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजप करण्यात आला. या वेळी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी मारुतिरायांचे गुण कसे आत्मसात करावेत’, याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’ घेण्यात आली.
हिंदूंमधील शौर्य आणि सामर्थ्य वाढवण्यासाठीच गदापूजन ! – डॉ. उदय धुरी, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
मारुतिरायांची ‘गदा’ हे केवळ युद्धातील अस्त्र नव्हे, तर ती धर्मरक्षणाचा संकल्प, अन्यायाविरुद्ध उभे रहाणे आणि भगवंताच्या कार्यासाठी अहर्निश झटण्याचे प्रतीक आहे. अयोध्येत श्रीरामलल्ला विराजमान झाले; परंतु त्यांचे कार्य अद्याप अपूर्ण आहे. मंदिर उभारले, आता रामराज्य घडवण्याचे दायित्व आपल्या सर्वांवर आहे. हे कार्य हनुमानासारखे शौर्य, निष्ठा, त्याग आणि सामर्थ्य यांच्याविना शक्य नाही; म्हणूनच या वर्षीही देशभरात गदापूजनाच्या माध्यमातून हिंदूंमधील शौर्य जागृत करण्याचा आणि रामराज्याच्या दिशेने सामूहिक वाटचाल करण्याचा निर्धार करायचा आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई, पालघर येथे ५० हून अधिक ठिकाणी गदापूजन !

मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई, पालघर या जिल्ह्यांमध्ये ५० हून अधिक ठिकाणी सामूहिक गदापूजन करण्यात आले. मुंबईमध्ये फोर्ट, माहीम, भांडुप, जोगेश्वरी यासह वसई, विरार, ठाणे, डोंबिवली, भिवंडी, बदलापूर, पनवेल, खोपोली, अलिबाग, नागोठणे, पाली या ठिकाणी गदापूजन करण्यात आले. या सर्व ठिकाणी युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.