कर्नाटकातील हिंदूंसाठी आधारस्तंभ आणि हिंदु विरोधकांच्या विरोधात संघर्ष करणारे श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक !

श्री. प्रमोद मुतालिक यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यात वर्ष १९६३ मध्ये एका संप्रदायस्त ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील हनुमंतराव मुतालिक आणि आई सुमतीबाई हे दोघेही राष्ट्र अन् धर्म कार्याविषयी निष्ठावान होते. त्यांचे वडील रा.स्व.  संघात प्रचारक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांनी लहानपणापासूनच आपल्या मुलाला राष्ट्रभक्तीचे संस्कार दिले. परिणामी ते अगदी लहान वयात, म्हणजे १३ व्या वर्षी रा.स्व. संघात सामील झाले. त्यांनी त्यांचे शिक्षण ‘एस्.एस्.एल्.सी., हुक्केरी’ येथे पूर्ण केले आणि वाणिज्य शाखेची पदवी बेळगाव येथे घेतली. त्यांनी दिवंगत विठ्ठल अडके (सनदी लेखापाल) यांच्या प्रेरणेने हिंदुत्वाच्या कार्यात झोकून द्यायचे ठरवले. राष्ट्र-धर्माच्या कार्यासाठी ते तळमळीने काम करत असल्याचे पाहून संघाने वर्ष २००४ मध्ये बजरंग दलाचे दक्षिण भारताचे प्रचारक म्हणून नियुक्त केले. त्यांनी दक्षिण भारतात भाषण, संपर्क अभियान आणि हिंदुत्वाचे कार्य करत लाखो तरुणांना बजरंग दलात सामील केले. त्या काळात बजरंग दलाचे नाव ऐकताच केवळ जिहादीच नव्हे, तर सरकार, लोकप्रतिनिधीही थरथर कापायचे. अशा शक्तीशाली संघटनेची दक्षिण भारतात निर्मिती श्री. प्रमोद मुतालिक यांनी केली.

ते २२ वर्षे कर्नाटकमध्ये संघाचे प्रचारक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ते विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दलाचे राज्य संघटक बनले. नंतर त्यांनी दक्षिण भारत (कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ) बजरंग दलाचे संयोजक म्हणून उत्तरदायित्व पार पाडले. त्यांनी कर्नाटकमध्ये बजरंग दलाच्या माध्यमातून हिंदु समाजात संघटनेचे महत्त्व वाढवले. खेड्यापाड्यात भगवा ध्वज आणि केसरी शाली यांचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला. जिहादी, धर्मांतर करणारे ख्रिस्ती, मुसलमानांचे तुष्टीकरण करणारे काँग्रेसी आणि नास्तिक साम्यवादी यांच्या विरोधात संघर्ष उभा करून हिंदु युवकांमध्ये धैर्य निर्माण करण्याचे श्रेय श्री. प्रमोद मुतालिक यांना जाते. पुढे बजरंग दलाशी विचारभिन्नता झाल्याने त्यांना संघटना सोडावी लागली. पुढे त्यांनी ‘श्रीराम सेना’ नावाने नवीन हिंदु संघटना वर्ष २००५ मध्ये स्थापन केली. तेव्हापासून आजपर्यंत ते गेली २० वर्षे कुठल्याही तडजोडीविना हिंदुत्वासाठी लढत आहेत. त्यांच्या संघर्षाला अनेक ज्येष्ठ व्यक्ती, संत यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभले.

श्री. प्रमोद मुतालिक

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल ! – संपादक

१. चिक्कमगळूर (कर्नाटक) येथील दत्तपीठाच्या रक्षणासाठी केलेला संघर्ष

चिक्कमगळूर जिल्ह्यातील चंद्रद्रोण पर्वतावर दत्तपीठ आहे. ते साक्षात् अत्री ऋषी आणि त्यांच्या शिष्यांनी तपश्चर्या केलेले पवित्र क्षेत्र आहे; परंतु तिथे मुसलमानांनी अतिक्रमण करून तेथे बाबा बुडन गिरी दर्गा बनवला आहे. तिथे प्रतिवर्षी उरूस (जत्रा) भरतो; पण हिंदूंना दत्तजयंती आणि नित्य पूजा करण्याची अनुमती नव्हती. तेथे अवैधपणे काही कबरी बांधल्या गेल्या आहेत. हिंदु क्षेत्र असूनही तिथे हिंदु पुजारी नव्हते. याविरुद्ध श्री. प्रमोद मुतालिक यांनी दत्तपीठाच्या मुक्तीसाठी मोठे आंदोलन चालू केले. लाखो तरुणांनी दत्तजयंतीला दत्तमाला धारण करून दत्तपीठाकडे जाण्यास प्रारंभ केला. त्यामुळे हिंदूही लाखोंच्या संख्येने दत्तपीठाकडे जाऊ लागले. परिणामी आज या लढ्याला ९० टक्के यश मिळाले आहे.

२. विदेशी विकृती आणि अनधिकृत पब विरुद्ध लढा !

वर्ष २००९ मध्ये मंगळुरूमध्ये एका प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयासमोर एक अनधिकृत पब चालू होता, तिथे महाविद्यालयाच्या तरुणी आणि तरुण पबमध्ये वेळ घालवत होते. अनेक वेळा विनंती करूनही पोलीस आणि पब मालक यांनी कोणतीही कारवाई केली नाही. परिणामी श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी पबमध्ये घुसून दिवसाढवळ्या महाविद्यालयाचे वर्ग सोडून पबमध्ये मजामस्ती करणार्‍या तरुण-तरुणींना जाब विचारला. वाद घालणार्‍या तरुणांसह वादावादीही झाली. या घटनेला ‘पबवर आक्रमण’ म्हणून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देण्यात आली. श्रीराम सेनेच्या २५ कार्यकर्त्यांना अटक झाली. अशा प्रकारे पबच्या वाईट प्रवृत्तीविरुद्ध लढा चालू  झाला. या वेळी पबमध्ये असलेल्या काही तरुणींच्या मातांनी श्री. प्रमोद मुतालिक यांचे कौतुक केले आणि सांगितले, ‘तुम्ही पुष्कळ चांगले काम केले आहे. तुम्ही आमच्या मुलीला पबमधून वाचवले. आमची मुलगी पबमध्ये जात असल्याचे आम्हाला ठाऊक नव्हते. मुलांच्या आई-वडिलांनी जे काम करायला हवे होते, ते तुम्ही केले.’ अशा प्रकारे एका पबवरील आक्रमणामुळे अनेक अनधिकृत पबना चेतावणी मिळाली. वर्ष २०१८ मध्ये मंगळुरू येथील न्यायालयाने या प्रकरणी श्री. मुतालिक यांच्यासह श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना निर्दोष ठरवले.

विदेशी विकृत संस्कृतीविरोधात जनजागृती करतांना पुढे त्यांनी कथित ‘व्हॅलेंटाईन डे’ (प्रेमदिवस), ‘रोज डे’ (गुलाब देण्याचा दिवस), ‘फ्रेंडशिप डे’ (मैत्री करण्याचा दिवस), ‘किस डे’ (चुंबन घेण्याचा दिवस) यांसारख्या पाश्चात्त्य संकल्पनांच्या मागील ख्रिस्ती यंत्रणेचे स्वरूप उघड करत समाजाला जागरूक केले.

‘लव्ह जिहाद’ प्रकरणी कर्नाटकातील पोलीस अधिकार्‍यांना निवेदन देतांना  श्री. प्रमोद मुतालिक त्यांच्या समवेत  श्रीराम सेनेचे कार्यकर्ते आणि अन्य विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते

३. हिंदुत्वाच्या कार्यासाठी ११७ हून अधिक गुन्हे नोंद होऊनही न डगमगता लढा देणारे हिंदु नेते !

श्री. प्रमोद मुतालिक हे हिंदु समाजाला जागृत करण्यासाठी, तसेच हिंदु समाजावर होणारे आघात जसे की, लव्ह जिहाद, हलाल जिहाद, धर्मांतर, आतंकवाद आणि हिंदु कार्यकर्त्यांची हत्या इत्यादींवर भाष्य करतात. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलिसांनी त्यांच्यावर अनेक गुन्हे नोंद केले आहेत. त्यांनी हिंदूंना आपल्या बहिणींच्या आणि स्वतःच्या संरक्षणासाठी घरात शस्त्रे ठेवण्याचे आवाहन केल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर अनेक ठिकाणी द्वेषपूर्ण भाषण केल्याचा गुन्हा नोंदवला. ‘वन्दे मातरम्’ न म्हणणारे, गोहत्या करणारे, श्रीराममंदिराला विरोध करणारे यांच्याशी व्यापार करू नये’, असे आवाहन केल्यामुळे त्यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे नोंद झाले. अशा प्रकारे त्यांच्यावर कर्नाटक राज्यात ११७ हून अधिक गुन्हे नोंद झाले आहेत. या सर्व गुन्ह्यांविरुद्ध त्यांनी कायदेशीर लढा दिला आहे. त्यांपैकी ९० टक्के गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरवले आहे.

४. कर्नाटकातील अनेक जिल्हे आणि अनेक राज्ये यांमध्ये प्रवेश बंदी

श्री. मुतालिक यांनी गोवा सरकारला पब आणि कॅसिनो संस्कृती थांबवण्याचे आवाहन केल्यामुळे गोवा सरकारने त्यांच्यासह श्रीराम सेनेवर १२ वर्षे बंदी घातली होती. याखेरीज पबवर आक्रमण केल्याच्या प्रकरणानंतर दक्षिण कन्नड जिल्हा, हरिहर, बैलहोंगल, कोलार या कर्नाटकातील १५ हून अधिक जिल्ह्यांमध्ये त्यांना प्रवेश बंदी करण्यात आली; परंतु या सर्व बंदीविरुद्ध कायदेशीर लढा देऊन बहुतेक जिल्ह्यांवरील बंदी न्यायालयाने उठवली. अशा प्रकारे हिंदुत्वाच्या कार्यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये प्रवेश बंदीचा कटू अनुभव घेतलेले ते एकमेव नेते आहेत.

५. लव्ह जिहाद रोखण्यासाठी ‘हेल्पलाईन’ (साहाय्य कक्ष) क्रमांक आणि पुस्तकाचे प्रकाशन

श्री. प्रमोद मुतालिक हे लव्ह जिहादच्या विरोधात अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. लव्ह जिहादची प्रकरणे रोखण्यात कर्नाटक पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे श्रीराम सेनेच्या वतीने लव्ह जिहाद रोखण्यासाठी ‘लव्ह जिहाद हेल्पलाईन क्रमांक’ प्रसारित करण्यात आला. लव्ह जिहादच्या प्रकरणात हिंदु तरुणी अडकली असल्यास त्यांनी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधल्यास श्रीराम सेनेचे कार्यकर्ते त्यांना साहाय्य करतात. ही हेल्पलाईन चालू झाल्यानंतर शेकडो दूरभाष आले आहेत. श्रीराम सेनेच्या २० वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी ४,७६० हिंदु मुलींना इस्लामच्या जाळ्यातून बाहेर काढले आहे. अनेक प्रकरणांमध्ये तक्रार देऊनही पोलिसांनी काही कारवाई न केल्यास श्रीराम सेनेचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्यांना न्याय मिळाल्याच्या घटना घडल्या आहेत. उदाहरणार्थ हुब्बळीतील नेहा हिरेमठ प्रकरणात धर्मांध मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीची हत्या केल्यानंतरही त्याला महाविद्यालयातून काढले नव्हते. श्री. मुतालिक यांच्या लक्षात येताच त्यांनी प्राचार्यांची भेट घेतल्यानंतर हिंदु तरुणीची हत्या करणार्‍या धर्मांध तरुणाला महाविद्यालयातून काढले.

नुकतेच श्री. मुतालिक यांनी ‘लव्ह जिहाद’ नावाचे कन्नड भाषेतील पुस्तक प्रकाशित करून त्याविषयी जनजागृती केली आहे.

६. गोरक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष

श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस जिवाची पर्वा न करता अवैधपणे गोवंश वाहतूक करणार्‍या धर्मांधांविरुद्ध लढा दिला आणि त्यांनी १३ सहस्र गायींचे संरक्षण केले. ३० सहस्रांहून अधिक कार्यकर्त्यांना गोरक्षणाची दीक्षा दिली आहे. गोरक्षणाच्या अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांच्या खोट्या केसेस आणि राजकीय दबावामुळे कार्यकर्त्यांना अनेक महिने तुरुंगवास भोगावा लागला आहे. अशा प्रकारे श्रीराम सेना गोरक्षणासाठी अविरतपणे कार्य करत आहे.

गोवंशियांची तस्करी रोखतांना  श्री. प्रमोद मुतालिक, समवेत श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतांना कर्नाटकमधील पोलीस अधिकारी

७. धर्मांतराच्या विरोधात लढा

भोळ्या हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या धूर्त ख्रिस्ती मिशनर्‍यांविरुद्धही त्यांनी अनेक वेळा लढा दिला आहे. अनेक स्वामीजी, संत यांना समवेत घेऊन तत्कालीन कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि ‘धर्मांतरविरोधी कायदा’ लागू करण्याची मागणी केली, ज्यामुळे कर्नाटकमध्ये ‘धर्मांतरविरोधी कायदा’ लागू करण्यात आला.

८. कोणत्याही हिंदूवर अन्याय झाल्यास त्यांच्यासाठी लढणारे एकमेव नेते श्री. प्रमोद मुतालिक !

श्री. प्रमोद मुतालिक हे समाजातील कोणत्याही हिंदूवर अन्याय झाल्यास त्यांच्यासाठी लढा देतात. तो हिंदू कोणत्याही संघटनेत किंवा कोणत्याही पक्षात असोत, हिंदु समाजाच्या रक्षणासाठी त्यांचे मन तळमळते. ते पक्ष, संघटना, जातीभेद विसरून हिंदुत्वाच्या रक्षणाचे कार्य करणारे एकमेव नेते आहेत.

श्री. प्रमोद मुतालिक : हिंदूंच्या संघटनेसाठी एक शक्ती !

डॉ. प्रवीण तोगाडिया

श्री. प्रमोद मुतालिक हे कर्नाटकातील प्रत्येक कोपर्‍यात, खेडोपाडी ओळखले जाणारे व्यक्तीमत्त्व आहे. निर्भीड वाणी, स्पष्ट बोलणे आणि कुठल्याही तडजोडीविना हिंदुत्वाचे समर्थन केल्यामुळे ते कर्नाटक राज्यात प्रसिद्ध झाले. हिंदुत्वावर कुठेही आघात झाला किंवा अपप्रचार झाला, तर श्री. प्रमोद मुतालिक आणि त्यांच्या श्रीराम सेनेचे कार्यकर्ते जीवाची पर्वा न करता, कोणतीही संघटना, जात, कोणताही पक्ष विचार न करता त्यांच्या संरक्षणासाठी त्वरित धावून जाणारे एकमेव हिंदू नेते आहेत.

ते केवळ एक व्यक्ती नसून ते हिंदू समाजाची शक्ती आहेत. आजही श्री. मुतालिक यांना मानणारे अनेक लोक आहेत. त्यांच्यासह हिंदु समाजाने उभे रहाणे आवश्यक आहे. त्यांच्या संघर्षशील जीवनामुळे त्यांनी हिंदु युवकांमध्ये धैर्य, शौर्य आणि लढाऊवृत्ती निर्माण केली आहे.

आज वयाच्या ६२ व्या वर्षीही श्री. मुतालिक हिंदु राष्ट्रासाठी अहोरात्र विचारांसह आंदोलन करत आहेत. ‘हिंदु धर्म रक्षणाच्या कार्य करणार्‍या श्री. प्रमोद मुतालिक यांना शक्ती आणि चैतन्य देवो’,  अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !

देशभर हिंदुत्वाच्या संघर्षात सर्वाधिक खटले आणि हद्दपारींचा सामना करणारा नेते श्री. प्रमोद मुतालिक आहेत.’

– डॉ. प्रवीण तोगाडिया, अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद

संपादकीय भूमिका

समाजातील कोणत्याही हिंदूवर अन्याय झाल्यास पक्ष, संघटना, जात विसरून हिंदुत्वाच्या रक्षणाचे कार्य करणार्‍या श्री. प्रमोद मुतालिक यांचा आदर्श घ्या !